computer

या आठ लोकांनी अतरंगी बिझनेसमधून कोट्यावधी रुपये कसे कमावले ??

लोक नोकरी-उद्योग करुन पैसे कमावतात हे तर ठीकच आहे. पण जगात असे काही अतरंगी लोक असतात जे समोर आलेल्या प्रसंगातून कसेही पैसे कमावू शकतात. आपणही त्या परिस्थितीला सामोरे गेलेलो असतो, पण यातून पैसे कमवावे असं आपल्याला स्वप्नातसुद्धा वाटलेलं नसतं. थांबा, नमनाला घडाभर तेल न जाळता या ८ लोकांनी काय उद्योग केले हे सांगतोच आम्ही..

१. एल्विस प्रिसलेने “I hate Elvis” बॅजेस विकले

१९३५साली जन्मलेला एल्विस प्रिस्ले हा अमेरिकन गायक, संगीतकार आणि अभिनेता होता. त्याने १९५६साली 'लव्ह मी टेंडर' या सिनेमातून ॲक्टिंग करायला सुरुवात केली. सिनेमा तर हिट झाला. त्याचं टायटल साँग तर एक लाखाहून अधिक वेळा विकलं गेलं. एकच गाणं इतकं पॉप्युलर होण्याचं हे पहिलं रेकॉर्ड होतं. मग या एल्विसरावांची लोकप्रियता वसूल करण्यासाठी त्याच्या मॅनेजरने एक शक्कल काढली. या टॉम पार्कर नावाच्या माणसानं तेव्हाच्या ४०,०००डॉलरची एक डील साईन केली- एल्विस प्रिस्लेला एक ब्रँड म्हणून लोकांसमोर आणण्याची ती डील होती. त्या डीलच्या अंतर्गत त्यांनी ब्रेसलेट्स, स्कार्फ, बबलगमचे कार्ड्स, शूज अशा बऱ्याच गोष्टी बाजारात आणल्या. या सगळ्या यादीत “I hate Elvis” असे लिहिलेले बॅजेसही होते आणि तेही खूप खपले.

म्हणजे बघा, तुम्ही लोकांना आवडता म्हणून त्यांनी तुमच्या ब्रँडच्या गोष्टी खरेदी करणं एकवेळ आपण समजू शकतो. पण लोकांच्या तिरस्कारातून पैसे मिळवण्यासाठी तिरकं चालणारंच डोकं पाहिजे, नाही का? आपल्या सल्लूभाईला हा सल्ला कुणीतरी द्यायला पाहिजे राव!

२. फोन करणाऱ्या टेलिफोन कंपन्यांनाच फोन घेण्याचे चार्जेस लावले..

आपल्या सगळ्यांना लोन घ्या, क्रेडिट कार्ड घ्या, आमच्या योजनेत पैसे गुंतवा असे कॉल्स येतात. कधीही, कुठेही येतात. नवीन असताना आपण माझा नंबर कुठून मिळाला, तुझ्या मॅनेजरशी बोलायचंय वगैरे ॲटिट्यूड दाखवतात. काही दिवसांनी यात आपलाच वेळ जातोय आणि या लोकांचं काही नुकसान होत नाहीय हे लक्षात येतं आणि आपण "सॉरी, नॉट इंटरेस्टेड" म्हणून फोन बंद करायला लागतो. काही ट्रूकॉलर वापरणारे लोक असतात, त्यांना आधीच येणारा फोन कुणाचा आहे हे कळतं आणि ते फोनच घेत नाहीत.

युकेमध्ये राहणाऱ्या ली ब्यूमाँटलासुद्धा असे फोन यायचे. पठ्ठ्याने सरळ १० पौंड भरुन एक नंबर विकत घेतला. त्या नंबरवर फोन करणाऱ्यालाच १० पेन्स बिल पडत असे. मग काय, त्याने हा नंबर जिथेजिथे कुठे मागितला असेल, तिथे दिला. जेव्हा एखाद्या कंपनीने त्याला असा का नंबर दिला असं विचारलं, तेव्हा त्यानं खरं ते उत्तर दिलं. तुम्हांला फोन करण्याचे पैसे भरायचे नसतील तर मला इमेल करा असंही त्यानं सांगितलं. आहे ना भारी आयडिया..

३. स्पॅम इमेल पाठवणाऱ्यांकडून एक लाख डॉलर नुकसान भरपाई वसूल केली.

ली ब्यूमाँटला मार्केटिंग इमेल्स येण्याबद्दल काही तक्रार नव्हती. पण डॅनियल बॅलसॅमनावाच्या अमेरिकन माणसाला इन्बॉक्समध्ये येऊन पडलेल्या स्पॅम इमेल्सही आवडायच्या नाहीत. आता आपला सगळ्यांचाच स्पॅम इन्बॉक्स अक्षरश: हजारो इमेल्सनी ओसांडून वाहात असतो. या डॅनियल भाऊंचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. पण त्याला स्त्रियांच्या सर्जरीचे स्पॅम इमेल्स यायचे. या रावसाहेबांनी नोकरी सोडली आणि हे इमेल्स पाठवणाऱ्यांवर कोर्टकेसेस ठोकण्यासाठी २००८ साली चक्क वकिलीची पदवीच घेतली.

मग काय, तेव्हापासून येणाऱ्या प्रत्येक स्पॅम इमेलवर त्यांने दावे ठोकायला सुरुवात केली. त्यातून त्याला इतके पैसे मिळाले की त्याचा सगळा खर्च त्यातून निघू लागला आणि केसेस चालवण्यासाठी त्याने दुसरा वकील ठेवला. त्या दोघांना मिळून प्रत्येक इमेलवरती जवळजवळ १०००डॉलर्स मिळाले

त्याला एका खटल्याने सव्वा लाख अमेरिकन डॉलर्स मिळवून दिले. त्या कंपनीने डॅनियलला ११२५ स्पॅम इमेल्स पाठवले होते. पण त्याचे काही दावे फुकटही गेले बरं. काही कंपन्या खोट्या नावाने चालत होत्या आणि त्यांनी त्यांचे खरे पत्ते न देता पोस्ट ऑफिस बॉक्सचे नंबर्स दिले होते. त्यामुळे त्याला त्या केसेसचे पैसेच मिळाले नाहीत. 

खरंतर खूप लोकांना हे माहित नाही की स्पॅम इमेल्स पाठवण्याच्या विरोधात आंतराष्ट्रीय सायबर सिक्युरिटीचा कायदा आहे. तुमच्या इनबॉक्सातली कोणतीही स्पॅम इमेल उघडून पाहा, त्यांना तुम्हांला त्यांच्या इमेल लिस्टमधून निघण्यासाठी unsubscribe हा ऑप्शन द्यावाच लागतो. तसेच तुम्ही डू नॉट डिस्टर्ब हा पर्याय मोबाईल नंबरसाठी निवडला असेल तर तुम्हांला येणारा प्रत्येक कॉल आणि मेसेज हा बेकायदेशीर आहे. पण भारतात याकडे कुणी गांभीर्यानं पाहात नाही. TRAIने असे स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस रिपोर्ट करण्यासाठी एक ॲप आणले आहे, पण आपण रिपोर्ट केल्यावर ते इतके इमेल्स आणि मेसेजेस पाठवतात, फोन करतात की स्पॅम चालेल पण तुमचा सपोर्ट आवरा असं म्हणण्याची परिस्थिती आहे..

४. अस्तित्वात नसलेल्या गाण्यांनी रॉयल्टीपोटी २०,००० डॉलर्स कमावले.

२०१४मध्ये व्हुल्फेक(Vulfpeck) नावाच्या बँडने Sleepify नावाचा एक १० गाण्यांचा अल्बम Spotifyवर रिलीज केला. तो विकत घेणाऱ्यांनी हा आल्बम झोपताना ऐकावा असं त्या बँडने म्हटलं होतं. त्यांच्या ग्राहकांना हा अल्बम ऐकताना छान झोप लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. या अल्बममधलं प्रत्येक गाणं साधारण ३० ते ३५ सेकंदांचं होतं आणि प्रत्येक गाण्याचं नांव म्हणजे ते गाणं ज्या क्रमांकाचे आहे, तितके ’ Z’ त्या नावात होते. म्हणजे पाहा, पहिल्या गाण्याचं नांव नुसतंच ’ Z’, दुसऱ्याचं ‘Zz’ , तिसऱ्याचं ‘Zzz' आणि मग अशाप्रकारे दहाव्या गाण्याचं नांव होतं- ‘Zzzzzzzzzz'. आता या गाणी मूक म्हणजे त्यात काहीही संगीत-बोल काहीच नसलेली असल्यानं लोकांना झोप तर लागणारच, आणि झोप लागल्यावर गाणी लूपमध्ये चालू राहिली तर आणखीच फायदा!!

स्पॉटिफायच्या प्रवक्यानं या आल्बमला क्लेव्हर स्टंट म्हटलं आणि वापराच्या नियमभंगाचं कारण देत हा आल्बम त्यांनी काढून टाकला. पण तोवर त्याने २०,०००डॉलर्सची कमाई केली होती.

५. ट्रोलफेस मीमच्या निर्मात्याने तो चेहरा वापरण्याची फी म्हणून एक लाख डॉलर्स कमावले.

हा ट्रोलफेस तुम्ही नक्कीच पाह्यला असणार. केवढा फेमस आहे तो. त्याच्या निर्मात्याच्या पण हेच लक्षात आलं की हा चेहरा खूप ठिकाणी वापरला जातो. हा कसा बनला ही पण एक गंमत आहे. साधारण २००८मध्ये १८ वर्षांच्या कार्लोस रमिरेझने एम एस पेंट वापरुन हे चित्र काढलं आणि 4chan नावाच्या एका फोरममध्ये पोस्ट केलं. दुसऱ्या दिवशी दोन-चार लोकांनी ते चित्र वापरल्याचं पाहून त्याला छान वाटलं. नंतर त्याच्या लक्षात आलं की 4chanचेच नाही, तर इतर इंटरनेट युझर्सही हे चित्र वापरत आहेत.

होताहोता ही गोष्ट त्याच्या आईला कळली. ती काही भारतीय आई नसल्यानं तिला तिच्या मुलाचा खूप अभिमान वाटला आणि तिनं हे चित्र नुसतं घराच्या भिंतीवरच काढून घेतलं नाही, तर कार्लोसला हे चित्र त्याच्या नावावर रजिस्टरही करायला लावलं.

यानंतर मात्र ज्या-ज्या लोकांनी हे चित्र वापरुन पैसे मिळवले आहेत, त्यांना कोर्टात खेचलं आणि त्यांच्याकडून लायसन्सिंग फी म्हणून कार्लोसने तब्बल १,००,०००डॉलर्स मिळवले. मात्र गंमत म्हणून आणि पैसे न मिळवता ज्यांनी हे चित्र वापरले, त्यांना मात्र कार्लोस रमिरेझने हे चित्र खुशाल वापरु दिले.

६. नूडल्सपेक्षा चिली सॉस विकून काकू चीनमधल्या अतिश्रीमंत लोकांच्या फोर्ब्जच्या यादीत झळकल्या

चीनमध्ये राहणाऱ्या ताओ हुआबी (Tao Huabi) काकूंनी नवरा वारल्यावर घर चालवण्यासाठी नूडल्सची एक टपरी टाकली. त्या नूडल्स त्यांनी घरी बनवलेल्या चिली सॉसमध्ये टाकून विकायच्या. काकूंचा बिझनेस लै भारी चालला. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की लोकांना त्यांच्या नूडल्स नाही, तर तो चिली सॉस आवडतोय. ग्राहक तर तो सॉस नेतच होते, पण आजूबाजूची दुकानंही या बाईंचा चिली सॉस वापरुन पदार्थ बनवत असत आणि त्यांचाही धंदा चांगला चालत असे.

हे पाहून ताओबाईंनी नूडल्सची टपरी बंद केली आणि सरळ चिली सॉसचंच दुकान टाकलं. त्यांनी पुढे जाऊन 'लाओ गान मा' म्हणजे गॉडमदर नावाची स्वत:ची कंपनी स्थापन केली. २०१५ पर्यंत त्यांना या बिझनेसमध्ये १ करोड डॉलर्स मिळाले होते.

या कंपनीत या काकूंना इतका फायदा झाला की त्यांचं नाव चीनमधल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या फोर्ब्जच्या यादीत झळकलं.

७. हवेचे कॅन विकून तब्बल ६४ लाख डॉलर्स कमावले.

चीनमध्ये प्रदूषण खूप आहे हे आता सगळ्यांनाच माहित आहे. २०१३मध्ये चेन गॉन्गबायो( Chen Guangbiao) या आधीच चीनमधल्या श्रीमंत लोकांत गणना होणाऱ्या माणसाने ०.८ डॉलर्सला एक या भावाने ८० लाख हवेचे कॅन्स विकले. हा माणूस स्वत: गोष्टी रिसायकल करणारा उद्योजक आहे, समाजसेवा त्याच्या रक्तात आहे आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता देखील आहे.

त्याचं म्हणणं होतं की लोकांना वायूप्रदूषणाचा धोका चांगला कळायला हवा आणि प्रदूषणाविरोधात जनजागृती व्हायला हवी. म्हणून त्याने हे स्वच्छ हवेचे कॅन्स विकायला सुरुवात केली. त्याने लोकांना हेही सांगितलं की आपण पुढच्या १० वर्षांत या समस्येवर मात केली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला ऑक्सिजनचे सिलिंडर्स घेऊन फिरायला लागेल.

चक्क १० दिवसांतच या चेनचे  स्वच्छ आणि ताज्या हवेचे ८० लाख कॅन्स विकले गेले आणि यातून मिळालेले सर्व पैसे चेनने चॅरिटीसाठी दान केले.

८. या माणसाने चक्क चंद्रावरची जमिन विकून ५ कोटी डॉलर्स मिळवले.

युनायडेट नेशन्सने १९६७मध्ये अवकाशातल्या जमिनींविषयी एक कायदा/करार केलाय. त्यानुसार अवकाशातली कुठलीच जमिन ही कोणत्याही देशाच्या  मालकीची होऊ शकत नाही. अर्थात हा करार अस्तित्वात येण्याआधी आणि नंतरही बऱ्याच लोकांनी चंद्र, मंगळ आणि अशाच कुठल्या ग्रहांवरच्या जमिनीवर मालकी सांगितली आणि सहज मूर्ख बनू शकणाऱ्या लोकांना विकलीसुद्धा.

डेनिस होप नावाचा माणूस मात्र अतिशहाणा होता. त्याने यूएन (UN) ला चंद्रावरच्या जमिनीचा मालकीहक्क सांगणारं पत्र लिहिलं, पण त्यांच्याकडून काही उत्तर आलं नाही तेव्हा त्याने या करारातली पळवाट वापरायचं ठरवलं. या करार म्हणा किंवा कायदा, त्यात एखादी व्यक्ती अवकाशातल्या ग्रहावर मालकीहक्क सांगू शकते की नाही याबद्दल काहीच म्हटलं नव्हतं. नेमका याचाच फायदा या डेनिसभाऊने घ्यायचा ठरवला.

मग काय, १९८० मध्ये त्याने ल्यूनार एम्बसी कमिशन नावाचा बिझनेस चालू केला आणि त्यातून एकरी २० डॉलर्स किंमत लावून २५ लाख एकर जमिन विकली ना राव!! या खरेदीची पद्धत पण गंमतीशीर होती. डोळे बंद करुन तुम्ही चंद्रावर बोट ठेवायचं, जिथे बोट असेल, ती जमिन तुमच्या मालकीची. जिमी कार्टर आणि रोनाल्ड रेगन हे अमेरिकेचे माजी अध्यक्षही या डेनिसचे ग्राहक होते असा त्याचा दावा होता.

सबस्क्राईब करा

* indicates required