computer

या आजी गेल्या ७९ वर्षापासून विजेशिवाय राहत आहेत...कारण वाचून तुम्ही त्यांना सलाम कराल !!

मंडळी, सोशल मिडीयावर अधून मधून एक फोटो फिरत असतो. एक नयनरम्य ठिकाणी घर दाखवलेलं असतं आणि खाली लिहिलेलं असतं “तुम्हाला अमुक अमुक पैसे दिले तर वीज, इंटरनेट शिवाय तुम्ही या ठिकाणी राहू शकाल का ?”....

आपल्यातले बरेचजण “हो” म्हणून टाकतात पण हे खरंच शक्य आहे का ? इंटरनेटचं सोडा पण विजेशिवाय आपण जगू शकतो का ? राव, चार्जिंग पॉईंटसाठी भांडत बसणारे आपण विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही.

आज एका अशा व्यक्तीला भेटूया जी वयाची ७९ वर्ष विजेशिवाय जगत आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती आपल्या पुण्यातली आहे.

डॉक्टर हेमा साने (वय वर्ष ७९) या पुण्याच्या बुधवार पेठ भागात राहतात. त्यांचं घर अगदी साधं आहे. घराचा परिसर झाडांनी वेढलेला आहे आणि आजही तिथे वेगवेगळ्या पक्षांचा वावर असतो. त्यांच्या घरात सुरुवातीपासून वीज नाहीय. या गोष्टीसाठी लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, पण त्यांचा या मागचा विचार आपल्यालाच नवीन धडा देणारा आहे.

त्या म्हणतात की “अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजा आहेत. वीज ही नंतर उत्पन्न झालेली गरज आहे. मी विजेशिवाय जगू शकते”

डॉक्टर साने यांच्याकडे एक कुत्रा आहे आणि दोन मांजरी आहेत. त्या म्हणतात “की माझं घर या प्राण्यांचं, पक्षांचं आणि झाडांचं आहे. मी फक्त त्यांची काळजी घ्यायचं काम करत आहे.” लोकांनी त्यांना घर विकून भरपूर पैसा कमवायचा सल्ला दिला तेव्हा त्यांनी लोकांना उलट प्रश्न विचारला की “मी निघून गेल्यावर त्यांचा सांभाळ कोण करणार ?”

डॉक्टर साने यांनी पुणे विद्यापीठातून वनस्पतीशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. पुढे त्यांनी पुण्याच्या गरवारे कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यांनी आजवर वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरणावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. आजही त्यांनी आपलं लिखाण थांबवलेलं नाही.

आपल्या वेगळ्या जीवनपद्धतून त्यांना कोणताही संदेश अथवा धडा द्यायचा नाही. त्या म्हणतात की मला बुद्धाचं तत्वज्ञान स्मरत राहतं “स्वतःचा मार्ग स्वतः शोध”....

तर मंडळी, डॉक्टर साने यांचा विचार तुम्हाला पटतो का ? तुमचं याबद्दल काय मत आहे ? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required