तजेलदार आणि तरुण-सुंदर त्वचेसाठी ८ सोपे उपाय. यातले तुम्ही काय काय करता?
जगभरातील विज्ञान दिवसेंदिवस पुढे जात आहे. अशक्य वाटणाऱ्या नवनवीन गोष्टी आता खऱ्या होत आहेत. भविष्यात तर वयाची वाढ थांबवता येईल असेही शास्त्रज्ञ दावा करतात. म्हणजे म्हातारे होण्याचा प्रश्नच नाही. तरी अजून असा शोध लागायचा आहे. म्हणून लवकर म्हातारपण नको असेल तर आपल्यालाच सध्यातरी काळजी घ्यावी लागेल. पण सध्याचे जग धकाधकीचे आहे. यामुळे कितीही केले तर विशीतच तिशीचे दिसणे आणि तिशीत चाळीशीचे वय वाटणे असा प्रकार होतो. पण हे टाळायचे असेल आणि आपण नेहमी तजेलदार दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर खाली दिलेल्या काही गोष्टी पाळा. तुम्हाला बदल नक्की दिसेल.
१) उन्हापासून बचाव
सूर्याचे किरण एका वेळेपर्यंत शरीरासाठी चांगले असतात. पण दुपार झाली की मग हीच किरणे आपल्यासाठी धोकादायक ठरतात. सतत उन्हात राहिल्याने त्वचा कोरडी पडणे, चेहरा काळवंडणे, काळे डाग, वांग अशा अनेक समस्या उभ्या राहू शकतात. म्हणून गरज नसेल तेव्हा उन्हापासून बचाव करणे हे शरीरासाठी महत्वाचे आहे. यासाठी सनस्क्रीन वापरणे ही देखील चांगली गोष्ट आहे.
२) पुरेशी झोप
कोणी काहीही म्हटले तरी शरीराला साधारण ७-८ तास झोप गरजेची असते. झोप पूर्ण होणे हे आपण शारीरिक आणि मानसिक दोन्हीरित्या ताजेतवाने राहण्यासाठी गरजेचे असते. झोप बिघडणे म्हणजे पुढचा पूर्ण दिवस बिघडणे. म्हणून चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.
३) मॉईश्चरायझरचा वापर
मॉईश्चरायझर चेहऱ्याची स्किन मऊ आणि तजेलदार ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. चेहऱ्यावर येऊ शकणाऱ्या अनेक समस्या यामुळे आधीच रोखल्या जातात.
४) तणाव कमी करणे
सध्या जगात जे काही चालले आहे त्यावरून हे तर कळते की तणाव पूर्णपणे नाहीसा करणे काहीसे कठीण आहे. तरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून तणाव व्यवस्थापन केले तर यामुळे त्याचा शरीरावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करता येऊ शकतो. तणावामुळे डोळ्याखाली काळे डाग होणे, त्वचा कोरडी होणे असे प्रकार होतात.
५) समतोल आणि चौरस आहार
आता फास्टफूड आणि बाहेरचे खाणे याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यापेक्षा फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आहारात असेल तर त्याचा फायदा शरीर निरोगी राहण्यासोबतच चेहरा तरुण राहण्यासाठी देखील होत असतो.
६) दारू आणि सिगारेट टाळणे
कमी प्रमाणात दारू घेतली तर शरीरासाठी चांगली असते असं कोणी म्हणत असेल तर त्याला आधी नमस्कार करावा. दारू आणि सिगारेट डोक्याच्या केसांपासून तर त्वचेपर्यंत सर्वच बाजूने धोकादायक असतो. हाच पैसा स्वतःच्या आरोग्यासाठी वापरला तर तरुण राहणे अधिक सोपे होईल.
७) नियमित पाणी पिणे
पाणी आणि स्वच्छ त्वचा याचा थेट संबंध आहे म्हणून नियमित पाणी पीत राहायला हवे. हायड्रेटेड राहणे आपले पोट साफ ठेवते, ज्यामुळे त्वचा देखील स्वच्छ राहण्यास मदत होते.
८) व्यायाम
नियमित व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होऊन शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. शरीर दीर्घकाळ तरुण राहण्यात व्यायामाचा मोठा वाटा असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
वरील सर्व गोष्टींचा योग्य रीतीने उपयोग केला तर आपले शरीर आणि त्वचा अधिक काळ तरुण राहू शकते. तुम्हाला फ्रेश दिसणारे लोक देखील काही वेगळे करतात असे नाही. ते देखील याच गोष्टी करत असल्याचे तुम्हाला आढळून येईल.




