हे स्टिकर तुम्हाला आठवतात का? जाणून घ्या या स्टिकरचं आणि आजच्या दिवसाचं महत्व..

आपण शाळेत असताना वही, पुस्तक यांच्यावर लावायला वेगवेगळ्या प्रकारची स्टिकर मिळायची, त्यातही डिसेंबर महिन्यात चक्क शाळेतल्या बाई एक स्टिकर विकायच्या. एक किंवा दोन रुपये किंमत असलेलं हे स्टिकर काहीतरी भारतीय सैन्याचं आहे एवढंच मला तेव्हा कळायचं. तुमच्याकडेही असायची का ही स्टिकर्स? तुम्हीही इतरांना ही अशी स्टिकर्स विकली होती का? या झेंडा विकत घेण्यामागे काय कल्पना होती हे कळतं नव्हतं, पण हे स्टिकर घेऊन आपणच सैन्यात आहोत या थाटात फिरणं लै भारी होतं.
आज हे सगळं आठवण्याच कारण म्हणजे ज्या स्पेशल दिवसासाठी हे झेंडे वाटले जायचे, तो सशस्त्र सेना झेंडा दिवस आज आहे. 7 डिसेंबर 1949 पासून दरवर्षी हा दिवस साजरा कारण्यात येतो. या मागचं लॉजिक एकदम सोपं आहे, ह्या दिवशी आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी देशातल्या जनतेकडून पैसे गोळा करायचे.
मूळ उद्देश पैसे गोळा करायचा होता, त्यावर मग सोपा उपाय शोधण्यात आला. स्पेशल रंगाचा भारताचा झेंडा, लेबल, स्टिकर लोकांमध्ये विकायचे. त्यातून गोळा झालेली रक्कम ही आर्मड फोर्सेस फ्लॅग फंडमध्ये जमा करण्यात येते. आणि त्यातलीच आपल्या आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबासाठी विविध योजनात वापरली जाते.
गेल्या काही वर्षात या दिवसाचे स्टिकर दिसणं बंद झालंय, कदाचित हा आपल्या आजूबाजूला होणाऱ्या बदलाचा भाग असावा. आजचा जमाना हा सोशल मीडियावर लाईक गोळा करण्याचा आहे. पण गेल्या काही दिवसात बँकांच्या रांगेतल्या लोकांना सैनिकांची उदाहरणे देणाऱ्या लोकांनी प्रत्येकी दहा स्टिकर घेऊन आपल्या देशाच्या सैनिकाबद्दल खरा आदर दाखवला तर भारी मज्जा येईल.