computer

या ८ वर्षांच्या लहानग्याने ८६ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २ लाख रुपये उभे केलेत !!

लहान मुलं कधीकधी असं काही करतात की मोठ्यांनादेखील थक्क व्हायला होतं. एवढ्या लहान मुलाला हे सुचू शकतं पण आपल्याला का नाही सुचलं असंही वाटून जातं. दिल्लीतल्या एका लहान मुलाने असंच काही करुन दाखवलं आहे. याचं वय आहे 8 वर्षं. त्याने चक्क दोन लाख रुपये गोळा करून दाखवले आणि हा मुलगा आता थेट १० वी आणि १२वीत शिकणाऱ्या ८६ विद्यार्थ्यांची फी भरणार आहे. आहे ना थक्क करणारी गोष्ट?

अधिराज सेजवाल असे या मुलाचे नाव. त्याची आई शिक्षिका आहे आणि तो एका खाजगी शाळेत इयत्ता तिसरीत शिकतो. एके दिवशी अधिराजने त्याच्या शिक्षक असलेल्या आईला फोनवर विद्यार्थी आपली फी भरू शकत नाहीत याबद्दल बोलताना ऐकले. या चिमुकल्या जीवाला यामुळे काळजी वाटायला लागली.

त्याने स्वतः त्यांची फी भरण्याचा निर्णय घेतला. स्वतःची पिगी बँक फोडून आपण हे पैसे भरू असे म्हणत त्याने पिगी बँक फोडली, पण त्यात त्याला फक्त १२,५०० रुपये मिळाले. त्यातून त्याने ५ विद्यार्थ्यांची फी भरली. पण अजून कित्येक विद्यार्थी फी भरु शकत नव्हते.

अधिराज आता मोहिमेला लागला होता. त्याने सर्वांकडून पैसे गोळा करायला सुरुवात केली. बघता बघता त्याने २,००,००० रुपये जमा केले. या पैशांतून तो ८६ विद्यार्थ्यांची फी भरू शकला. साहजिक या गोष्टीचे त्याच्या आई वडिलांना प्रचंड कौतुक वाटले.

या गोष्टी वरून एक गोष्ट निश्चित होते ती म्हणजे लहान मूल असो की तरुण मुले त्यांच्या माणुसकी असते, काहीतरी करण्याची जिद्द देखील असते फक्त त्यांना योग्य मार्ग आणि योग्य प्लॅटफॉर्म मिळाला की ते निश्चित स्वतःचे काम सिद्ध करून दाखवू शकतात. समाजासाठी काहीतरी करून दाखविण्यासाठी वय, हाताशी साधने असावी लागतात हा समज या ८ वर्षांच्या अधिराजने खोडून काढला आहे हे मात्र नक्की!!

सबस्क्राईब करा

* indicates required