computer

चोरी, फसवेगिरी न करता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून २ कोटी रुपये कमावले? हे नेमकं कसं साध्य झालं?

बोभाटावर तुम्ही तैवानच्या बँकेतल्या एका कारकुनाचा लेख वाचला असेल, त्याने पगारी रजा मिळवण्यासाठी चारदा लग्न करून घटस्फोट घेतला. आणि ते नियमात कसे बसते हे सिद्धही केले. असाच एक अमेरिकेतल्या हुशार माणसाने शक्कल लढवून क्रेडिट कार्डवरून तब्बल २ कोटी कमावले आहेत. आणि एक रुपयाही टॅक्स भरला नाही भरला. खरं वाटत नाही ना ? चला बघुयात त्याने नक्की काय अक्कल लढवली ते.

तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डवरून खरेदी करता तेव्हा बँक बक्षीस (Reward) म्हणून अगदी छोटी रक्कम परत अकाउंटवर जमा करते. या मागचं कारण म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त क्रेडिट कार्ड वापरावे आणि खरेदी करावी. हे बक्षीस नेहमीच पैशांच्या रुपात नसते, रिवॉर्ड पॉईंटसही मिळतात. हे रिवार्ड पॉईंट वापरून तुम्ही अजून खरेदी केल्यास तुम्हाला खरेदीवर सूट मिळते. त्यामुळे ग्राहकही खुश आणि कार्ड वापरल्याने बँकही फायद्यात. या नेहमीच्या ग्राहक बँक खेळात अमेरिकेच्या कॉन्स्टँटिन अनीकीव याने अशी काही बाजी शक्कल लढवली की त्याच्यावर पैशाचा पाऊसच पडला. त्याने नक्की काय केले?

आधी तर त्याने आपल्या क्रेडिट कार्डवरून मोठ्या संख्येने गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास सुरवात केली. तो आधी गिफ्ट कार्ड विकत घ्यायचा आणि मग ते रोख रकमेत बदलायचा (encash). त्यानंतर तो हे पैसे परत आपल्या बँक खात्यात जमा करायचा आणि महिन्याअखेर क्रेडिट कार्डचे बिल भरायचा. बिलाच्या देयकाचे हे बक्षीस (reward points) म्हणजे त्यांची कमाई होती.

म्हणजे बक्षिसाचा विचार केला तर  $१००० वर ५% कॅशबॅक म्हणून $५० रुपये मिळतात. पण जेव्हा लाखो रुपये खर्च होतात तेव्हा त्यावर ५ टक्क्याने कॅशबॅक म्हणून मिळणारी रक्कमही तेवढीच मोठी असते. त्यावर व्यवहार फी (transaction fees) किरकोळ घेतली जाते. याच हिशोबाने त्याची रक्कम वाढतच राहिली. खरी गंमत तर पुढे आहे, ती म्हणजे क्रेडिट कार्ड मध्ये बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम करपात्र नसते. मग जरी तुम्हाला ५ लाख पॉईंट्स मिळाले असले तरी त्यावर कर आकारला जात नाही.

थोडक्यात, तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंवरही कर आकारला जातो, पण त्यावर मिळालेल्या बक्षिसावर कर आकारला जात नाही. वर्षानुवर्षे हीच युक्ती वापरून कॉन्स्टँटिनने तब्बल ३,००,००० डॉलर्स म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे जवळजवळ २.१७ कोटी रुपये कमाई केली.

आडमार्गाने आलेल्या पैशांचा शेवट हा होतोच. असाच शेवट या गोष्टीला देखील आहे.

कॉन्स्टँटिनचे असे भराभर वाढलेले उत्पन्न पाहून कोणीतरी अमेरिकन कर विभागाला याची खबर दिली. त्यानंतर त्याची चौकशी केली सुरू झाली. हा इतक्या कमी वर्षात एवढा श्रीमंत कसा झाला याचा तपास सुरु झाला. त्याचे सगळे उत्पन्नाचे मार्ग तपासले गेले आणि अखेर त्याच्या उत्पन्नाचा हा शॉर्टकट कर विभागाच्या लक्षात आला. त्याच्यावर रीतसर खटला भरण्यात आला. कोर्टात हजर होताना या पठ्ठ्याने आपल्या सोबत गिफ्ट कार्ड्सने भरलेला टब आणला होता. कोर्टासमोर आपली बाजू मांडताना त्याने म्हटले की, त्याच्याकडे असलेला पैसा म्हणजे त्याचे उत्पन्न नव्हे तर क्रेडिट कार्ड कंपन्यांनी त्याला दिलेली सूट आणि कॅशबॅक्स आहेत.

दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने मान्य केले की क्रेडिट कार्डवर मिळालेले बक्षिस आणि सूट यावर कर लादता येणार नाही. पण पुढे हेही नमूद केली की, क्रेडिट कार्डने मनी ऑर्डर खरेदी करणे किंवा गिफ्ट कार्ड्स रिचार्ज करणे करपात्र असू शकते. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्याला मिळालेल्या बक्षीसांवर कर भरावा लागेल. हा कर पूर्ण सर्व बक्षिसांवर नसून त्याने  वस्तू खरेदी न करता केवळ पैसे मिळवण्यासाठी जे गिफ्ट कार्ड्स खरेदी केले होते अशा खरेदीतून मिळालेल्या बक्षिसांवर भरावा लागणार आहे.  

हा खटला जेव्हा सगळीकडे पोहोचला तेव्हा खूप चर्चा झाली. पैसे मिळवण्यासाठी कोण काय युक्ती लढवेल हे सांगता येत नाही हेच सिद्ध झालं.

 

लेखक: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required