१०,००० हून अधिक लोकांना मारणाऱ्या बाईंना ९५ वर्षांनी बेड्या ठोकल्या!!

जर्मनीत झालेली ज्यूंची हत्या आठवली की आजही अंगावर काटा येतो. त्यावेळेस हजारो लोकांना अगदी जनावरांसारखे हाल हाल करून मारण्यात आले. त्याकाळी अनेक शिबीरांच्या नावाखाली या लोकांना आणण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात झाली. अश्याच एका शिबिरात सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या एका महिलेवर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की काय आहे हे प्रकरण पाहुयात.
नाझी छावणीत काम करणार्या ९५ वर्षाच्या या महिलेवर १०,००० हून अधिक खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिलेने जून १९४३ ते एप्रिल १९४५ दरम्यान पोलंड मध्ये काम केले होते. तेव्हा पोलंड नाझींच्या ताब्यात होते. ही महिला त्या काळात डंस्कपासून (Gdansk) २० मैलांच्या अंतरावर असलेल्या स्टुथॉफ शिबिरात सेक्रेटरी म्हणून काम करत होती. या शिबिराला 'मृत्यूचे दार' असे म्हणले जायचे.
जर्मन गोपनीयता कायद्यानुसार या महिलेची ओळख प्रसिद्ध करता येत नाही परंतु तिचे नाव इर्मगार्ड एफ असे सांगण्यात येत आहे. सध्या ती हॅम्बर्ग येथील वृद्धाश्रममध्ये राहत होती. तिच्या हातून गुन्हा घडला तेव्हा तिचं वय २१ च्या आत असल्यामुळे तिचा खटला बालन्यायालयात चालवला जाईल.
फिर्यादीने सांगितले आहे की त्या संबंधित बराच पत्रव्यवहार आणि अनेक फाईल्स पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. आरोपीच्या मदतीने तिथे अनेक कैद्यांची विषारी वायू सोडून हत्या करण्यात आली. परंतु आरोपी महिलेने सांगितले की तिला शिबिरात नक्की काय केले जायचे याची अजिबात कल्पना नव्हती.
असे मानले जाते की स्टुथॉफ येथील या शिबिरात ६०,००० पेक्षा जास्त लोक मरण पावले किंवा मारले गेले होते. हे शिबीर जर्मनीच्या सीमेबाहेर नाझी राजवटीने सुरू केले होते, पण तिथे केवळ ज्यूंची छळवणूक आणि सामूहिक हत्या होत असे.
जर्मन वकिलांनी या शिबिरांशी जोडलेल्या अन्य १३ प्रकरणांचीही चौकशी केली आहे. यापूर्वी याच शिबिरातील ऑस्कर ग्रोनिंग या अकाऊन्टंट म्हणून काम करणाऱ्या आणि रीनहोल्ड हॅनिंग या माजी एसएस गार्ड म्हणून काम करणाऱ्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेव्हा त्यांचे वय ९४ होते परंतु तुरुंगात पाठवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अगदी अलिकडच्या निकालात, एसएसचा माजी रक्षक ब्रुनो डे याला वयाच्या ९३व्या वर्षी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला दोन वर्षाची निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
२०११ मध्ये अमेरिकेमध्ये जॉन डेमांजुक याला पोलंडमधील एका शिबिरात २००० ज्यूंना ठार मारण्याच्या आरोपाखाली म्यूनिकच्या एका न्यायालयात दोषी ठरवले गेले. तो तेव्हा सोबिबोर छावणीत पहारेकरी म्हणून काम करत होता. त्या प्रकरणानंतर, या शिबिराची चौकशी सुरु झाली. ही महिला दोषी ठरल्यास ती पहिली महिला आरोपी ठरेल.
अर्थात, अश्या अनेक शिबिरात काम करणाऱ्या सगळ्यांनीच माणुसकी सोडली नव्हती. यापूर्वी एका छावणीत काम करणाऱ्या आयरीन सेंडलर या नर्सची कहाणीही आपण वाचली असेल. तिने अश्याच एक शिबिरातून २५०० मुलं पळवून आणली आणि त्यांना मरणापासून वाचवले. त्यांचे होणारे हाल एरेना पाहू शकली नाही, त्यासाठी तिचे नाव नोबेलसाठी शिफारस केले गेले. वयाच्या ९८ वर्षी तिचा मृत्यू झाला.
लेखिका: शीतल दरंदळे