९ वर्षांच्या मुलीने तयार केलेय आयओस ॲप!! ॲप काय आहे? आणि त्याबद्दल ॲपल CEO टीम कुकचे काय म्हणणे आहे?

सध्याच्या डिजिटल युगात काहीतरी भरीव करून दाखवण्याचे वय कमी होत आहे. तसेही मुलांना सहा वर्षाच्या वयात कोडिंग शिकवल्यावर दुसरे काय होणार म्हणा!!
यातला विनोद आणि अतिशयोक्तीचा भाग सोडला, तर  ज्याच्याकडे इंटरनेट आहे तो प्रत्येक माणूस स्वतःचे डोके वापरून काहीही करू शकतो. सध्या तंत्रज्ञानामुळे जगात तुफान उलथापालथ होत आहे. दुर्दैवाने अजूनही मोठा वर्ग असे काही होत आहे यापासून अनभिज्ञ आहे. 

डिजिटल क्रांतीमुळे अगदी ८-१०-१२ वर्ष वयाची मुलंही अगदी भन्नाट गतीने टेक्नॉलॉजी हाताळत आहेत. या मुलांचे कौतुक तर आहेच, पण यातच एखादं पोरगं मात्र वयाच्या मानाने हजार पाऊले पुढे जाऊन कर्तृत्व गाजवून दाखवते. एका भारतीय मुलीने थेट ऍपलच्या सीईओला तोंडात बोटं घालायला लावली आहेत. हना मोहम्मद रफिक असे या मुलीचे नाव आहे. 

हना ही अवघ्या ९ वर्षांची आहे. सध्या ती आईवडिलांबरोबर दुबईला राहते. शाळेचे म्हणायचे तर तिची होमस्कूलिंग सुरू आहे. म्हणजेच घरच्या घरी तिला शिकवले जाते. तिची शिक्षक देखील कोण आहे? तर तिची १० वर्षे वयाची मोठी बहीण!!! हनाची कामगिरी म्हणजे तिने एक आयओएस ऍप तयार केले आहे.

या ॲपचे नाव आहे - हना'ज! या ऍपमागील तिची निर्मळ भावना बघितली तर तिच्या हुशारीपेक्षा तिच्या हेतूचे जास्त कौतुक वाटेल. हे एक स्टोरीटेलिंग ऍप आहे. या ॲपवर आईवडील आपल्या मुलांना ऐकण्यासाठी गोष्टी रेकॉर्ड करून टाकू शकतात. तसेच या ऍपवर लहान मुलांना ऐकण्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टी असतील याची पुरेपूर काळजी हनाने घेतली आहे. या ऍपचे नाव तिने स्वतःच्या नावावरून हना'ज असे ठेवले आहे

या ऍपची अजून एक विशेषता म्हणजे यात हनाने स्वतःच्या आवाजात काही गोष्टी रेकॉर्ड करून टाकल्या आहेत. ती म्हणते की आपल्या वयाच्या मुलांसाठी एका मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टी म्हणून आपण त्या रेकॉर्ड करुन त्या ऍपवर पोस्ट केल्या आहेत. हना स्वतःला सर्वात कमी वयाची आयओएस डेव्हलपर म्हणवून घेते. एवढ्या कमी वयात आलेला हा आत्मविश्वास साधा नाही, तर तो मेहनतीतून आलेला आहे.

ऍप तयार करून झाल्यावर तिने ऍपलचे सीईओ टीम कुक यांना एक मेल केला. या मेलमध्ये ती सांगते की, तिने स्वतः १०,००० हून अधिक कोड या ऍपसाठी लिहिले आहेत. पुढे तिने असेही म्हटले की ती ऍपसाठी तिने कुठलेही थर्ड पार्टी कोड, लायब्ररी किंवा क्लासेसचा वापर केलेला नाही. तसेच तिने आपण किती टेक्नॉलॉजीबद्दल जागरुक आणि पॅशनेट आहोत हे ही कुकला सांगितले आहे. 

यावर कुकने देखील सकारात्मक प्रतिसाद देत तिचे भरभरून कौतुक केले आहे. खुद्द ऍपलच्या सीईओकडून मिळालेली कौतुकाची थाप तिचे मनोबल वाढवणारी ठरणार आहे. आता पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या ऍपलच्या जागतिक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची तिची इच्छा आहे.
 

सबस्क्राईब करा

* indicates required