दिनविशेष : गानकोकिळेचं ९३ व्या वर्षात पदार्पण!!

तब्बल 6 दशकांपेक्षा अधिक काळ करोडो लोकांच्या मनावर आपल्या सुमधूर आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणार्‍या महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर अर्थातच आपल्या लाडक्या लता दीदींना आज २८ सप्टेंबर रोजी वयाची ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. 

५० आणि ६० च्या दशकात लतादीदींच्या आवाजाने भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक बड्या संगीतकाराला त्यांची दखल घ्यायला लावली. १९४२ ते १९९१ या काळात सर्वात जास्त गाणी ही  दीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित झाली आहेत. आणि हा विक्रम गिनीज बुक अॉफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद आहे. लतादीदींनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटात गाणी गायली आहेत आणि २० पेक्षा अधिक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, जीवनगौरव, फिल्मफेअर, महाराष्ट्र भूषण अशा एक ना अनेक पुरस्कारांची यादी लता दीदींच्या गोड आवाजापुढे कमीच वाटते.  'गानकोकीळा'  हा लोकांनी त्यांना दिलेला किताब यथार्थ आहे.  

आज तब्येत साथ देत नसल्यामुळे दीदी गात नसल्या तरी ए मेरे वतन के लोगो, प्यार किया तो डरना क्या, आज फिर जीने कि तमन्ना है, मेहंदी लगा के रखना, तुझे देखा तो ये जाना सनम अशी लता दीदींनी गायलेली कितीतरी सदाबहार गाणी आजही लोकांचे कान रोज तृप्त करत आहेत आणि पुढेही करत राहतील. भारतीय संगीत क्षेतातील या महान तारकेचे स्थान नेहमीच अढळ आणि सर्वोच्च राहील यात शंका नाही. दीदींच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त बोभाटा परिवाराकडून त्यांना भरभरुन शुभेच्छा...

सबस्क्राईब करा

* indicates required