computer

तुम्ही कोडं सोडवता? त्याचे हे ७ वेगवेगळे फायदे तुम्हांला माहित आहेत का?

तुम्ही कधी कोडं सोडवलं आहे?
तुम्ही नक्की म्हणाल, "हा काय प्रश्न झाला?"
विद्यार्थीदशेत असतानापासून निवृत्तीच्या वयापर्यंत कोडी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून राहतात. आख्खं कुटुंब वृत्तपत्रातील कोडं सोडवण्यात रंगलंय हे दृश्य आपल्यासाठी नवीन नाही. प्रवासात एकटं असताना गाडी बंद पडली तर वेळ कसा घालवायचा हा प्रश्न कोड्याने सोडवला आहे. ‘याचं उत्तर सांग’ म्हणत आपण कित्येकदा आपल्या शाळासोबत्यांना पिडलं आहे. शब्द कोडी, जिग-सॉ, सुडोकू, नकाशा जुळवणे, जादुई चौरस अशी किती कोडी आहेत ज्यांनी केवळ आपला वेळच घालवला नाही तर आपला मेंदू तरतरीत ठेवला आहे.

चला बघू या कोडयांचा इतिहास आणि कोडी सोडवत राहण्याचे काय काय फायदे आहेत.
कोडयांचा उगम कधी झाला हे नक्की सांगता येणार नाही. परंतु प्राचीन काळापासून कोडी अस्तित्वात आहेत. आधुनिक काळात त्यांचं स्वरुप बदललं आहे. लहान मुलांच्या चांदोबामधल्या गोष्टीत वेताळ कायम विक्रमाला कोडयात टाकतो. काही दंतकथात गावात प्रवेश करणाराला वेशीवर अडवून कोडी घालून त्याचं उत्तर प्रवासी देऊ शकला तरच त्याला प्रवेश नाहीतर त्याचा मृत्यू असं अडचणीत आणणाऱ्या स्फिंक्सचा उल्लेख आहे. बायबलमध्ये देखील कोड्यांचा उल्लेख आढळतो.. सायप्रसमध्ये ख्रिस्तपूर्व १७०० च्या काळात पझल जग्जचा उदय झाला, तर ७०० ख्रिस्तपूर्व या काळात चीनमध्ये जादुई चौरस या कोडे प्रकाराला सुरुवात झाली. जिग सॉ कोडे आधुनिक काळात १७६७मध्ये जॉन स्पिल्सबरीने आणले. शब्दकोडे सर्वप्रथम १९१३ मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. रूबिक्स क्यूब हा प्रकार १९७४ मध्ये उदयास आला.कोडयांचे असे खूप विविध प्रकार आहेत. वाढीच्या प्रक्रियेत ही कोडी लहान मुलांच्या मेंदूला चालना देण्यासाठी खुप फायदेशीर ठरली आहेत हे खरं असलं तरी प्रौढ व्यक्तींना देखील यांचा कसा फायदा झाला आहे ते पाहू या.

१. कोडी म्हणजे मेंदूला व्यायाम –
आपल्याला माहीत आहे की आपला मेंदूचे दोन अर्धगोल आपल्या क्रिया नियंत्रित करतात. मेंदूची डावी बाजू आपल्याला तर्क नि विश्लेषण करायला शिकवते. उजवी बाजू सर्जनशीलता सांभाळते. जेव्हा तुम्ही कोडं सोडवत असता तेव्हा मेंदूच्या दोन्ही बाजू कार्य करत असतात. शरीराच्या अवयवांचे कार्य सुरळीत व्हावे म्हणून आपण वेगवेगळे व्यायाम करतो. कोडी सोडवताना मेंदूला असाच व्यायाम मिळतो.

२. कोडी सोडवल्याने स्मरणशक्ती वाढते. –
जिग सॉ पझल सोडवताना आपण आपली स्मरणशक्ती वापरतो. आपल्या हातातील तुकड्यांचे आकार ध्यानात ठेवून ते कुठं फिट बसतील याचा अंदाज करतो. आपल्या मेंदूतील पेशी एकमेकींशी कनेक्टेड राहतात, नविन पेशींची निर्मिती करतात. कोडं सोडवताना वापरल्या जाणाऱ्या स्मरणशक्तीचा उपयोग वाढत्या वयात होतो. जे सतत कोडी सोडवत असतात त्यांना पुढं अल्झायमर्स हा स्मृतीवर हल्ला करणारा आजार होत नाही.

३. समस्येवर उपाय शोधण्याची सवय लागते –
आयुष्यात येणारी संकटे, अडचणी हे कोडयांपेक्षा काय वेगळे असतात? कोडी सोडवत असताना जो संयम आपण वापरतो तो अशा वेळी कामी येतो. कोडी सोडवताना वापरून तीक्ष्ण झालेली तर्कशक्ती खऱ्या समस्या सोडवताना अधिक तल्लख होते. कोडी सोडवणे हे एक प्रकारचे प्रशिक्षण असते आयुष्याच्या कोडयाचे उत्तर शोधण्याचे. आपण चुकांमधून शिकतो, नविन सूत्रे वापरतो, एक सूत्र चुकलं तर दुसरे वापरतो.

४. बुद्धीचा वापर करण्याची सवय लागते –
कोडी सोडवताना मेंदू सतत सतर्क असतो. डोळे, मेंदू सतत काम करत असतात. बाह्य नि अंतर्गत अवयव एकमेकांशी ताळमेळ राखून काम करतात. हीच सवय समोर कोडं नसताना पण एखाद्या समस्येवर उपाय शोधताना उपयोगी पडते.

५. मनुष्य प्रफुल्लित राहतो –
हे सिद्ध झाले आहे की कोडं सोडवत असताना शरीरातील डोपामाईनच्या पातळीत वाढ होते. डोपामाईन तुमच्या मूडमध्ये सकारात्मक बदल घडवून आणते. कोडं सोडवण्यात मिळालेल्या प्रत्येक यशानंतर डोपामाइनची निर्मिती होते. परिणामस्वरुप मनुष्य आनंदी राहतो. कोडं सोडवणं मेंदूला शीण आणणारं आव्हान न वाटता मजा वाटू लागते.

६. तणाव कमी होतो –
आधुनिक जगात जगताना इतक्या समस्या नि आव्हानांचा सामना करावा लागतो की त्यातून बाहेर पडण्यासाठी माणसे सायकीॲट्रिस्टकड़े जातात. काही औषधांचे साईड इफेक्ट्स असतात. त्यातून वेगळे प्रश्न उभे राहतात. मनाच्या आजारातून उद्भवणारे शारीरिक आजार, त्यातून पुन्हा होणारे मानसिक आजार हे चक्र थांबत नाही. त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मनावर उपचार होऊ शकतात. कोडी सोडवत असताना मन फक्त कोडयावर केंद्रित झाल्याने मन खिन्न करणार्या इतर गोष्टीवरून लक्ष ढळते. कोडी सुटली की मिळालेल्या यशाच्या निर्भेळ आनंदाने मन प्रसन्न होते. पोखरत राहाणार्या चिंता काळज्या मोठ्या वाटत नाहीत. म्हणून कोडी सोडवणे ही एक प्रकारची ताणतणाव कमी करणारी विपश्यनाच आहे.

७. कोडी सोडवल्याने बुद्ध्यांक वाढतो –
कोडं सोडवणे हे बुद्धीचे काम आहे. त्यामुळे बुद्धीला खाद्य मिळते, व्यायाम मिळतो. स्मरणशक्ती सुधारते. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते. शब्दसंग्रह वाढतो. तर्काच्या कसोटीवर गोष्टी तपासून पाहण्याची सवय लागते. मिशिगन विद्यापिठात झालेल्या सर्वेनुसार दिवसातून रोज २५ मिनिटे कोडं सोडवलं तर बुद्ध्यांक चार पॉइंटने वाढतो.

बघितलं? कोडी सोडवत राहण्याचे किती फायदे आहेत?
डॉक्टरांकडं न जाता मन आणि शरीर निरोगी राहत असेल तर का्य हरकत आहे कोडी सोडवायला ? नुसतं हेच नाही बरं का...! लोक तुम्हाला हुशार माणूस म्हणून पण ओळखायला लागतील बरं का ! आणि हो, एखादं जम्बो कोडं सोडवलं तर बक्षिसाची लट्ठ रक्कम मिळून लखपती व्हायचे पण चान्सेस’ आहेत. चला तर मग, आजपासून निश्चय करा..
रोज एक तरी कोडं सोडवायचं !

सबस्क्राईब करा

* indicates required