computer

कायद्यातली पळवाट शोधून त्याने एकाच बाईशी ४ वेळा लग्न केलं? नेमकं प्रकरण काय आहे?

रजा मिळवण्यासाठी कोण कोण काय बहाणे करतो? कधी लांबचे नातेवाईकांना मारतो, कधी कोणाचे लग्न लावतो, कधी खोटे खोटे आजारी पडतो. ऑफिसात सुट्या सहजासहजी मिळत नाही. पगारी रजा मिळणे तर खूप अवघड असते. त्यामुळे बरेच जण डोकं लढवत असतात. तैवानच्या एका पठ्ठ्याने पगारी रजा मिळवण्यासाठी अशीच एक भन्नाट आयडिया लढवली.  पण ती आयडिया त्याच्या अंगाशी आली की यशस्वी झाली? ही खरी गंमत आहे. या पठ्ठ्याने चक्क ३७ दिवसांत बायकोशी चारदा लग्न केले. पण नंतर काय झाले? ते कळण्यासाठी शेवटपर्यंत जरूर वाचा.

तर झाले असे की, तैवानमधील एक तरुण बँकेत कारकून म्हणून काम करतो. त्याने लग्नासाठी ८ दिवसाची सुट्टी मंजूर करून घेतली. तिथल्या कायद्यानुसार लग्नानंतर ८ दिवस पगारी सुट्ट्या मिळतात. लग्नाची सुट्टी संपत आल्यावर त्याने बायकोला घटस्फोट दिला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याचे लग्न झाले आणि लग्नाची सुट्टी संपल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा पगाराची रजा मागण्यासाठी तिच्याशी लग्न केले. कारण, त्याला वाटले की कायद्याने त्याला सुट्टी मिळेल. त्याने एकूण चार वेळा त्याच महिलेशी म्हणजे बायकोशीच लग्न केले आणि तीन वेळा घटस्फोट घेतला. अशा प्रकारे, त्याने एकूण ३२ दिवस चार लग्नांसाठी सुट्टी मागण्याचा उपद्व्याप केला आणि बँकेला फसवण्याचा प्रयत्न केला.

पण त्याच्या योजनेनुसार गोष्टी घडल्या नाहीत. तो काय करण्याचा प्रयत्न करीत होता हे बँकेला समजले आणि त्यांनी पगारी सुट्या देण्यास नकार दिला. पहिल्या लग्नासाठी बँकेने त्याला केवळ ८ दिवसांची पगारी रजा दिली. पण तरीही तो तिथे थांबला नाही. त्याने ताइपे शहर कामगार ब्युरो येथे तक्रार दाखल केली आणि कामगार रजा नियमांच्या कलम २ चे पालन न करणाऱ्या आपल्या बँकेविरुद्ध कायदा मोडल्याचा आरोप केला.

कायद्यानुसार कर्मचार्‍यांना लग्न झाल्यावर आठ दिवसाची पगाराची रजा मिळू शकते. त्याचे चार वेळा लग्न झाले असल्याने त्याला ३२ दिवसांची पगाराची रजा मिळू शकते. ताइपे शहर कामगार ब्युरोने या प्रकरणाचा तपास केला आणि असा निर्णय दिला की बँकेने कामगार कायद्याचे उल्लंघन केले. ऑक्टोबर २०२० मध्ये बँकेला तब्बल २०,००० डॉलर (५२,८०० रुपये) दंड ठोठावण्यात आला.

बँकेने आपली बाजू मांडताना असा दावा केला होता की, " त्या कर्मचार्‍याने लग्नाच्या रजेचा गैरवापर केल्याने नियमांनुसार रजा देण्याचे कायदेशीर कारण नव्हते." त्या विरोधात बेशी कामगार ब्युरोने असे सांगितले की, त्या कारकुनाचे वर्तन चुकीचे असले तरी त्याने कायद्याचा भंग केला नाही. उलट बँकेने कामगार रजा नियमांच्या कलम २ चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बँकेने दंड भरावा.

जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा सगळीकडेच एक खळबळ उडाली. तैवानच्या कामगार कायद्यात अशी पळवाट अस्तित्त्वात आहे असे कधी कोणाला वाटलेच नव्हते. हे विचित्र प्रकरण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. आणि कारकून कसा बिलंदर निघाला याविषयी सोशल मिडीयावर जोरदार चर्चा झाली.

काहीही म्हणा पण ही पळवाट शोधून ४ वेळा लग्न करणारा तो कारकून चांगलाच ठग दिसतो. त्याचं पुढे काय होतं हे बघण्यासारखं असेल!!

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required