computer

आयपीएलमध्ये शतक ठोकणारे टॉप ५ तरुण खेळाडू !!

टी ट्वेन्टी हा तरुणांचा खेळ समजला जातो. याला कारणही तसेच आहे. अतिशय वेगाने धावा गोळा करणे आणि विकेट मिळवणे यासाठी इथे स्पर्धा लागलेली असते. त्यात आयपीएल म्हटले म्हणजे जबरदस्त थरार असतो. आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंमध्ये तरुण खेळाडूंचा भरणा जास्त असतो. पुढे जाऊन यातले काही राष्ट्रीय संघात चमकतात तर काही बाहेर फेकले जातात. आज आपण आयपीएलमध्ये शतक करणाऱ्या टॉप ५ तरुण बॅट्समन्सची ओळख करून घेणार आहोत. 

१. मनीष पांडे

मनीष पांडे हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय आहे. २००९ च्या आयपीएलमध्ये त्याने शतक केले होते. RCB कडून खेळताना डेक्कन चार्जर्स विरुद्ध फक्त ७३ बॉल्सवर १० चौकार आणि ४ षटकार मारत त्याने नाबाद ११४ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याचे वय फक्त १९ वर्षे २५३ दिवस होते. आज १२ वर्षांनंतर देखील त्याचा विक्रम तुटलेला नाही.

२. ऋषभ पंत

दिल्ली कॅपिटल्सचा सध्याचा कॅप्टन ऋषभ पंत या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. २०१८ सालच्या सिजनमध्ये त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध फक्त ६३ बॉल्सवर तब्बल १५ चौकार आणि ७ षटकारांची उधळण करत नाबाद १२८ धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याचे वय फक्त २० वर्षे २१८ दिवस होते.

३. देवदत्त पडिक्कल

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा तरुण चेहरा देवदत्त पडिक्कल याने २१ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना ५२ बॉल्सवर नाबाद १०१ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ११ चौकार आणि ६ षटकार ठोकले. यावेळी त्याचेही वय २० वर्षे २८९ दिवस एवढे होते.

४. संजू सॅमसन

ऋषभ पंतप्रमाणे विकेटकीपर आणि राजस्थानचा कॅप्टन असलेला संजू सॅमसन याने या सिजनमध्ये शतक ठोकले होते. पण त्याही आधी त्याने २०१७ साली दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना रायजिंग पुणे सुपरजायंट या संघांविरुद्ध खेळताना ६३ बॉल्सवर ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी केली होती. यावेळी त्याचे वय २२ वर्षे १५१ दिवस एवढे होते. 

५. क्विंटन डी कॉक

या यादीत सर्वाधिक भारतीय असले तरी एका साऊथ आफ्रिकन खेळाडूला देखील यात स्थान मिळवता आले आहे. डी कॉक याने २०१६ साली दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ५१ बॉल्सवर १०८ धावा केल्या होत्या. यावेळी त्याचे वय २३ वर्षे १२२ दिवस होते.

 

क्रिकेटबद्दल अशी आणखी कोणती माहिती तुम्हाला वाचायला आवडेल, हे आम्हांला जरूर कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required