तरुणांनाही लाजवतील असे हे ५ आजी-आजोबा....यात एक आजीबाई तर हरिहरगड चढणाऱ्या आहेत... पाहा तर !!

पूर्वी दूरदर्शनवर जाहिरात यायची, "६० साल के बूढे या ६० साल के जवान?" हे वाक्य अगदी सार्थ ठरावं असं काम बरेच लोक करून दाखवतात. असंही म्हणतात की तारुण्य ही मनाची परिस्थिती असते. म्हातारपणात स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवणे सोपी गोष्ट नाही. पण सत्तर- पंचाहत्तरी पार केलेले लोक देखील ट्रेकिंग करणे, व्यायाम करणे अशा गोष्टी करताना दिसतात, तेव्हा निश्चितच तरुणांनीसुद्धा अनुकरण करावे अशी ती गोष्ट असते.

गेल्या काही काळात इंटरनेटमुळे अशा अनेक वयस्कर तरुणांचे व्हिडिओ वायरल झाले आहेत, ज्यांच्यामुळे वय हा फक्त एक आकडा असतो ही गोष्ट सिद्ध होते. आज आम्ही अशाच काही म्हातारपणाला देखील हरवून दाखवणाऱ्या आजीआजोबांबद्दल आज सांगणार आहोत.

१) लढवय्या आजीबाई

महिन्याभरापूर्वी रितेश देशमुखने एका आजीचा व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडिओत एक आजी काठ्यांच्या आधारे मार्शल आर्टस् करून दाखवत होत्या. या वयात आजीची प्रचंड चपळाई बघून सगळ्यांना आजीचे कौतुक वाटले. सोनू सूदने देखील हा व्हिडिओ ट्विट केला. पुण्यातल्या या शांता पवार आजीबाई रात्रीत स्टार झाल्या. त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते, अधिकारी आणि नागरिक गर्दी करू लागले होते.

२) काटक आजीबाई

हरिहर गड ट्रेकिंग करण्यासाठी किती कठीण आहे हे सांगण्यासाठी तुम्ही ट्रेकर असायला हवे याची गरज नाही. तिथले फोटो बघितले तरी हलक्या मनाचा माणूस तिथे जाण्याचा विचार करणार नाही. पण आशा अंबाडे नावाच्या आजींसाठी हा गड म्हणजे रोजच्या चालण्याचा रस्ता वाटावा अशा पद्धतीने त्या तिथे जाऊन आल्या. दोन दिवसांपूर्वी हरिहर गड सर केल्याचा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुधा रमण यांनी टाकला. व्हीडीओ तुफान हिट झाला. लोकांनी आजीचा स्टॅमिना बघून तोंडात बोटे घातली.

३) स्किपिंग सिंग

लंडनमध्ये राहणारे ७३वर्षांचे राजेंद्र सिंह नावाचे आजोबा लॉकडाऊनमध्ये अनेक फिटनेससंबंधी गोष्टींमध्ये रमले होते. त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ देखील त्यांच्या सोशल मिडिया हँडलवर टाकला होता. त्यांचा दोरीवर उड्या मारण्याचा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला. या वयातदेखील अतिशय वेगात दोरी उड्या मारताना बघून अनेकांनी त्यांची प्रशंसा केली. त्यांनी जगभरच्या तरुणांसाठी स्किपिंग चॅलेंज देखील सुरू केलं आहे. या माध्यमातून त्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिससाठी फंड गोळा केला. त्यांच्या या वयात देखील फिटनेसबद्दल असलेल्या प्रेमाला बघून इंग्लंडच्या राणीच्या वाढदिवस समारंभासाठी असलेल्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला.

४) जेडी किंगपिन

बोलिंग नावाच्या खेळात दहा बाटल्या म्हणजेच पीन्स उभ्या ठेवलेल्या असतात आणि सरपटत सोडल्या जाणाऱ्या अवजड बॉलने त्या एका दमात सगळ्या पाडल्या तर खेळ जिंकला असं समजलं जातं. एका अतिशय वयस्कर आजोबांचा बोलिंग गेमचा व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यात ते बोलिंगचा वजनदार बॉल हातात उचलतात आणि हळूहळू चालत जिथून बॉल सोडायचा तिथे जातात, त्यांनी सोडलेला बॉल चक्क समोर ठेवलेल्या सगळ्या पीन्स खाली पाडतो. आजोबांच्या या कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. अशी अचूकता या वयात साधणे म्हणजे मोठया कौशल्याचे काम असते.

५) डान्सर आजी

दलजीत दोसांज हा पंजाबी गायक सगळ्यांना माहीत आहे, त्याने रावी बाला शर्मा या आजीबाई त्याच्या एका गाण्यावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ ट्विट केला. या वयात देखील आजीबाई ज्या प्रतिभेने भांगडा करत होत्या, ते बघून तरुण देखील लाजतील. दलजीतने व्हिडीओ टाकल्याबरोबर अतिशय वेगाने हा सगळीकडे आजीबाईचा भांगडा प्रसिद्ध झाला होता.

मग, तुम्ही कोणत्या गटात मोडता? ३० साल के बुढ्ढे की ६० सालके हो के भी जवान?

सबस्क्राईब करा

* indicates required