जगातल्या प्रत्येक देशाला भेट दिलेली जगातली सर्वात लहान व्यक्ती... कसा केला तिने हा प्रवास हे तर जाणून घ्या!!

मंडळी, नुसतं गावी जायचं म्हटलं तरी आपली किती धावपळ होते. ट्रेन, बसचं तिकीट काढायचं, त्यासाठी रांगा लावायच्या. कोकणातली मंडळी तर गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी ५ महिन्यापूर्वीच ट्रेनचं बुकिंग करून ठेवतात. एवढं होऊनही जाताना सगळं सामान आवरायचं, उशीर होऊ नये म्हणून २ तास आधीच सगळं सज्ज करायचं, लहानपणी तर आई आधी विचारायची ‘शी-शू आत्ताच करून घ्या, नंतर गाडीत आली असं म्हणायचं नाही’.
मंडळी, आपल्याला गावी जाण्यासाठी एवढं सगळं करावं लागतं आणि अमेरिकेच्या या पोरीनं अवघ्या २१ व्या वर्षांच्या आयुष्यात जगातला प्रत्येक देश बघितला आहे. आजच्या लेखात आपण तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हालाही तिचा हेवा वाटल्यावाचून राहणार नाही.
मंडळी, या मुलीचं नाव आहे लेक्सी अल्फोर्ड. तिने ३१ मे रोजी उत्तर कोरियात पाऊल ठेवून विश्वविक्रम केला आहे. ती जगातील प्रत्येक देश पाहिलेली सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. या आधी हा विश्वविक्रम २४ वर्षांच्या जेम्स ॲस्क्वीथ या व्यक्तीकडे होता.
तिच्या मनात सुरुवातीला वर्ल्ड रेकॉर्ड करायचं नव्हतं. तिच्या वडिलांची स्वतःची ट्रॅव्हेल एजन्सी आहे, त्यामुळे तिला लहानपणापासूनच प्रवासाची सवय होती. प्रवासातून तिने जे जग बघितलं त्याचा तिच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत गेला आणि तिला प्रवास आवडू लागला. याला जोड मिळाली लोकांना जवळून पाहण्याच्या उत्सुकतेची.
२०१६ साली १२ वी पूर्ण झाल्यावर तिच्या मनाने जगभ्रमंतीचं पक्कं केलं. आपण विचार करू की वडिलांची ट्रॅव्हेल एजन्सी असल्यावर तिच्यासाठी हे खर्चिक नसेल. राव, खरं तर तिने सगळा प्रवास स्वतःच्या खर्चावर केला आहे. हा पैसा उभारण्यासाठी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जाहिराती केल्या. याखेरीज फोटोग्राफी, ब्लॉग्स या मार्फत तिने पैसा उभारला. लवकरच तिचा ट्रॅव्हल शो प्रदर्शित होणार आहे.
तर मंडळी, मनात आणलं तर आपल्याला सगळं काही शक्य आहे. २१ वर्षांच्या लेक्सी अल्फोर्डने आपल्या समोर नवीन उदाहरण तयार केलं आहे.