computer

बचतीची लंका दहन होऊ द्यायची नसेल तर गुंतवणूक करताना ह्या ५ गोष्टी लक्षात ठेवायला हव्या !!

 काही दिवसापूर्वीच दसरा पार पडला. दसर्‍याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. आता गुंतवणूक आणि रावण यांचा काय संबंध आहे हा प्रश्न तुम्ही विचारणारच आहात नाही का ? तर त्याचे उत्तर आधीच देऊन मग या लेखाच्या  विषयाला हात घालूया. शास्त्रसंपन्न योध्दा असलेल्या रावणाच्या मनात गुणांसोबत येणारे नकारात्मक अवगुण भरलेले होते. रावणाचे काही गुण घ्यायला हवेत, तर काही टाळायला हवेत. नाहीतर बचतीची लंका दहन व्हायला वेळ लागणार नाही.

१.

गुंतवणूक करताना अहंकाराला थारा देऊ नका. समजा भरपूर अभ्यास करून खात्री पटल्यावरच तुम्ही एखाद्या समभागात गुंतवणूक केली, पण लवकरच त्याचे भाव गडगडताना दिसले तर ताबडतोब विक्री करून नुकसान कमी करा. 'माझ्या अभ्यासाप्रमाणे हा समभाग चांगलाच आहे, माझा निर्णय चुकणारच नाही' असा अहंकारातून येणारा हट्ट धरून बसलात तर नुकसान वाढतच जाईल. थोडक्यात, निर्णय घेताना अहंकाराला थारा देऊ नका. जगाला पवन उर्जेची नितांत गरज आहे हे विधान सत्य आहे. पण म्हणून मी विचार करून घेतलेले समभाग(शेअर्स) कधीच विकणार नाही हा अहंकार आहे.

याचे नेमके उदाहरण म्हणजे सुझलॉनमध्ये गुंतवणूक करणार्‍याच्या हातात काय शिल्लक आहे ते बघा. २००८ साली रु.  ४५९ आणि २०२० मध्ये रु.३.६५. आजही पवन उर्जेची गरज तीच आहे, पण एकेकाळी चांदी असलेला शेअर आज कथिलाच्या भावाचा पण नाही. 

स्रोत

२.

रावण वेदशास्त्र संपन्न होता. रावण संहितेचा लेखक होता. तरीसुध्दा निर्णय घेताना तो अभ्यास त्याने वापरला नाही. अभ्यास माणसाचा स्वभाव बदलू शकत नसेल तर तो अभ्यास वाया जातो. गुंतवणूक करणारे अनेकजण एखाद्या पंडिताला शोभेल असा अभ्यास करतात, सेमिनारला जाऊन चमकून येतात, पण गुंतवणूक करताना त्या अभ्यासाचा वापर न करता निर्णय घेतात. "या व्यापारी जगात शाश्वत असे काही नाही" असे घोकत घोकत 'रिअल इस्टेटचा भाव कधीच पडणार नाही' असा हट्ट धरून बसतात. गुंतवणूक करतात आणि फसतात. कोवीडच्या सुरुवातीच्या काळात रेमंडच्या रियल इस्टेटवर भरवसा ठेवणार्‍यांचे पैसे ६ महिन्यात अर्धे झाले आहेत.

३. 

एक चूक आयुष्य उध्वस्त करू शकते. त्याने सीता हरण केले आणि लंकेला आग लागली. वर्षानुवर्षे उत्तम प्रशासक अशी किर्ती कमावलेल्या रावणाची कारकिर्द एक चुकीने संपवली. एखादा गुंतवणूकदार वर्षानुवर्षे वेगवेगळ्या कप्प्यात गुंतवणूक करतो, पण एक दिवस ती सगळी मोडून एकाच क्षेत्रात गुंतवणूक करतो आणि ती गुंतवणूक धोक्यात आली तर सगळेच संचित एका चु़कीने संपते.

सदैव सावध अशी ओळख असलेल्या बर्‍याच लोकांनी पण ही घोडचूक केली आहे. फ्रँकलीन टेंपलटन या नावाचा एकेकाळी इतका गवगवा झाला होता की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्‍या अनेक कसलेल्या गुंतवणूकदारांनी इतर म्युच्युअल फंडातले पैसे काढून फ्रँकलीन टेंपलटनच्या काही धाडसी स्कीममध्ये पैसे टाकले. आज तेल ही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे अशी त्यांची स्थिती आहे.

फ्रँकलीन टेंपलटन म्युच्युअल फंडाचा काय लोच्या आहे?

४.

तपस्येने अशक्य ते शक्य करता येते. गुंतवणूकीचे शास्त्र शिकण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. त्यानंतरच हवे ते फळ मिळते. गुंतवणूक करणे, त्यावर लक्ष ठेवणे, योग्य तो निर्णय वेळीच घेणे ही एक तपस्याच असते. रावणाने अनेक वर्षे तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले. हर्षद मेहताच्या काळापासून राकेश झुनझुनवाला शेअर बाजारात उभे होते. त्यानंतर अनेक घपले आले आणि गेले पण 'व्हॅल्यू बेस्ड' म्हणजे गुणात्मकतेवर गुंतवणूक करणारे झुनझुनवाला आज भारताचे वॉरेन बफेट म्हणून ओळखले जातात. १९८५ साली ५००० रुपयांपासून सुरुवात करून आज त्यांची संपत्ती ११००० कोटी पर्यंत पोहचली आहे.

स्रोत

५.

रावण ब्रह्मदेवाचा पणतू, विश्रवाचा मुलगा, कुबेराचा भाऊ पण त्याला कोणीही वाचवू शकले नाही. गुंतवणूक करताना हे सूत्र लक्षात ठेवायला हवे की कोण कोणाचा वंशज आहे  हे महत्वाचे नाही. कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य कोण आहेत हे महत्वाचे नाही, तर ते काय करतात हे महत्वाचे आहे. रिलायन्सचेच उदाहरण बघा. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ही दोघंही धीरुभाई अंबानींची मुले, एक जगातला ६ व्या क्रमांकाचा श्रीमंत तर दुसरा कर्जाच्या सापळ्यात आहे! 

दसरा आणि रावण हे दोन्ही निमित्तमात्र आहेत. सांगायचे इतकेच होते की यशाच्या पाऊलखुणा आपल्या आसपास दिसत असतात, पण त्यांना ओळखणे हे महत्वाचे आहे. रावण थोड्या फार फरकाने प्रत्येकाच्या मनात असतोच. पण तो कोणता? सोन्याची लंका उभारणारा की सीतेचे अपहरण करणारा हे ज्याचे त्यानेच शोधायला हवे.

सबस्क्राईब करा

* indicates required