computer

एक आठवडा, एक महिना ते एक वर्ष...सर्वात कमी काळ टिकलेले जगातील ८ देश !!

जगाच्या इतिहासात माणसाने अनेक स्वतंत्र देश स्थापन केले. अंतर्गत राजकीय कारणांमुळे बऱ्याच देशात बंडखोरी झाली. आणि बराच मोठा समूह बाहेर पडला आणि त्यांनी आपले स्वतंत्र देश स्वयंघोषित केले. पण त्यांच्याशी युद्ध करून बंडखोरी नष्ट करण्यात आली. त्यामुळे ते देश टिकले नाहीत. आजही अनेक देशाच्या सीमा बदलत आहेत. इतिहासात असे अनेक देश आहेत जे फक्त काही दिवस,महिने किंवा वर्षभरच टिकले. आज या लेखात जाणून घेऊयात त्यातील काही देशांची माहिती.

१.कार्पाथो-युक्रेन

१५ मार्च १९३९ - १६ मार्च १९३९

१५ मार्च १९३९ रोजी कार्पाथो-युक्रेन नावाच्या देशाची घोषणा झाली. स्लोव्हाकियाने स्वातंत्र्य जाहीर केल्यावर फक्त एकच दिवसात Voloshyn यांच्या नेतृत्वाखाली कार्पाथो-युक्रेन नावाच्या देशाने आपलं स्वातंत्र्य जाहीर केलं. एकच दिवसात त्यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतही तयार केले. हिटलर आणि नाझी यांच्याप्रमाणेच हंगेरीच्या नेत्यांनी, कार्पाथो-युक्रेन या नव्याने बनलेल्या देशावर दुसऱ्याच दिवशी आक्रमण केले. तेव्हा कार्पाथो-युक्रेन सरकारच्या सदस्यांनी देशातून पळ काढला. दुसर्‍या महायुद्धानंतर रशियन लोकांनी तिथे राज्य प्रस्थापित केले.

२. टांगानिका (Tanganyika)

९ डिसेंबर १९६२ - २६ एप्रिल १९६४

१८८० च्या दशकात इथे जर्मन लोकांची वसाहत होती. १९२० मध्ये जागतिक महायुद्ध संपले तेव्हा ब्रिटनने इथला ताबा मिळवला. १९६२ मध्ये ब्रिटनने टांगानिकाला स्वातंत्र्य दिले, पण ते फार काळ टिकले नाही. त्या सरकारने झांझिबारसोबत सामील होऊन  नवीन देश तयार केला. हा देश आता टांझानिया म्हणून  ओळखला जातो.

३. हवाईचे तात्पुरते सरकार (The Provisional Government Of Hawaii)

१७ जानेवारी १८९३ - ४ जुलै १८९४

या अल्पायुषी देशाचे अध्यक्ष सॅनफोर्ड बी. डोले हे होते. सुमारे शंभर वर्षे राजेशाहीला कंटाळलेल्या जनतेने  राजा डेव्हिड कलाकाऊ याला विरोध केला. १८९१ मध्ये जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याची बहीण लीली'ओकलानी हिने पदभार स्वीकारला. हवाईमधील ती पहिली आणि शेवटची महिला शासक होती. १८९३ मध्ये तिचे सरकार पडले. त्यानंतर हवाईयन सरकार पाडून टाकण्यासाठी सुरक्षा समितीच्या नेतृत्वात बंडखोरांनी हा देश ताब्यात घेतला. पण अमेरिकेने मध्यस्थी केली, कारण अमेरिकेला पॅसिफिकमधील नौदल युद्धाच्या वेळी अमेरिकेला इंधन भरण्यासाठी बंदराची गरज होती. तेव्हा १८९४ मध्ये अमेरिकन प्रजासत्ताक व हवाई यांनी नवीन सरकार स्थापन केले.

४. युनायटेड स्टेट्स बेल्जियम

११ जानेवारी १७९० – २ डिसेंबर १७९०

रोमन सम्राट जोसेफ दुसरा याने ऑस्ट्रिया नेदरलँड्सच्या बेल्जियन प्रांतांवर बरीच क्रांती घडवून आणली. अखेरीस, त्यांनी स्वतःला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित केले. बरीच शहरे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जानेवारी १७९० मध्ये स्वातंत्र्याची घोषणा केली. पण त्यांना इतर कोणत्याही देशांद्वारे फारसे स्वीकारले गेले नाही. ते अल्पकाळ टिकले. १७९० अखेरीस रोमन सम्राट लिओपोल्ड द्वितीय याने आपल्या भावाच्या मृत्यूनंतर पदभार स्वीकारला. अखेर १८३० मध्ये बेल्जियम आणि नेदरलँड्स वेगवेगळे स्वतंत्र देश झाले.

५. येमेनचे लोकशाही प्रजासत्ताक (The Democratic Republic Of Yemen)

२१ मे १९९४ – ७ जुलै १९९४

ऑगस्ट  १९९३ मध्ये  येमेन प्रजासत्ताकाचे माजी उपाध्यक्ष अली सलीम अल-बिध दक्षिणेकडील शहर अडेन येथे बंडखोरी करून पळून गेले. त्यामुळे अनेक कुरबुरी सुरू झाल्या. एप्रिल १९९४ मध्ये यमनच्या उत्तर आणि दक्षिण राज्यांमध्ये युद्ध सुरू झाले. दक्षिणेकडील राज्यांच्या प्रतिनिधींनी नावात गोंधळ होऊ नये म्हणून स्वत:ला येमेनचे लोकशाही प्रजासत्ताक घोषित केले. हे युद्ध महिनाभर चालले. शेवटी उत्तरेकडच्या सैन्याने दक्षिणेकडील सैन्याचा पराभव केला. आणि ७ जुलै १९९४ रोजी अडेन शहराला ताब्यात घेतले. आणि The Democratic Republic Of Yemen चा अंत झाला.

६. रिपब्लिक ऑफ इझो (The Republic Of Ezo)

२७ जानेवारी १८६९  - २७ जून १८६९

१८६८ मध्ये बोशीन युध्दात टोकुगावा शोगुनेटचा पराभव झाला. पण पराभूत सैन्याच्या एका गटाने शरण जाण्यास नकार दिला आणि ते इझो बेटावर पळून गेले. तिथे रिपब्लिक ऑफ इझो स्थापन झाले.  त्यावेळी जपानमध्ये मेजी सरकार होते, त्यांनी या इझो रिपब्लिकचा पराभव केला. बंडखोरांचा नेता एनोमोटो टेककीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, पण त्याने जपानी सरकारला आपल्या कामाने इतके प्रभावित केले की केवळ चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगून तो सुटला आणि मेजी सरकारमध्ये रुजू झाला. तिथे त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. आज त्या भागाला होक्काइडो असे नाव आहे. 

७.रिपब्लिक ऑफ माउंटनस आर्मेनिया

२६ एप्रिल १९२१ – १३ जुलै १९२१

तुर्की-आर्मेनियन युद्धात तुर्की सैन्यांने आर्मेनियाचा पराभव केला. त्यामुळे अर्मेनिया आणि सोव्हिएत रशिया एकत्र होणार होते, पण सोव्हिएतने आर्मेनियाचा काही भाग अझरबैजानमध्ये विभाजित केला. त्यामुळे तेथील स्थानिक संतप्त झाले. २६ एप्रिल १९२१ च्या सुरूवातीस त्यांनी स्वातंत्र्य घोषित करत सोव्हिएतविरुद्ध बंड केले. आणि रिपब्लिक ऑफ माउंटनस आर्मेनिया स्थापन केले पण जुलैमध्ये सोव्हिएत सैन्याने परत आक्रमण केले आणि आर्मेनियाच्या बंडखोरांना पराभूत केले. पण त्यांची क्रांती अंशतः यशस्वी झाली. जरी त्यांना सोव्हिएट्सने वचन दिले की त्यांचा प्रदेश आर्मीनियामध्येच राहील.

८. एझवाड

६ एप्रिल २०१२ - १२ जुलै २०१२

आफ्रिकेच्या वायव्य भागातील उत्तर माली या देशातील लोकांनी सरकारविरूद्ध बंड केले आणि त्यांच्या भूमीला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. तेव्हा एझवाडची घोषणा केली गेली. स्वतंत्र इस्लामिक राष्ट्राची स्थापन करण्याची  इच्छा असणारे हे  बंडखोर लोक एकत्र आले. ते चांगले प्रशिक्षित आणि सुसज्ज होते. त्यामुळे त्यांनी क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात सरकारच्या सैन्याचा पराभव केला. एप्रिल २०१२ मध्ये सुरू झालेली ही लढाई सुरू झाली होती. परंतु या देशाची स्वतंत्र अस्तित्व  ३ महिन्यांत संपुष्टात आले.

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required