computer

ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणजे काय? या बीचच्या यादीत भारतातले ८ समुद्रकिनारे आहेत!!

गेल्या काही वर्षांतल्या नैसर्गिक दुर्घटना पाहाता जगभरात पर्यावरण आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे. भारतातदेखील स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागली आहे. याचे एक अभिमानास्पद उदाहरण समोर येत आहे.

इको फ्रेंडली, स्वच्छता आणि आंतरराष्ट्रीय प्रमानकांवर आधारित पर्यटन सुविधांनी युक्त अशा समुद्रकिनाऱ्यांची यादी केली जाते. या यादीत भारतातील ८ समुद्रकिनाऱ्यांनी जागा पटकावली आहे. या संकल्पनेला 'ब्ल्यू फ्लॅग बीच' असे म्हटले जाते.

ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणजे जगातले सर्वाधिक सुंदर समुद्र किनारे. गेल्या महिन्यात FEE (फेडरेशन फॉर एनवायरमेन्ट एज्युकेशन ) यांच्या एका ज्युरीने डेन्मार्क येथील काही शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ञांच्या एका राष्ट्रीय ज्युरीद्वारा करण्यात आलेल्या शिफारशींना योग्य ठरवत, भारतातल्या ८ समुद्रकिनाऱ्यांना ब्लु फ्लॅग बीच मध्ये जागा देण्याचे ठरवले होते.

यामध्ये कर्नाटकातले दोन समुद्रकिनारे आंतरराष्ट्रीय इको लेबल ब्ल्यू फ्लॅग मध्ये सामील आहेत. आंतरराष्ट्रीय ज्युरीने जगभरातल्या ४,६६४ समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग टॅगने सन्मानित केले आहे. यात सर्वात आघाडीवर स्पेन आहे. भारतात मात्र १ ऑक्टोबरपर्यन्त एकही समुद्रकिनारा या टॅगने सन्मानित झाला नव्हता.

भारताने मात्र आपल्या एकीकृत किनारी झोन व्यवस्थापन (ICMZ) या योजनेनुसार स्वतःचा इको लेबल BEAMS लॉंच केला होता. ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन भारताच्या ICZM योजनेनुसार करण्यात आलेल्या प्रकल्पापैकी एक होती.

या ब्ल्यू फ्लॅग बीचमध्ये येण्याचे अनेक फायदे असतात. समुद्र किनाऱ्याला कचरा मुक्त, प्लास्टिक मुक्त करणे तसेच चांगल्या सुविधा पुरविणे, पर्यटकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय प्रमाणकांनुसार सुविधांचे निर्माण करणे अशा गोष्टींच्या तेथे सोयी निर्माण करण्यात येतात.

ब्ल्यू फ्लॅग बीच यादीत स्थान मिळवलेले भारतातले ८ समुद्रकिनारे असे आहेत.

१. शिवराजपुर (गुजरात)

२. गोल्डन (ओडीसा)

३. राधानगर (अंदमान)

४. घोगला (दिव)

५. कासरकोड (कर्नाटक)

६. पदुबिद्री (कर्नाटक)

७. रुषीकोंडा (आंध्रप्रदेश)

८. कप्पड (केरळ)

दुर्दैवाने यात महाराष्ट्रातला एकही किनारा नाही. असो. किमान देशात तरी असे सुंदर समुद्रकिनारे निर्माण होत आहेत हे काय कमी आहे का? या ८ समुद्रकिनाऱ्यांसोबत भारत आता अधिकृतरित्या ब्ल्यू फ्लॅग असणाऱ्या ५० देशांमध्ये सामील झाला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required