computer

या ७ वनस्पती चक्क मांस खातात?

प्रामुख्याने सर्व प्राणी हे अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात. पण काही अश्याही वनस्पती आहेत ज्या प्राण्यांवर अवलंबून असतात. आता तुम्ही म्हणाल वनस्पती स्वत:चे अन्न क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्याच्या साहाय्याने तयार करतात. अगदी बरोबर, परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि हे अन्न त्यांना कीटक वा अन्य प्राण्यांकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. जसे आपण nutrition suppliment घेतो तसेच. 

या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती’ असे म्हणतात. मांसाहारी म्हणजे लहान किडे, कीटक हे यांचे भक्ष्य असतात. बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत दिसतात. यांच्या जवळपास ७०० जाती आहेत. 

आजच्या लेखातून यातल्या प्रमुख मांसाहारी वनस्पती पाहूया.

डायोनिया मसायपुला (व्हीनस फ्लाय ट्रॅप)

या वनस्पतीच्या पानावर कीटक आला की पानावर असलेले पात्याचे भाग शिंपल्याप्रमाणे मिटतात. त्यामध्ये कीटक अडकतो. कीटक पकडला गेला की, ग्रंथीमधून पाचक स्राव सुरू होतो. कीटक मरतो. त्यामुळे कीटकाचे पचन होऊन उपयुक्त भाग पानांकडून वनस्पतीच्या वाढीसाठी शोषला जातो. कीटकाचे पचन झाल्यावर सापळा परत उघडतो. असे दोन-तीन वेळा झाल्यावर तो कीटक काळा पडून सुकून जातो. ही कीटकभक्षक वनस्पती अमेरिकेत कॅरोलायना राज्याच्या काही भागांत सापडते.

बायब्लिस (इंद्रधनुषी वनस्पती)

बिब्लिस ही रंगबेरंगी वनस्पती आहे. तिला इंद्रधनुष्य वनस्पती देखील म्हणतात. ती लहान झुडूपा एवढी वाढते परंतु कधीकधी तिची उंची ७० सेंटीमीटरपर्यंत पोहोचू शकते. याला जांभळी फुले येतात. कीटक रंगाकडे आकर्षित होऊ येतात.परंतु यावर एक चिकट द्रव पानाच्या केसांवर टोकाच्या बाजूस असतो. तो चिकट द्राव किड्यांना अडकवतो. हा एक सापळा असतो. एकदा किडा अडकला की तो मरतो आणि त्याच्या उपयुक्त भागाचे पचन होते. कीटकांचा कडक आवरण नंतर बाहेर फेकले जाते.  उत्तर व पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या दलदली भागात  ही वनस्पती आढळते.

ड्रॉसेरा बर्मानाय (‘सन ड्यू’)

एखादा कीटक या वनस्पतीच्या पानावर बसला की, पानावरचे केस आतल्या बाजूस वळतात आणि कीटक पकडला जातो. या वनस्पतींच्या पानाचा आकार चमच्यासारख्या असतो. त्याच्या पात्यावर लाल व जाड टोकाचे केस असतात. या केसांवर व टोकावर चिकट द्रवाचे आवरण असते व ज्यामुळे कीटक अडकण्यास मदत होते. हे चिकट बिंदू उन्हात दवबिंदूप्रमाणे चकाकतात. म्हणून याला इंग्रजीत ‘सन ड्यू’ असेही म्हणतात.

ही वनस्पती महाराष्ट्रातही पाहायला मिळते. दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते.

पिचर (कलशपर्णी)

ही वनस्पती लहान झुडूप किंवा वेलीच्या स्वरूपात असते. तिचे पान घटासारख्या कलशाच्या आकारात असतात. छोट्याशा पानांचे पाते गोलाकार असून त्याच्या कडांवर टोकदार दातांसारखे काटे असतात. कीटकांच्या स्पर्शाने दात मिटतात आणि कीटक पकडले जातात. वनस्पतींच्या पाचक रसाने या कीटकांचे पचन केले जाते. तिच्या १२० जातींपैकी बहुतेक आग्नेय आशियातील बोर्निओ, सुमात्रा, फिलिपीन्स इ. प्रदेशांत आढळतात. या वनस्पतीचा एक प्रकार ईशान्य भारतातील आसामच्या डोंगराळ प्रदेशातील जंगलात सापडतो.

युट्रिक्युलॅरिया व्हलगॅरिस (Utricularia vulgaris)

या वनस्पतीच्या छोट्याशा पानांवर सापळे तयार होतात. सापळ्याच्या टोकास झडप असते. तोंडावर असलेल्या केसांमुळे झडप उघड-बंद होत असते. उघड्या दारातून कीटक आत आला की, झडप बंद होते आणि कीटक पकडला जातो. या कीटकांचे नंतर पचन होऊन आवश्यक पदार्थ ग्रंथींकडून वनस्पतीसाठी शोषले जातात. ही वनस्पती पावसाळ्यात झाडाच्या बुंध्यावर, भिंतीवर तसेत पाणथळ भागात वाढतात. युट्रिक्युलॅरियाच्या सापळ्यामध्ये डासांच्या अळ्याही सापडतात. या आशिया तसेच अमेरिकेत आढळतात.

सारॅसेनिया (जांभळ्या रंगाचा पिचर प्लांट )

सारॅसेनिया पर्प्युरीया (Sarracenia purpurea) हे  जांभळ्या रंगाचा पिचर सर्रासेनियासी कुटुंबातील एक मांसाहारी वनस्पती आहे. सारॅसेनिया ह्या झाडाला कोबीसारखी पानांमधून पाने वाढतात. आतल्या फनेलसारख्या भागात ही वनस्पती सापळा बनवते. काठाजवळ, पाने विस्तृत होतात आणि एक छत्री सारखा आकार तयार करतात. ही कीटकांना एका विशिष्ट सुगंधाने आकर्षित करते. एकदा कीटक अडकला की त्याला चिकट पृष्ठभागावरून हलता येत नाही. त्यामुळे कीटक मरतात आणि फुलांममध्ये शोषतात. अमेरिकेत हे सर्वाधिक आढळतात. तिथे घरातही ही वनस्पती ठेवली जाते. कोळी, अळ्या, छोटे किडे हे त्यात अडकतात.

कोब्रा लिली / डार्लिंगटोनिया कैलीफोर्निका (Darlingtonia californica)

या वनस्पतीच्या वरच्या पानाचा आकार कोब्रा सापाने काढलेल्या फण्यासारखा असतो. या फुगलेल्या भागातून आत जाणार एक निमुळता रस्ता असतो जिथे कीटक येऊन बसतात. एकदा कीटक बसले की फसतात कारण त्या रस्त्याचा बाहेर जायचा मार्ग आपोआप बंद होऊन जातो. म्हणजे समजा आपण एक गुहेत गेलो आणि बाहेरचा दरवाजा बंद झालाय. अगदी तसंच त्या किड्याचं होतं आणि तो आत मरून जातो आणि वनस्पती त्यातील हवे ते घटक शोषून घेते.उत्तर कॅलिफोर्नियात ही वनस्पती आढळते.
 

याशिवाय ड्रॉसोफायलम, सेफॅलोटस, पिंग्विक्युला, बायोव्ह्युलॅरिया, हेलिअँफोरा, पॉलिपोंफोलिक्स, जेनेलिसिया इ. प्रजातींतील कीटकभक्षक वनस्पती जगाच्या निरनिराळ्या भागांत आढळून येतात. 

(ड्रॉसोफायलम)

या कीटकांची शिकार करून त्यापासून नायट्रोजनाचे प्रमाण जास्त असलेली संयुगे किंवा क्षार बनतात. ती वनस्पतींकडून शोषली जातात. अशा तर्‍हेने वनस्पतीला प्राणिज प्रथिने मिळतात. परंतु ज्या वनस्पतीत पाचक रस स्रवले जात  नाहीत. त्यांच्यात पकडलेले कीटक जीवाणूंमुळे कुजतात व नंतर ते शोषले जातात. कठीण भाग बाहेर टाकले जातात.  ज्या वनस्पती नायट्रोजनचे प्रमाण जास्त असलेल्या मातीत किंवा गाळात वाढतात त्यांना  कीटक पकडण्याची गरज पडत नाही.

माहिती आवडल्यास शेयर करण्यास विसरू नका.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required