computer

काळे दात, उंच विग, बांधलेला स्कर्ट...जुन्या काळी चक्क या गोष्टी सुंदर मानल्या जायच्या !!

सौंदर्याची व्याख्या प्रत्येक काळानुसार बदलत गेली आहे. खास करून स्त्रियांबदल असणारे सौंदर्याचे मापदंड अनेकदा बदलत गेलेत. तसेच सौंदर्यात भर घालण्यासाठी करावयाच्या उपायांमध्येही बदल होत गेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर जपानमध्ये काळे दात हे सौंदर्यचं प्रतिक समजले जायचे. या उलट एक काळ असा होता जेव्हा इंग्लंडमध्ये खराब दात श्रीमंत असण्याचं लक्षण मानले जायचे. याखेरीज ओठांना लाली यावी म्हणून कीटकांपासून तयार करण्यात आलेला लाल रंग वापरला जात असे.

अशा एक ना अनेक पद्धतीने सौंदर्याचा अर्थच अनेक वर्षांमध्ये बदलत गेला आहे. काळात झालले हे बदल सगळेच्या सगळे तुमच्या समोर मांडता येणार नाही म्हणून आम्ही काही निवडक उदाहरणं घेऊन आलो आहोत. चला तर आजच्या लेखातून स्त्रियांच्या सौंदर्याचा एक इतिहासच नजरेसमोरून घालूया.

१. लाल रंगाची सौंदर्य-प्रसाधने :

ओठांना लाल रंग दिला तर ओठ फारच आकर्षक दिसतात. आज लिपस्टिक वेगवेगळ्या रंगात उपलब्ध होत असली तरी, जुन्या काळी जास्तीत जास्त लाल रंगाचाच वापर केला जात होता. ओठांना लाल रंग देण्यासाठी पूर्वीच्या काळी इजिप्शियन स्त्रिया कीटकांना चिरडून त्यांची पेस्ट ओठांवर लावत असत. राणी क्लिओपात्रालाही सुंदर दिसण्याची भारीच हौस होती. आपल्या ओठांना ती आवर्जून लाल रंग देत असे. यासाठी ती फोकस अल्गीन, आयोडीन आणि ब्रोमाईन मॅनीटचा वापर करत असे, पण हे मिश्रण खूपच घातक होते.
तुम्हाला जर असे वाटत असेल की, हे तर जुन्या काळातील झालं. तर तुम्ही साफ चुकीचे आहात. कारण आजही या लिपस्टिक बनवण्यासाठी अशाच विविध कीटकांचा वापर केला जातो. 

२. जपान मधील दात काळे करण्याची पद्धत

पांढरे शुभ्र दात हे निरोगी दंतआरोग्याचे लक्षण आहे. शिवाय मोत्यासारखे चमकदार दात आपल्या व्यक्तीमत्वात आकर्षक भर घालतात, पण एकेकाळी जपानमध्ये, काळ्या रंगाच्या दातांची क्रेझ होती. जपान मध्ये तिसऱ्या ते सहाव्या शतकापर्यंत ही प्रथा प्रचलित होती. जुन्या काळी या प्रथेला 'ओहागुरो' म्हणत असत. जपानच्या वेगवेगळ्या प्रांतात काळ्या दातांचा वेगवेगळा अर्थ घेतला जात असे. अशा प्रकारे दात काळे केल्याने दातांची झीज होत नाही असाही तिथे समज होता. यासाठी किनेमिझू नावाचे एक द्रव्य बनवले जात असे. ज्यात व्हिनेगरमध्ये लोहाचे बारीक कण आणि चहा पावडर मिसळले जात असे आणि हे मिश्रण दातांवर लावले जात असे. काळे दात असणारी स्त्री ही गंभीर आणि प्रामाणिक असते असा त्याकाळी समज होता.

३. नितळ त्वचेसाठी वापरली जाणारी जपानी पद्धत

नितळ, तुकतुकीत त्वचा सर्वांनाच हवी असते. जपानमध्ये स्त्रिया १७व्या शतकात तांदळाचा कोंडा आणि बुलबुल पक्षाची विष्ठा मिसळून त्वचेवर लावत असत. त्यांनी ही ट्रिक कोरियन लोकांकडून शिकली होती. कोरियन्स आपल्या कपड्यांवरील डाग काढण्यासाठी बुलबुल पक्षाची विष्ठा वापरत. या मिश्रणाला जपानी भाषेत युगुसू म्हटले जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आजही मॉईश्चरायजरमध्ये मॉईश्चरींग वाढवण्यासाठी हाच घटक वापरला जातो. पण आताच्या काळात ही विष्ठा १००% शुद्ध करून त्यातील जंतूंचा नाश करून मगच वापरली जाते. 

४. खराब दात म्हणजे श्रीमंतीचं लक्षण

१६ व्या शतकात राणी एलीझबेथ-पहिलीने इंग्लंडवर राज्य केले. तिच्या कार्यकाळात तिची फॅशन लगेचच सर्वत्र स्वीकारली जायची. अर्थात राणीचीही फॅशन काही फारच आकर्षक आणि अनोखी असायची असे नाही. पण तरीही सामान्य स्त्रियांमध्ये तिचे अनुकरण करण्याची क्रेझ होती. 

राणी एलिझाबेथला गोड पदार्थ खूप आवडायचे आणि अतिप्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने तिचे दात किडले होते. त्यामुळे असे काळे दात असणे म्हणजे त्याकाळी इंग्लंडमध्येही स्टेटस् सिम्बॉल होते. कारण, सर्वसामान्य लोकांना गोड खाणे परवडतच नसे. 

उन्हात काम करणाऱ्या कामगारांची काळवंडलेली त्वचा त्यांचे सामाजिक स्थान अधोरेखित करते. या सामान्य मजूर लोकापेक्षा आपण श्रेष्ठ आणि वरचढ आहोत हे दाखवून देण्यासाठी सरंजामी आणि श्रीमंत लोक संपूर्ण त्वचेवर पांढरट रंगाचा थर देऊन मेकअप करत. यासाठी त्याकाळी लीड म्हणजेच शिसे वापरले जात असे. आज याच्या वापरावर बंदी आणली आहे. कारण शिसे मानवी आरोग्यासाठी घातक असते. परंतु आजही गोऱ्या रंगाबद्दलची क्रेझ तशीच आहे.

५. उंच टाचा

युरोपमध्ये प्रबोधनाची चळवळ सुरु होती त्याकाळी उच्च वर्णीय महिला आपण इतरांपासून वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी उंच टाचेच्या चपला वापरत. अर्थात हाय हिल्सची फॅशन आजही प्रचलित आहे, पण त्याकाळातील या टाचांची उंची फारच मोठी होती. त्याकाळी अशा एकदम उंच चपला वापरण्यामागे आणखी एक कारण होते. शाही घराण्यातील स्त्रियांचे पोशाख हे जास्त घोळदार असत. चालताना हे घोळदार झगे रस्त्यावरून लोळत असत आणि खराब होत असत. असे कपडे जास्त खराब होऊ नयेत म्हणून या स्त्रिया अशा उंच चपला वापरत असत.

६. केसावर वापरला जाणारा मोठा विग

१८ व्या शतकात फ्रेंच मध्ये मुली आपले व्यक्तिमत्व रुबाबदार बनवण्यासाठी डोक्यावर मोठा उंच विग वापरत असत. या विगमध्ये खोट्या फुलापासून, रत्ने, खडे, पक्ष्यांची नक्षी असे सर्व काही असे. हा विग डोक्यावर बसवण्यासाठी त्यात डुकराच्या चरबीचा वापर केला जात असे. मुली हा विग फार काळासाठी डोक्यावर वापरत असत. त्यामुळे उंदीर, माशी असे कीटक आणि प्राणी या विगच्या वासाने आकर्षित होत. 

७. कपड्यांना आणि इतर वस्तूंना रंग देण्यासाठी वापरले जाणारे मिश्रण

कपडे, रिबन, कृत्रिम फुले, टोप्या, भिंतीवरील चित्रे अशा वस्तूंना रंग देण्यासाठी १९व्या शतकात पॅरीस ग्रीन आणि शील ग्रीन नावाचे एक मिश्रण वापरले जात असे. परंतु हा रंग बनवण्यासाठी अर्सेनिक सारख्या विषारी द्रव्याचा वापर केला जात असे. या रंगाच्या अतिरिक्त वापराने अक्षरश: काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक देशांनी या रंग वापरण्यावर बंदी घातली. आज हेच मिश्रण कीटकनाशक म्हणून वापरले जाते.

८. हनुवटीला आकार देण्याची फॅशन

१९व्या शतकात एका व्यापाऱ्याने हनुवटीचा आकार कमी करण्यासाठी एका खास यंत्राची जाहिरात केली होती. हनुवटीखाली साचलेल्या चरबीमुळे हनुवटीचा आकार मोठा दिसतो, ज्यामुळे वय वाढल्याचे जाणवते. हे यंत्र हनुवटीला लावल्याने हनुवटीचा आकार बारीक होतो, असा दावा या जाहिरतीत केला गेला होता. विशेष म्हणजे आजही ही ट्रिक वापरली जाते.

१०. बांधून घातलेल्या स्कर्टची फॅशन

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हॉबल स्कर्ट नावाची एक विचित्र फॅशन आली होती. या स्कर्टच्या खालच्या बाजूला दोरीनी पाय बांधलेले असायचे ज्यामुळे स्त्रियांना हा स्कर्ट घालून भराभरा चालणे शक्यच नसे. या स्कर्टच्या अशा विचित्र फॅशनवरून अ स्कर्ट विथ अ स्पीड लिमिट असा एक जोक देखील प्रचलित झाला होता. विशेषत: फ्रांसमध्ये ही फॅशन जास्त प्रचलित होती.

११. बर्फाचा मास्क

१९३०च्या दशकात चेहऱ्याला आराम देण्यासाठी बर्फाने शेक देण्याची किंवा बर्फाचा मास्क वापरण्याची पद्धत रूढ झाली होती. विशेषत: हॉलीवूड अभिनेत्रींसाठी ही एक अत्यावश्यक बाब बनली होती. रात्रभर होणाऱ्या पार्ट्यामुळे अभिनेत्रींना पुरेशी झोप मिळत नसे. पण, दुसऱ्या दिवशी त्यांना शुटींगसाठी पुन्हा तरतरीत आणि ताजेतवाने व्हावेच लागे. शरीराचा थकवा चेहऱ्यावर दिसू नये म्हणून त्या अशा प्रकारे बर्फाचा मास्क वापरायच्या. ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्याही कमी व्हायच्या आणि चेहरा ताजातवाना दिसत असे.

१२. नायलॉन स्टॉकिंग्ज-

१९४०च्या दशकात अमेरिकेत नायलॉन स्टॉकिंग्जची फॅशन रूढ झाली होती. पण १९४१ साली अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला आणि नायलॉनचा वापरा पॅराशूट, दोरी, दोरखंड, जाळे, अशा लष्करासाठी उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती करण्यासाठी केला जाऊ लागला. त्यामुळे बाजारात नायलॉन स्टॉकिंग्जची आवक घटली. परिणामी महिलांना त्यांची आवडत्या स्टॉकिंग्जला मुरड घालावी लागली. अशावेळी कॉस्मेटिक इंडस्ट्रीने खास महिलांसाठी ‘लिक्विड स्टॉकिंग्ज’ आणले. या लिक्विडमुळे महिला आपल्या पायांवर स्टॉकिंग्जची डिझाईन काढू लागल्या.ज्यामुळे त्यांनी खरोखर स्टॉकिंग्ज घातल्या आहेत असा भास होत असे.

१३. सडपातळ दिसण्याची फॅशन

सडपातळ दिसण्याची क्रेझ आजही काही कमी नाही, पण १९२०च्या दशकात सडपातळ दिसण्यासाठी स्त्रिया आपला स्तनांचा उंचवटा आणि आकार कमी दिसेल अशी कपडे वापरत असत. स्तनांचा आकार कमी झाल्याने शरीर खूपच सडपातळ दिसत असे.

 

शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य अधिक महत्त्वाचं असं कितीही म्हटलं तरी ते सुंदर दिसण्यावर भलीमोठी इंडस्ट्री जगतेय. लोकांना, विशेषतः स्त्रियांना, सुंदर दिसण्याचं आकर्षण होतं आणि राहिल. अशा फॅशन्स येत आणि जात राहतील हेच सत्य आहे. फक्त सौंदर्याबद्दलच्या लोकांच्या कल्पना बदलत राहतील, इतकंच!

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required