computer

थंडीच्या मौसमात खा ही झटपट बनणारी सोपी आणि चटकदार लोणची!!

सर्व ऋतूंमध्ये हिवाळा फार मस्त असतो. पहाटे पडणारे थंडी, लहान झालेले दिवस, मोठ्या झालेल्या रात्री आपल्याला या ऋतुची चाहूल देतात. हिवाळ्यात भूक चांगली लागते व खाल्लेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होते, म्हणून शरीराला ऊर्जा भरपूर प्राप्त होते. ह्या ऋतूत भाज्या आणि फळे यांचीही अगदी रेलचेल असते. सर्व भाज्या एकदम रंगतदार आणि चविष्ट असतात. चंदन बटवा, चाकवत, मटार, गाजर अशा भाज्या, ओले अंजीर, सीताफळ, पेरु यांसारखी फळे फक्त याच ऋतूत मिळतात. सध्या अवकाळी पावसामुळे भाज्या आणि फळांचे दर कडाडलेले असले तरीही भाजी घेण्याचा मोह काही आवरत नाही. 

हल्ली  अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतात. तिथे भाज्या एकदम ताज्या आणि गावठी वाणाच्या असतात.  अशा ठिकाणाहून आणि नसेल तर तुमच्या नेहमीच्या मंडईतून ताजा करकरीत फ्लाॅवर, लाल रसरशीत गाजरं, हिरवेगार मटार, चटकदार आवळे, ओली हळद, आलं आणि लिंबं घेऊन या. आणि मस्त चटकदार लोणची बनवा. कशी बनवायची? आम्ही आहोत ना तुम्हांला पाककृती द्यायला..

तसं पाहता तोंडी लावणे हा भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे. चटण्या, लोणची, कोशिंबीर यापैकी एकतरी आपल्या रोजच्या जेवणात असतंच. त्यात अनेकविध प्रकारही असतात. यात वर्षभर टिकणारी लोणची असतात, तशीच हात लोणची (झटपट आणि तात्पुरती) सुद्धा असतात जी अशीच येता जाता करायची आणि लगेचच संपवायची अशीही असतात. आज आपण झटपट लोणच्यांचे काही प्रकार पाहू.

1. मिक्स भाज्यांचे लोणचे:

फ्लॉवर, गाजर, मटार, सर्व भाज्या मिळून अर्धा किलो असतील तर १००ग्राम मोहरीची डाळ, ५० ग्राम मेथी, लाल तिखट, मीठ, हिंग, लिंबू. फोडणीसाठी तेल.

कृती : सगळ्या भाज्या नीट धुवून कोरड्या करून घ्या.  फुलकोबीची फुलं मोकळी करून घायची. गाजर, सोलून, त्याचेपण पण बारीक तुकडे करून घ्या. मटारचे दाणे व बाकी भाज्या एकत्र करून घेऊन त्यात मीठ, तिखट, लिंबाचा रस घालून बाजूला मुरत ठेवा. कढईत मोहरी डाळ व मेथी थोडी परतून घ्या.  मेथीची पावडर करा. मोहरी डाळ व मेथी पावडर पण भाज्यांमधे मिसळून घ्या. दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात हिंग, हळद, मोहरीची फोडणी करून घ्या. गार झालेली फोडणी त्यात नीट मिक्स करून घ्या. हे लोणचं हवाबंद डब्यात ठेवा. ८ दिवसाच्या वर जर उरलं, तर मात्र फ्रिजमध्ये ठेवा. 

2. आवळा-ओली हळद-आलं मिक्स लोणचं.

हे लोणचं लिंबाच्या रसात बनवायचं आहे. त्याला तेलाची फोडणी किंवा मसाला लागत नाही, त्यामुळे तुम्ही याला डाएट लोणचं म्हणू शकता. आवळ्याच्या फोडी करायच्या. तसंच आंबेहळदीच्या, आल्याच्या व ओल्या हळदीच्या गोल चकत्या करायच्या. लिंबाचा रस, मीठ, व हिंग एकत्र करून त्या रसात वरील फोडी बुडवायच्या. आठ दिवस फ्रीज मधे छान टिकतं. संपलं की परत करायचं. 

3. लिंबाचे उपासाचे लोणचे

साहित्य : २५ लिंबं, पाऊण किलो साखर, १ वाटी मीठ, १ वाटी तिखट (तिखटाचं प्रमाणे आवडीनुसार कमी जास्त करता येऊ शकतं). 

कृती : लिंब चांगली ३-४ तास पाण्यात भिजवून ठेवावी. मग निथळून छान कोरडी पुसून घ्यावी. आपल्या आवडीनुसार फोडी करून घ्याव्या. एका लिंबाच्या आठ फोडी केल्या तरी चालतील. मग ज्या बरणीत लोणचं ठेवणार त्यात फोडी घालून मीठ घालावे. चांगले कालवून निदान १५ दिवस तरी मुरू द्यावे. दिवसातून एकदा तरी लिंबू हलक्या हाताने वर खाली करावे. १५ दिवसांनी त्या लिंबाना चांगला रस सुटलेला असेल. फोडी मऊ झाल्या असतील. आता त्यातच मापाची साखर व तिखट मिसळावे. फोडी मुरायला ८  दिवस तरी लागतील. त्यानंतर लोणचे खाण्यासाठी तयार!! ह्यात हिंग, मेथी, हळद, मोहरी असे काहीच नसल्यामुळे हे लोणचे उपासाला चालते.

4. लिंबाच्या सालांचे पाचक.

वरील लोणचे करून झाल्यावर बरीच लिंबू सालं उरतात. त्याचं पाचक करता येईल. रस काढून उरलेली नुसती लिंबसाली कात्रीने कापून घ्या आणि जरा मीठ लावून ठेवा. दोन चार दिवसात सालं नरम झाली की जरा हिंग,आलं, सैंधव, मिरेपूड व थोडा लिंबूरस घालून ठेवला की चटपटीत पाचक तयार!!!
हवं असेल तेव्हा थोडंस घेऊन चघळायचं. याने तापामुळे तोंडाची गेलेली चव परत येते. पित्त झालं असेल तर पित्तावरही हा एक चांगला उपाय आहे.

मग, लोणच्यासाठी भाज्या आणायला मंडईत कधी जाणार?

 

पाककृती आणि फोटो सौजन्य- भारती मुळे, भारती'ज किचन. 

टीप- फोटोंचे प्रताधिकार राखीव. पूर्वपरवानगीशिवाय त्यांचे कोणत्याही स्वरुपाचे मुद्रण किंवा वापर करु नये.

सबस्क्राईब करा

* indicates required