computer

हे आहेत जगातले ५ अत्यंत दुर्गम भाग....तुम्ही कुठल्या दुर्गम भागात जाऊ शकता ?

मंडळी, जगात असे काही दुर्गम भाग आहेत जिथे पोहोचणे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही अत्यंत कठीण आहे. पण मंडळी जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि असे भन्नाट अनुभव आवडत असतील तर त्या दुर्गम भागांची माहिती तुम्हाला असलीच पाहिजे.

मंडळी आज आम्ही ५ अशा अतिदुर्गम भागांची माहिती घेऊन आलो आहोत जिथे जाणे ‘येऱ्या गबाळ्याचं काम नाही’ भाऊ. चला तर पाहूयात ते प्रदेश आहेत तरी कुठे !!

१. ओयमायाकॉन, रशिया

ओयमायाकॉन भाग जगातील सर्वात थंड प्रदेशांपैकी एक मानला जातो. हा भाग सैबेरियातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. ओयमायाकॉन मध्ये असलेलं हिवाळ्यातील तापमान हे उणे ५८ अंश फॅरेनहाइट असतं. एवढ्या तापमानात कोणतंही पिक येत नसल्याने या भागातील लोक रेनडिअरचं मांस, गोठलेले मासे आणि घोड्याच्या रक्ताने तयार केलेले पदार्थ खाऊन जगतात.

ओयमायाकॉन पर्यंतचा प्रवास तिथल्या वातावरणामुळे अत्यंत कठीण बनला आहे. ओयमायाकॉन पासून जवळ असलेली शहरं जवळजवळ ९०० किलोमीटर लांब आहेत. दळणवळण सुद्धा कमी असल्याने तिथे पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात.

२. सुपाई, अॅरिझोना, अमेरिका

सुपाई हे ‘हवासुपाई’ जमातीचं गाव असून अमेरिकेतील दुर्गम भागापैकी एक मानलं जातं. हा भाग ‘ग्रँड कॅन्यन’ या खिंडीजवळ आहे. हवासुपाई लोक या भागात जवळजवळ ८०० वर्षांपासून राहत आलेले आहेत. या भागात पर्यटक जाऊ शकतात. पण या भागात जाण्याचा प्रवास अत्यंत अवघड आहे.

सर्वात अवघड म्हणजे हा भाग पायी चालून पूर्ण करावा लागतो. ग्रँड कॅनियन गावापासून ते सुपाई पर्यंतचा प्रवास हा ४ तासांचा आहे. हा प्रवास कोणत्याही ट्रेकपेक्षा कमी नाही राव. ग्रँड कॅनियन सारख्या खोल दरीच्या भागातून प्रवास करावा लागतो. आता तुम्हाला जर सोप्पा मार्ग निवडायला गेलात तर तुम्ही हेलिकॉप्टर किंवा खेचर या दोन्ही पैकी एक ऑप्शन निवडू शकता.

३. कॅरीगुलेन आयलंड, फ्रान्सचे दक्षिणी व अंटार्क्टिक भूभाग

हिंदी महासागरात व अंटार्क्टिका जवळ असलेल्या कॅरीगुलेन बेटांना ‘उजाड प्रदेश’ म्हणून ओळखलं जातं. या बेटांवर जाण्यासाठी वर्षातून फक्त ४ बोटी पाठवल्या जातात. हे बेट मानवी लोकवस्तीपासून ३,२१८ किलोमीटर लांब वसलेलं आहेत. त्यामुळे हा भाग जगापासून जवळजवळ तुटलेला आहे असं आपण म्हणू शकतो. वर्षातील तब्बल ३०० दिवस या भागात पाउस, हिमवर्षाव आणि वादळ थैमान घालत असतात.

४. सोकोत्रा बेट, येमेन

येमेन पासून समुद्रात २११ किलोमीटर दूर असलेल्या द्वीपसमूहांपैकी एक म्हणजे सोकोत्रा बेट. सोकोत्रा या  द्वीपसमूहांमध्ये सर्वात मोठं बेट आहे. जवळजवळ ९५% जागा सोकोत्राने व्यापली आहे. सोकोत्रा बाकी जगापासून किती तुटलेला आहे हे पुढील उदाहरणावरून तुम्हाला दिसेल : सोकोत्रावर आढळणाऱ्या एक तृतियांश वनस्पती ह्या जगभरात कुठेही आढळत नाहीत !!  

सोकोत्राला भेट दिलेल्या पर्यटकांनी त्यांचा अनुभव सांगताना म्हटलंय, “सोकोत्रा बेटावर जाणे म्हणजे जणू दुसऱ्या ग्रहावर जाण्यासारखे आहे.”

सोकोत्राला भेट देण्यासाठी समुद्र हा पहिला मार्ग आहे. पण हा मार्ग खडतर आहे राव. कारण येमेन भागात वर्षातून २ वेळा मान्सून येतो. त्यामुळे समुद्रावरून प्रवास करणे कठीण होते. यातूनही मार्ग निघू शकतो पण आणखी एक समस्या म्हणजे ‘समुद्री चाचे’. हे लुटारू कधी हल्ला करतील याचा नेम नाही.

आता दुसरा मार्ग उरला विमानाचा. सध्या येमेन भागात चाललेल्या यादवी युद्धामुळे ते जवळजवळ अशक्य झालेलं आहे. सर्व परिस्थिती निवळण्यासाठी आणखी काही वर्ष जातील.

५. मोटाऊओ काउंटी, चीन

पूर्वीचा तिबेट आणि आताच्या चीनच्या दक्षिणेकडील हिमालयाला खेटून असलेल्या भागात ‘मोटाऊओ काउंटी’ हा प्रदेश आहे. हा प्रदेश जगातील अत्यंत दुर्गम भागांपैकी एक मानला जातो. ‘मोटाऊओ काउंटी’ पर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग तयार केलेला नाही. चीन मधला हा एकमेव भाग आहे जिथे प्रवासासाठी एकही रस्ता नाही. याचं कारण म्हणजे इथलं वातावरण. हिमवर्षावाचं तांडव इथे सतत चालू असतं. काही वर्षांपूर्वी चीनी सरकारकडून रस्ते बांधणीचा प्रयत्न झाला होता पण निसर्गाच्या प्रकोपापुढे सारे प्रयत्न फोल ठरले.

मोटाऊओ काउंटीला जाण्यासाठी हिमालयातून प्रवास करावा लागतो. त्यानंतर ३२१ किलोमीटर लांब असलेला झुलता पूल ओलांडून मोटाऊओ काउंटीला पोहोचता येते.

सबस्क्राईब करा

* indicates required