computer

काही वेगळे राष्ट्रध्वज!! देशाची मूल्यं, स्वातंत्र्यलढा आणि कायकाय दडलेलं असतं या ध्वजांत!!

प्रत्येक देशाचा एक राष्ट्रध्वज असतोच. हा राष्ट्रध्वज देशाची विविध प्रकारच्या मूल्ये प्रतिकात्मकरित्या जगापुढे मांडतो. आपल्या देशातल्या महत्त्वाच्या आदर्शांचे आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व हा ध्वज करत असतो. त्यामुळे ध्वजाची रचना, रंग, त्यावरची प्रतिकं या सगळ्यांमागे बरीच विचारप्रक्रिया दडलेली असते. याच विचारातून आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही वेगळ्या प्रकारच्या राष्ट्रध्वजांविषयी माहिती घेऊन आलेलो आहोत..

१. गुआम - ग्वाम

एखाद्या गोवा किंवा तशा ठिकाणचा वाटावा अशा टी-शर्ट डिझाईनसारखा ग्वाम देशाचा राष्ट्रध्वज दिसतो. पण दिसतं तसं नाहीय. या ध्वजावरच्या चित्रात अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहेत. या ध्वजाच्या चारी बाजूची लाल रंगाची चौकट दुसर्‍या महायुध्दात आणि स्पॅनिश युध्दात केलेले नागरिकांचे बलिदान दर्शवते. ध्वजाच्या मध्यभागी असणारी आकृती आहे देशाच्या कोट ऑफ आर्म्सची आहे. त्यात दिसणारे छोटे जहाज आणि पाम वृक्ष ग्वामच्या भौगोलिक प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे.

२. किर्गीझिस्तान

या ध्वजात तुम्हाला लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर सूर्य दिसेल. हा लाल रंग पराक्रम आणि वीरता यांचे प्रतिक आहे आणि सूर्य भरभराट आणि शांतता यांचं. या ध्वजावरची सूर्याची ४० किरणे ही स्वातंत्र्यासाठी लढलेल्या चाळीस आदिवासी समूहांचे प्रतिनिधीत्व करतात.

३ सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक

१९५८ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या देशाने स्वीकारलेल्या या राष्ट्रीय ध्वजात चार आडवे पट्टे आणि एक उभा लाल पट्टा आखलेला दिसतो. यांपैकी पांढरा-निळा पट्टा फ्रान्स, तर हिरवा- पिवळा पट्टा आफ्रिका दर्शवतो. उभा लाल पट्टा या दोन्ही देशांतल्या समानतेचे प्रतिक आहे. कोपर्‍यातला पंचकोनी तारा स्वातंत्र्याचे प्रतिक आहे.

४ नॉर्दन मरीआना आयलंड

हा ध्वज आणि त्यावरची चिन्हे समजण्यास थोडी कठीण आहेत. मध्यभागी असलेला दगडी स्तंभ चामोरा आदिवासींचे प्रतिनिधीत्व करतो. कॅरोलीनियन या दुसर्‍या आदिवासी जमातीचे चिन्ह म्हणजे त्यावर दिसणारे फुलांचे चक्र आहे. त्यावर दिसणारा तारा अमेरिका दर्शवतो, तर ध्वजाचा निळा रंग प्रशांत महासागराचे प्रतिनिधीत्व करतो.

५ मोझांबिक :

या देशाचा ध्वज अनेक वेगवेगळ्या चिन्हांनी या राष्ट्राच्या अनेक प्रतिके दाखवतो. हिरवा रंग प्रादेशिक समृध्दी तर पिवळा रंग वेगवेगळ्या खनिजांनी समृध्द भूप्रदेश दाखवतो. पांढर्‍या बारीक पट्ट्या अर्थातच शांततेचे प्रतिक आहे. डाव्या बाजूचा लाल रंग लढ्याचे प्रतिक आहे तर बंदूक हे शस्त्रसज्जता आणि सुरक्षेचे प्रतिक आहे. त्यावरील ग्रंथ शिक्षणाचे महत्व सांगतात, तर फावडे कृषीप्रधानता दाखवते. तारा हे मार्क्सिस्ट तत्वज्ञानाचे चिन्ह आहे. इतके वेगवेगळे विचार एकाच ध्वजात फारच कमी दिसतात.

६ बर्म्युडा :

हा देश एकाच वेळी अनेक वेगवेगळे ध्वज वापरतो. बर्म्युडाच्या एका राष्ट्रीय ध्वजात पार्श्वभूमीवर निळा, तर दुसर्‍यात लाल रंग आहे. तिसऱ्या ध्वजात म्हणजे इंग्लंडच्या ध्वजाच्या मधोमध बर्म्युडाचे चिन्ह आहे. पण या सर्वात एक समानता आहे. सर्व ध्वजांत युनियन जॅक आहे. हा युनियन जॅक बर्म्युडावर असलेल्या ब्रिटनच्या अधिपत्याचे चिन्ह आहे, तर जहाजांचे प्रतिक त्यांच्या समुद्री परंपरेचे चिन्ह आहे.

तर वाचकहो, राष्ट्रीयत्व, जुनं अधिपत्य, स्वातंत्र्यलढा, राष्ट्राचं उद्दिष्ट अशा बऱ्याच गोष्टींचा कुठेना कुठे तरी उल्लेख प्रत्येक ध्वजात दिसतो. येत्या काही दिवसांत आपण अशा काही आणखी ध्वजांची ओळख करून घेऊ.

 

लेखक : रोहित लांडगे

 

आणखी वाचा :

या ११ देशांच्या ध्वजांचा सारखेपणा पाहून चक्रावून जाल...पाहा बरं भारताचा ध्वज कोणत्या देशाने ढापलाय ते !!

सबस्क्राईब करा

* indicates required