अमेरिकेला जाण्यासाठी त्याने ८० वर्षांच्या म्हाताऱ्याचा वेश का घेतला ? पोलीस पण चक्रावलेत !!

'धूम-2' मध्ये हृतिक रोशन कसे वेगवेगळे गेटअप करून पोलिसांना गुंगारा देऊन पळून जायचा हे तुम्ही पाहिले असेल. तेव्हा अशा गोष्टी फक्त सिनेमांमध्ये खऱ्या होतात असा विचार पण तुम्ही केला असेल, पण प्रत्यक्षात पण असे नग असतात!! त्यांच्यामुळेच या प्रकारच्या गुन्ह्यांना 'धूम स्टाईल' हे नाव पडले आहे.
30 वर्षाचा असलेला जयेश पटेलने पण अशीच डोक्यालिटी लढवली, पण पोलीस त्याच्यापेक्षा जास्त हुशार असल्याने गडी पकडला गेला. भाऊने वेशभूषा बदलून चक्क 80 वर्षांच्या आजोबाचा अवतार केला होता. फेक पासपोर्ट बनवून आणि अमरीक सिंग असे नाव बदलून तो देशाबाहेर जाण्याच्या तयारीत होता. पण शेवटी पकडला गेला.
CISF च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की एयरपोर्टवर पोचल्यावर नेहमीप्रमाणे चेकिंग सूरु होती पण जयेशने चेकिंग करू देण्यास नकार दिला, मी वयस्कर असल्याने जास्त वेळ ऊभा राहु शकत नाही हा त्याने दिलेला तर्क!! जेव्हा त्याच्या वागण्या-बोलण्यात थोडा घाबरलेपणा दिसला तेव्हा पोलिसांनी त्याचा पासपोर्ट तपासला. त्यात त्याचे नाव अमरीक सिंग होते आणि वय 80 वर्ष!!
त्याच्याकडे निरखून पहिल्यावर त्याची त्वचा तरुण वाटत होती. आता पोलिसांचा संशय वाढला होता. मग पोलिसांनी पासपोर्टवरील चेहरा आणि समोर ऊभा असलेला माणुस यांच्याकड़े व्यवस्थित बघितल्यावर ते दोन्ही एकच नाहीत या पोलिसांच्या संशयाला बळकटी येऊ लागली होती.
त्याने शेवटपर्यंत स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी खाकीचा दम दाखवल्यावर मात्र त्याला खरे बोलावे लागले. त्याने सांगितले की तो गुजरातच्या अहमदाबादचा आहे आणि त्याचे खरे नाव जयेश पटेल आहे.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने बनावट पासपोर्ट कसा बनवला, नाव बदलून अमेरिकेत जाऊन तो काय करणार होता याचा तपास आता पोलिस करत आहेत.
लेखक : वैभव पाटील.