computer

या नामांकित बिस्कीट कंपनीत आढळलेत २६ बालकामगार...कुठे घडलाय हा प्रकार ??

६ ते १४ वयातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे असं भारतीय घटनेच्या कलम क्रमांक २१-अ मध्ये नमूद केलं आहे. या कायद्याप्रमाणे प्रत्येकालाच शिक्षणाचा अधिकार मिळतो, पण कायदा किती प्रमाणात पाळला जातो? नुकतंच एका नामांकित बिस्कीट कंपनीच्या कारखान्यात तब्बल २७ बालकामगार आढळले आहेत. ही मुलं कारखान्यातच राहत होती आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क नव्हता.

ही नामांकित बिस्कीट कंपनी म्हणजे भारतातली सगळ्यात लाडकी बिस्कीट कंपनी “पार्ले-जी”...

मंडळी, ऐकून धक्का बसेल पण पार्ले-जीच्या रायपुर, छत्तीसगढच्या कारखान्यात हा प्रकार घडला आहे. १४ जून रोजी छत्तीसगढ पोलीस, Childline संस्था आणि महिला व बाल विकास विभागाने मिळून या कारखान्यावर छापा घातला होता. कारखान्यात मोठ्याप्रमाणात बालकामगार आहेत अशी माहिती मिळाली होती. याचा तपास घेण्याकरिता कारखान्यावर नजर ठेवण्यात आली. माहिती पक्की आहे हे समजल्यावर छापा घालण्यात आला. छाप्यात १० ते १६ वयातील २७ मुलं काम करताना आढळली आहेत. या मुलांना महिना ५००० ते ७००० रुपये पगारावर नोकरीवर ठेवण्यात आलं होतं. या तुटपुंज्या पगारासाठी त्यांना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत १२ तास राबावं लागायचं.

मंडळी, याबद्दल ‘पार्ले-जी’ने हात वर केले आहेत. त्यांनी म्हटलंय की ‘हा कारखाना त्यांचा स्वतःचा नसून कंत्राटावर चालवला जात आहे.’ पार्ले-जीने हे स्पष्ट केलंय की ते बालकामगार ठेवत नाहीत. या प्रकरणाबद्दल ते स्वतंत्र तपास घेणार आहेत. एवढं होईस्तोवर पार्ले-जीला काहीच माहिती मिळाली नव्हती का ? असा प्रश्न शेवटी पडतो.

पुढे काय ?

कारखान्याचा मालक विमल खेतानला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला किशोर न्याय कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत प्रत्येक मुलासाठी ५०,००० रुपये दंड म्हणून भरावे लागतील. याखेरीज त्याला २ वर्षांच्या कैदेची शिक्षाही होऊ शकते.

मंडळी, ही मुलं छत्तीसगढमधल्या गरीब वस्तीतून आलेली आहेत. Childline संस्था आणि महिला व बाल विकास विभागाने या मुलांच्या आई वडिलांना बोलावून त्यांना समजवण्याचं काम केलंय. अर्थात अतिगरीबी आणि शिक्षणाच्या अभावासमोर त्यांचे हे प्रयत्न कितपत पुरेसे ठरतील याबद्दल शंकाच आहे.

मंडळी, एका नामांकित बिस्कीट कंपनीच्या कारखान्यात हा प्रकार घडत असेल तर इतर ठिकाणी मुलांचे किती हाल होत असतील ?

पार्ले-जी म्हणतंय की आम्हाला याबद्दल काहीच माहित नव्हतं. तुम्हाला हे पटतं का? काय म्हणाल या केसबद्दल??