गर्भाशय प्रत्यारोपणातून पुण्यात जन्मली आशिया खंडातली पहिली मुलगी !!

मंडळी, आज आम्ही सांगणार आहोत आधुनिक विज्ञानाच्या अद्भुत चमत्काराबद्दल ! काल घडलेली एक अशी घटना जिने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवली आहे… एका जगावेगळ्या वैद्यकीय प्रयोगाने मातृत्वासाठी भुकेल्या एका स्त्रीला मातृत्व बहाल केले आहे. भारतासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि विशेष करून ती सर्जरी आपल्या मराठी माणसाने केलेली आहे… जाणून घ्यायचं आहे ? मग वाचा…

डॉ. शैलेश पुणतांबेकर हे नाव अनेकांना ठाऊक असेलच. पुण्याच्या प्रसिद्ध गॅलक्सी हॉस्पिटलचे हे मान्यवर डॉक्टर आहेत. ते लॅप्रोस्कोपी सर्जन असून मेडिकल डायरेक्टर या पदावर गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत आहेत.

स्रोत

18 मे 2017 रोजी मीनाक्षी वालान या महिलेवर गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गॅलक्सी हॉस्पिटल मध्ये पार पडली. मीनाक्षीला गर्भाशय कुणी दिले माहीत आहे? तिच्या स्वतःच्या आईने! मीनाक्षीच्या गर्भाशयात काही अडचणी असल्याने ती बाळाला जन्म देण्यास सक्षम नव्हती. त्यामुळे तिचे गर्भाशय काढून टाकून त्या जागी तिच्या जन्मदात्या आईचे गर्भाशय बसवण्यात आले होते.

आणि आता… 17 महिन्यानंतर त्याच गर्भातून मीनाक्षीच्या पोटी एका बाळाने जन्म घेतला आहे! आहे ना अद्भुत चमत्कार?

नवरात्रीत देवीची पूजा केली जाते आणि मीनाक्षीच्या पोटी देवीच जन्माला आली असे म्हटल्यास वावगे ठरू नये…

सध्या 27 वर्षाच्या असलेल्या मीनाक्षीला गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर काही महिने तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवले होते. तिची तब्येत सुधारल्यानंतर आणि ती सामान्य स्थितीत आल्यानंतर तिला परत तिच्या गुजरातमधील गावी पाठवण्यात आले. जेव्हा तिची मासिक पाळी सुरू झाली तेव्हा ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सर्वांना समजले. मग तिला परत पुण्याला बोलावून तिच्या गर्भाशयात गर्भ स्थापन केला गेला. त्या दिवसापासून बरोबर 31 आठवडे आणि 5 दिवसानंतर 17 ऑक्टोबर 2018 रोजी त्या गर्भातून बाळ जन्माला आले. हे प्रिमॅच्युअर बाळ असून सातव्या महिन्यात सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी करावी लागली आहे. पण बाळाची तब्येत नॉर्मल असून ते व्यवस्थितपणे श्वासोच्छ्वास घेत आहे.

भारतासाठी ही अभिमानास्पद बाब आहेच, पण आशिया खंडात गर्भाशय बदलातून जन्म होण्याची ही पहिलीच घटना आहे. जगातील अश्या पद्धतीने जन्मणारे हे बारावे बाळ आहे. या पूर्वी गर्भाशय प्रत्यारोपणाने 9 बाळे स्वीडन मध्ये आणि 2 अमेरिकेमध्ये जन्मली आहेत.

डॉ. शैलेश पुणतांबेकरांनी ही शस्त्रक्रिया आणि डिलिव्हरी यशस्वी करून दाखवल्याने संपूर्ण जगातील वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे. भारतात सुद्धा अश्या घटना घडू शकतात याची खात्री जगाला पटवून देण्यात डॉ. पुणतांबेकर यशस्वी झाले आहेत.

नवरात्र म्हणजे जगन्मातेचा उत्सव, मातृत्वाचा उत्सव. या उत्सवादरम्यानच हा वैज्ञानिक चमत्कार घडवून आणणाऱ्या पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलच्या डॉक्टर शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमचे बोभाटा तर्फे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा…

सबस्क्राईब करा

* indicates required