computer

२०२० मधील सर्वात कमकुवत २० पासवर्ड्स.... तुम्ही या यादीतला पासवर्ड तर वापरत नाही ना?

आजकाल आपण Android मोबाईलमध्ये तर Facebook, Gmail आणि इतर बऱ्याच खात्यांचे आधीपासूनच लॉगीन करून ठेवतो. त्यामुळे दरवेळी पासवर्ड टाईप करावाही लागत नाही. मग कधीतरी अचानक काही काम निघतं आणि आठवतं की आपण आपला पासवर्ड साफ विसरलोय. त्यानंतर ते Verification करा आणि मग पासवर्ड बदला ही सर्व डोकेदुखीची कामं त्रासदायक वाटतात. मग आपण सहज लक्षात राहील असा एखादा पासवर्ड ठेऊन रिकामे होतो. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का, की तुमचा लक्षात राहायला सोपा असलेला पासवर्ड किती सुरक्षित असतो??

२०१९ मध्ये लाँच झालेली ‘नॉर्डपास’ ही एक पासवर्ड व्यवस्थापक कंपनी आहे. ही कंपनी पासवर्ड सुरक्षा देण्याचे काम करते. तसेच पासवर्ड्स चे आयोजन करणे आणि पासवर्डच्या नोट्स एकापेक्षा अधिक ठिकाणी ठेवण्यास मदत करते. चांगले सुरक्षित पासवर्ड त्यांच्या ग्राहकांना बनवून देणे अशी कामेही ही कंपनी करते.

ह्याच कंपनीने २०२० मधील सर्वात कमकुवत अशा २० पासवर्ड्स ची यादी जाहीर केली आहे. कमकुवत ह्याचा अर्थ असा की Hackers लोकांना अगदी काही सेकंदाच्या आत पासवर्ड क्रॅक करता येईल असे पासवर्ड.

तर तुम्हाला माहित आहे का की ह्या यादीमध्ये सर्वात पहिला कोण आहे?

‘123456’. तुमच्यामधील बऱ्याच लोकांचा हा पासवर्ड असणार. आता गम्मत अशी आहे की हा पासवर्ड काही सेकंदाच्या आत क्रॅक करता येतो. जगातील एकूण २५.४ लाख लोक हा पासवर्ड वापरतात आणि २.३ कोटीहून अधिक वेळा हा क्रॅक केला गेला आहे.

तर ह्या यादीमध्ये पहिलं बक्षिस '123456789'  ह्या पासवर्डला मिळतो. हा एका सेकंदापेक्षा कमी वेळात क्रॅक होऊ शकतो. तर दुसरे बक्षीस जाते 'picture 1' ह्या पासवर्डला. हा तीन तासांत क्रॅक करता येऊ शकतो. पण हा पासवर्ड वापरणाऱ्या लोकांची संख्याही बरीच मोठी आहे.

खराब पासवर्डच्या यादीमध्ये चौथा क्रमांक जातो ‘Password’ ला. हो, हे खरंय की खूप लोक आपला पासवर्ड ’Passward’ असा ठेवतात. हा पासवर्ड देखील काही सेकंदाच्या आत क्रॅक करता येण्यासारखा आहे. तुमच्यामध्येही जर कोणी हा पासवर्ड वापरला आहे तर चिंता न करता बिनधास्त हसू शकता. 

२०२० सालातील  सर्वात वाईट पासवर्ड्सच्या यादीतील पाचवा पासवर्ड '12345678' आहे. त्यानंतर '111111', '123123', '12345' आणि '1234567890' आहे. हे पाचही पासवर्ड क्रॅक करण्यास एका सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो.

या यादीतील दहावा पासवर्ड थोडा नवीन आहे. तो आहे 'senha'. पण हा देखील 10 सेकंदात क्रॅक होऊ शकते.

यादीतील पुढील 10 सर्वात वाईट पासवर्ड पुढीलप्रमाणे 123456७, qwerty, abc123, Million2, 000000, 1234, iloveyou, aaron431, password1, qqww1122.

तर मित्रांनो, वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता वर सांगितलेल्या पासवर्डपैकी कोणताही पासवर्ड तुम्ही वापरत असाल तर तो बदलण्याचा नक्कीच विचार करा. आता महत्त्वाचा प्रश्न. एक सहज क्रॅक न करता येणारा पासवर्ड कसा सेट करावा?

जेव्हा तुम्ही नव्याने पासवर्ड सेट करत असता तेव्हा अप्पर केस अक्षर(A ते Z), लोअर केस अक्षर(a ते z), संख्या आणि विशेष अक्षर यांना पुढेमागे, एकमेकांच्या अधेमध्ये बसवून नवीन पासवर्ड तयार करता येईल. एक लक्षात ठेवा, तुम्ही, तुमचे नातेवाईक यांचा वाढदिवस, गाडीचा नंबर, घराचा नंबर, इत्यादी पासवर्ड म्हणून वापरू नका. हे क्रमांक इतरांनाही माहित असण्याची शक्यता असते. याखेरीज तुमचं नाव किंवा गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडचं नाव पासवर्ड म्हणून ठेवू नका. या पद्धतीचे पासवर्डही सहज ओळखता येतात.

असं म्हणतात की पासवर्ड हा टूथब्रश सारखा असतो. एकदा वापरलेला पुन्हा वापरू नका, जुना झाला  की टाकून द्या, वेळोवेळी बदलत रहा, आपला इतरांना देऊ नका आणि इतरांचा स्वतः वापरू नका. याखेरीज तुम्ही वापरत असलेल्या सर्व खात्यांसाठी भिन्न पासवर्ड ठेवा.

चला तर आता आपला पासवर्ड सुरक्षित आहे की नाही याचा नीट विचार करा.

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required