computer

२०,००० लोकांचा एका रात्रीत बळी घेणाऱ्या भोपाळ वायुदुर्घटनेला ३५ वर्ष पूर्ण...आजची परिस्थिती काय आहे ?

डिसेंबरच्या २ तारखेच्या रात्रीने भोपाळला कायमचं बदलून टाकले. युनियन कार्बाईडच्या जमिनीखालच्या टँकमधून विषारी मिथाइल आयसोसायनेटची गळती सुरु होऊन जगाच्या इतिहासात कधीही घडली नाही एवढ्या मोठ्याप्रमाणातील दुर्घटना घडली. सुरुवातीला ३० टन आणि पुढच्या ४५ ते ६० मिनिटात ४० टन वायू हवेत सोडला गेला. याला साथ मिळाली ती त्यावेळच्या हवामानाची. थंडीचे दिवस असल्याने थंड वाऱ्याने विषारी वायू संपूर्ण शहरभर पसरवायला मदत केली.

या वायुगळतीमुळे आजूबाजूच्या भागातील जवळजवळ ५,००,००० लोकांना बाधा झाली. यातील जवळजवळ २०,००० लोकांवर मृत्यू ओढवला. उर्वरित लोकांना अपंगत्व आलं. या घटनेला जगातील सर्वात वाईट औद्योगिक आपत्ती म्हणून ओळखलं जातं.

(याच टाक्यांमधून विषारी मिथाइल आयसोसायनेटची गळती झाली)

आज या घटनेला ३५ वर्ष होऊन गेली. भोपाल गॅस पीडितांसाठी उभारण्यात आलेले भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टरची अवस्था काय आहे हे जाणून घेतले की सरकारी उदासीनता लक्षात येईल. गेली कित्येक वर्ष नेफ्रोलॉजी (किडनीचे विकार) आणि सर्जिकल आँकोलोजी (कॅन्सरच्या शस्त्रक्रिया) हे दोन्ही विभाग पूर्णपणे बंद आहेत. न्युरोलोजी (मज्जासंस्थेचे शास्त्र), पल्मनरी मेडिसिन (फुफ्फुसाचे विकार), ग्लॅस्ट्रो इंटेरोलॉजी (जठर आणि आतड्यांचे विकार)(सर्जरी अँड मेडिसिन)या विभागात एकही विशेष तज्ञ उपलब्ध नाही.

(भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टर)

हॉस्पिटलच्या रिसर्च सेंटरमध्ये या दुर्घटनेशी निगडीत आजारांवर संशोधन व्हावे अशी व्यवस्था होती. परंतु सध्या चालू असलेल्या १६ संशोधनांपैकी केवळ ३ विषय पिडीतांशी संबंधित आहेत. या दुर्घटनेतील ३० टक्के लोकांना मानसिक आजार जडले होते. परंतु गेले १९ वर्षे मनोविकारतज्ञ उपलब्ध नाही. परिणामतः मनोविकार जडलेल्यांपैकी ८० टक्के मानसिक विकाराने ग्रस्त आहेत.

खिलारी (लातूर), चर्नोबिल सारख्या घटनांमध्ये मनोविकारतज्ञांच्या मदतीने २ ते ३ वर्षात रुग्ण बरे झाले आहेत. हे इथे नमूद केले पाहिजे.

भारतात आलेल्या युनियन कार्बाईडच्या अध्यक्षांची केवळ ६ तासात कशी सुटका झाली आणि युनियन कार्बाईड Dow Chemicals ला विकली गेली यामागे एक मोठे आंतरराष्ट्रीय राजकारण होते. याबद्दल आपण नंतर कधीतरी जाणून घेऊया.

(युनियन कार्बाईडचे अध्यक्ष वॉरेन अँडरसन)

ही सर्व माहिती दुर्घटना पीडितांसाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. याबाबत जे RTI अर्ज केले गेले त्याच्या कागदपत्राची  छाननी केली असता असे लक्षात येते की केंद्राकडून  मिळालेल्या १०४ कोटीच्या मदतीपैकी १८ कोटी लाचखोरीत नाहीसे झाले आहेत. उरलेले ८६ कोटी रुपये अजूनही तसेच पडून आहेत. थोडक्यात ३५ वर्षानंतरही भोपाळची जनता दुर्लक्षितच आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required