computer

सापांची भीती वाटते? हे ९ साप बघून सापांच्या प्रेमात पडाल!!

साप म्हटले की सगळ्यांच्या मनात आधी तर भितीच येते. त्याच्यापासून कसे दूर राहता येईल हा विचार पहिल्यांदा येतो. त्यामुळे बऱ्याचदा त्याचे सौन्दर्य आपल्या नजरेस येत नाही. जगभरात सापांच्या ३७०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. वेगवेगळ्या भौगोलीक प्रदेशात वेगवेगळ्या आकारात, विविध रंगांमध्ये ते दिसतात. आज आम्ही जगभरात सापडलेल्या काही विलक्षण सुंदर व आकर्षक सापाच्या प्रजातींची माहिती आणली आहे. माहितीसोबत असलेले फोटो बघाच म्हणजे आम्ही काय म्हणतोय ते कळेल

१. श्रीलंकेचा पिट व्हायपर (घोणस) साप

श्रीलंकेत आढळणारा हा सुंदर साप. हा साधारणपणे झाडांमध्ये आढळून येतो. या सापाची लांबी जेमतेम २ फुट असते. पिट व्हायपर (घोणस) त्याच्या हिरव्या, काळा रंग तसेच मोठ्या त्रिकोणी-आकाराच्या डोक्यासाठी प्रसिद्ध आहे. दिसायला सुंदर असला तरी तो तेवढाच धोकादायकही आहे. त्याच्या फार जवळ जाण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच हल्ला करतो. महत्त्वाचे म्हणजे त्याचा दंश लगेच उपचार न मिळाल्यास जीवघेणा ठरतो.

२. आशियाई हरणटोळ

या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अंगावर असलेले आकर्षक आकार. जेव्हा या सापाला इतरांपासून धोका वाटतो तेव्हा तो शरीर विस्तारतो आणि त्यावेळेला हे खवले तरारून वर येतात. याचे शरीर चमकदार हिरव्या रंगाचे असते, तर अंगावरचे आकार हे काळ्या पांढऱ्या रंगाचे असतात. इतर वेळेला हा साप बारीक झाडांच्या कोवळ्या पानासारखा हिरवागार असतो. त्याच्या रंगामुळे तो झाडावर पटकन दिसून येत नाही.

३. हिरव्या झाडावरचा अजगर

हा Green Tree Python म्हणजे हिरव्या झाडावरचा अजगर त्याच्या हिरव्यागार रंगासाठी प्रसिध्द आहे. पूर्ण वाढ झालेला अजगर हा हिरव्या रंगाचा असतो, पण लहान वयातला अजगर हा चमकदार पिवळा, लाल भडक किंवा गडद तपकिरी रंगाचा असू शकतो. हा अजगर जसा मोठा होत जातो तसतसे याच्या रंगांचे सौंदर्य खुलत जाते.

४. सॅन फ्रान्सिस्को येथील गार्टर साप

कॅलिफोर्निया राज्यातली नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली ही सापाची प्रजाती. अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या सापाच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाचे पट्टे असतात. हे पट्टे गडद नारंगी, निळे, काळे आणि गडद कोरल रंगाचे असतात.हा साप ३ फूट लांबीपर्यंत वाढू शकतो. तो विषारी नसल्याने मानवासाठी हानिकारक नाही. हा प्रामुख्याने पाण्याजवळ सापडतो. त्याच्या लाल जीभेचे टोक काळ्या रंगाचे असते.या जीभेच्या लसलसत्या हालचालीने मासे आणि इतर जलचरां आकर्षित होतात आणि हा साप त्यांची शिकार करतो.

५. आयलॅश नावाचा घोणस

सापाच्या अंगावर केस नसतात तरीही या सापाला आयलॅश व्हायपर (घोणस) म्हणतात. या सापांच्या डोळ्यावर उभा खवला पापणीसारखा दिसतो म्हणून त्याचे नाव आयलॅश व्हायपर असे आहे. सापाची ही प्रजाती अत्यंत विषारी असून दिसायला खूप सुंदर आहे. ही प्रजाती वेगवेगळ्या रंगात असते. चमकदार पिवळा, गुलाबी, हिरवा आणि तपकिरी अश्या विविध रंगात ती आढळते. केळीच्या झाडामध्ये सहज लपता येत असल्याने तिथे बहुतेकदा पिवळ्या रंगाचे पिट वाइपर आढळतात. त्यांची त्वचा खडबडीत असते, पण त्यामुळेच त्यांना शिकार करताना चढणे सोपे जाते.

६. समुद्री मण्यार

या सापाची प्रजाती जमिनीवर व समुद्रावर दोन्हीकडे आढळून येते. या सापाला पिवळा समुद्री मण्यार असेही म्हणतात, कारण त्याच्या डोळ्याखाली आणि ओठांच्यावर पिवळ्या खुणा असतात. या सापाच्या गुळगुळीत शरीरावर साधारणपणे २० ते ६५ काळे पट्टे असतात. ही एक उभयचर प्रजाती आहे, म्हणजे हे साप जमिनीवर अंडी देतात पण पाण्यात मोठे होतात.

७. ब्राझिलियन इंद्रधनुषी बोआ (मांडूळ)

ब्राझिलियन इंद्रधनुष्य बोआ सर्वात सुंदर सापांपैकी एक आहे. त्याचा रंग तपकिरी किंवा लालसर तपकिरी असतो. त्याची लांबी ४ ते ५ फूट असू शकते. त्यांच्या डोक्यावर काळ्या पट्टे असतात आणि त्यांच्या पाठीवर काळ्या रिंग असतात. त्वचा चमकल्यावर अनेक रंग दिसतात म्हणून हा इंद्रधनुषी बोआ. हे साप रात्री शिकारीसाठी निघतात आणि दिवसा झोपतात. ते पक्षी, त्यांची अंडी, लहान सस्तन प्राणी, सरडे आणि बेडूक खातात.

८. फॉर्मोसाऑड स्केल साप

इंद्रधनुष्यासारखे चमकणारे रंग असलेला आणखी एक साप म्हणजे फॉर्मोसा ऑड-स्केल नावाचा साप. फक्त या सापाच्या शरीरावर असणारे रंग फिकट इंद्रधनुषी असतात. या सापाला लहान डोके असून त्याचे डोळे लहान, काळे, मण्यांसारखे असतात. या प्रजातीतील प्रौढ सापाचा सर्वसाधारण रंग म्हणजे ऑलिव्ह, ग्रे टॅन किंवा ब्लॅक, तर तरुण किंवा लहान फॉर्मोसा सापाचा रंग काळा असतो. फॉर्मोसा सापाच्या अंगावर असलेले स्केल विचित्र आकारात असतात. त्यांचा ठराविक पॅटर्न नसतो. हे साप तैवान आणि जपानच्या दक्षिण बेटांमध्ये आढळतात.

९. खवले नसलेलला कॉर्न साप

कॉर्न साप नारिंगी ते तपकिरी-पिवळ्या रंगाच्या विविध रंगात आढळतात. त्यांचा रंग हा त्यांचे वय आणि ते कोणत्या प्रदेशात आढळतात यावर अवलंबून असतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अंगावर खवले म्हणजे स्केल्स अजिबात नसतात. त्याच्या शरीराच्या खालच्या भागावर काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे पट्टे असतात. त्यांच्या पोटावर उभे खवले असतात, त्यामुळे ते सरपटू शकतात. हे बिनविषारी साप शांत स्वभावाचे असतात म्हणून त्यांना काहीजण चक्क पाळतात.

 

तुम्हाला यातला कोणता साप आवडला असं विचारणं जरा विचित्रच आहे, कारण याला इंग्रजीत डेडली ब्यूटी असंच म्हणता येईल. पण समजा तुम्ही बेडूक, पाल, सरडा असतात तर कोणाच्या प्रेमात पडला असतात ?

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required