सारखं चित्र काढत असतो म्हणून शाळेत ओरडा खाणारा मुलगा आता काय करतो पाहा !!

शाळेत असताना आपल्यातल्या बऱ्याचजणांना वहीच्या मागे चित्र काढण्याची सवय असते. ही वही जर शिक्षकांनी किंवा आपल्या आई वडिलांनी बघितली तर पुढे काय होतं हे वेगळं सांगायला नको. ‘जो व्हेल’ नावाच्या मुलाची ही सवय त्याच्या शिक्षकांनी अनेकदा पकडली. तो सतत चित्र काढत बसायचा.
जो च्या करामती आईवडिलांपर्यंत पोचल्या. भारतातले आईवडील जे करतील तसं त्याच्या आईवडिलांनी केलं नाही. त्यांनी त्याला शाळेनंतर एका ‘आर्ट क्लास’मध्ये प्रवेश मिळवून दिला. त्याच्या कलेला वाव देण्याचं काम त्याच्या आईवडिलांनी केलं.
ज्या मुलाला चित्रांमुळे शाळेत ओरडा पडायचा त्याला आता एका हॉटेलने प्रोफेशनल म्हणून काम देऊ केलं आहे. त्याला हॉटेलची अख्खी भिंत चित्रांनी रंगवायचं दिलं गेलं होतं. मिळालेल्या या संधीचं त्याने कसं सोनं केलं हे तुम्हीच पाहा !!
इंग्लंडच्या श्रूजबरी येथील ‘Number 4’ हॉटेलने जो वर हे काम सोपवलं होतं. जो ने स्वतःला कामात झोकून देऊन २४ तासात काम पूर्ण केलंय. अशा प्रकारच्या रेखाटन-चित्रांना डूडल्स म्हणतात त्यामुळे त्यालाही ‘Doodleboy’ हे नाव मिळालंय.
जो चे वडील ग्रेग व्हेल म्हणतात, की "आईवडिलांनी मुलांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या आवडीला नेहमी वाव दिला पाहिजे.”