computer

भल्याभल्यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवणाऱ्या जडेजाची आयपीएलमधून हकालपट्टी का झाली होती?

सर रविंद्र जडेजा आजच्या तारखेला भारतीय संघाची एक मोठी भिस्त असलेला खेळाडू म्हणून ओळखला जातो. खेळाडू ऑल राऊंडर असला म्हणजे तो चांगली बॅटिंग आणि बॉलिंग करू शकतो अशी सहसा समजूत असते, पण सर जडेजांचा स्वॅग वेगळा आहे. ते फिल्डिंग देखील भन्नाट करतात. १६ तारखेला झालेल्या सामन्यात त्यांनी केलेल्या जबरदस्त फिल्डिंगचा व्हिडीओ वायरल होत आहे. असे कित्येक व्हिडीओ सापडतील ज्यात सर जडेजा आपल्या फिल्डिंगने समोरच्या फिल्डरला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवत आहेत.

पण सर जडेजांच्या करियरमध्ये एकदा असेही घडले होते की खुद्द त्यांनाच पॅव्हेलियनमध्ये बसावे लागले. काय घडलं होतं ? जाणून घेऊया !!

सध्या रविंद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळत असतो. धोनीचा लाडका असलेला जडेजा भारतीय संघाप्रमाणे चेन्नईचा देखील संकटमोचक म्हणून समोर आलेला आहे. धोनीचे जडेजावर विशेष प्रेम असल्याने जडेजा चेन्नई सोडून कुठेही जात नाही. पण एकेकाळी जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. सुरुवातीचे दोन्ही सीझन त्याने राजस्थान कडून गाजवले. याचा परिणाम असा झाला की जडेजाची चांगलीच हवा झाली. हीच हवा जडेजाच्या डोक्यात जायला सुद्धा वेळ लागला नाही.

आयपीएलचे बरेच नियम आहेत. खेळाडू जेव्हा एखाद्या संघासोबत खेळण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याच्यासमोर काही एक अटी ठेवण्यात आलेल्या असतात. तसेच काही सर्वसाधारण नियम देखील असतात. आयपीएलचा एक नियम असा आहे की कोणताही खेळाडू परस्पर दुसऱ्या संघासोबत त्या संघात सामील होण्यासंबंधी करार करू शकत नाही.

आयपीएल सुरू झाले तेव्हा लिलाव होऊन खेळाडू विविध संघांकडुन खरेदी केले गेले. पुढचा लिलाव 3 वर्षांनी होईल असे ठरले होते. म्हणजे 2008 साली सुरू झालेल्या आयपीएलचा पुढचा लिलाव २०११ साली झाला. पण जडेजाला त्याआधीच म्हणजे २०१० सालीच जास्त पैसे घेऊन दुसऱ्या संघात सामील होण्याचे वेध लागले. परस्पर तसे प्रयत्न केले म्हणून जडेजा दोषी आढळला. शेवटी आयपीएलच्या नियमांनुसार त्याच्यावर पूर्ण एक सीझन खेळण्यास बंदी घालण्यात आली. २०१० साली इतर खेळाडू आयपीएलमध्ये होते तर सर जडेजा घरी बसून होते. अशा प्रकारे सर जडेजा यांना देखील 'अति घाई संकटात नेई' याचा परिचय झाला.

सबस्क्राईब करा

* indicates required