या बाईंनी २५०० मुलं पळवली आणि त्यासाठी त्यांची नोबेलासाठी शिफारस झाली !!

⁠⁠⁠⁠⁠इतिहासात ज्याला सर्वात मोठे हत्याकांड म्हणून ओळखले जाते ते म्हणजे नाझी जर्मनीत झालेली ज्यूंची कत्तल. गॅस चेंबर, सामूहिकरीत्या गोळ्या घालणे, अमानुष वैज्ञानिक प्रयोग करणे, अन्न पाण्याविना हाल करणे अश्या जमेल त्या मार्गाने ज्यूंना मारण्यात आलं. यातूनही मार्ग काढत काही शूर लोकांनी ज्यूंना आसरा दिला आणि त्यांचा जीव वाचवला. यात सर्वात वरचं नाव म्हणजे ऑस्कर शिंडलर, या उद्योगपतीने त्याकाळात ११०० लोकांचा जीव वाचवला होता. त्याच्या जीवनावर आधारित शिंडलर्स लिस्ट हा सिनेमा जगभरात गाजला होता.

मित्रांनो आज आम्ही ज्या व्यक्तीची तुम्हाला ओळख करून देणार आहोत ती खूपच कमी लोकांना माहित आहे. या व्यक्तीने तब्बल २५०० मुलांना मरणाच्या दारातून वाचवून आणलं होतं तेही आपल्या जीवावर बेतलेलं असताना. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती व्यक्ती.

स्रोत

‘वॉर्सो’ या पोलंड मधील शहरात राहणारी ‘आयरीन सेंडलर’ (१९१०-२००८) नावाच्या एका परिचारिकेची ही गोष्ट. वॉर्सो मधल्या ज्यूंच्या छळछावण्याच्या (घेट्टो) भागात ती नर्स म्हणून काम करत होती. तिथल्या लहान मुलांच्या ‘झेगोता’ नामक विभागात काम करत असताना तिने तिथल्या मुलांचे हाल पहिले. तसेच त्या अनाथ मुलांच्या घरच्यांना भुकेने आणि आजाराने मरताना पाहिले.

स्रोत

स्वतः समाजसेविका असल्याने तिच्या मनात या माणसांविषयी कळवळा असणे साहजिक होतं. मोठ्यांना बाहेर काढणं अशक्य असल्याने तिने लहान मुलांकडे लक्ष दिलं. पोत्यांमध्ये, सामानात, टूलबॉक्स मध्ये, जिथे जागा मिळेल तिथे तिने मुलांना लपवले. ‘घेट्टो’ मधून यशस्वी रीत्या बाहेर काढल्या नंतर तिने खोटी कागदपत्रे तयार करून मुलांना आणखी सुरक्षित केले. त्यानंतर ज्यू नसलेल्या व्यक्तींकडे या अनाथ मुलांना तिने सोपवलं. आयरीन एकदा म्हणालेली की ‘आई वडिलांपासून लांब जाताना ज्या किंकाळ्या मुलांनी फोडल्या त्या अजूनही मला स्वप्नात ऐकू येतात.’

स्रोत

मुलांना बाहेर काढल्यानंतर तिने मुलांची नावे लिहून एका बाटलीत ठेवली आणि ती बाटली आपल्या घराच्या मागे तिने पुरली. तिच्याबरोबर तिचा एक कुत्रा असायचा जो नाझी सैनिक आले की भुंकायचा. त्यामुळं त्या सैनिकांना मुलाचं रडणं ऐकू येत नसे. म्हणून त्याच वेळी कुत्र्याचं भुंकणे सुरु व्हायचे. १९४२ ते १९४३ सालात तिने एकूण २५०० मुलांना वाचवलं.

तिचं हे गुपित मात्र जास्त काळ गुपित राहिलं नाही आणि दुर्दैव म्हणजे नाझींनी अत्यंत छळ केला. नाझींच्या छळामुळे तिचा हात आणि पाय वाईटरीत्या जखमी झाला. इतकं होऊन सुद्धा तिने आपलं कार्य सोडलं नाही. तिच्या ओळखीतील एकाने तिथल्या गेस्टापोला (जर्मन सैनिक) लाच दिल्यानंतर तिची सुटका झाली पण युद्ध संपेपर्यंत नाझींनी तिचा पाठलाग सोडला नाही. तिच्याकडे असलेली त्या मुलांची नावे त्यांनी हवी होती.

स्रोत

युध्द संपल्यानंतर तिने त्या पुरलेल्या बाटलीतून मुलांची नावं आणि त्यांना दत्तक घेतलेल्यांची नावं तपासून तिने त्यांचा शोध घेतला. त्यातील काही तिला भेटले सुद्धा. तर काहींचा पत्ता लागला नाही. तिने त्या मुलांच्या खऱ्या आईवडिलांची नावे सुद्धा लिहून ठेवलेली त्यामुळे मुलांना त्यांच्या पर्यंत पोहोचता आले. पण काही मुलांचे आई वडील आधीच मेले होते.

आयरीन यांच्या या महत्वाच्या कामगिरीबद्दल तिचं नाव २००७ साली नोबेलच्या शांततेच्या पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं होतं. पण तो पुरस्कार तिला मिळाला नाही. पोलंडमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार तिला मिळाला. शिवाय इस्राईलचं नागरिकत्व तिला देण्यात आलं. त्या अनेक उपेक्षित व्यक्तींपैकी ती एक होती जिने युध्द काळात जीवावर बेतून समाज कार्य केलं. तिच्या कामाचा हवा तसा गौरव झाला नाही हे राहून राहून वाटत राहतं. २००८ साली वॉर्सा मध्ये ९८ व्या वयात तिचं निधन झालं.

स्रोत

युध्द समाप्तीनंतर जेव्हा तिचा चेहरा जगासमोर आला तेव्हा तिला असे अनेकजणांचे फोन आले जे सांगत होते ‘तुम्हीच मला वाचवलंत...मला तुमचा चेहरा लक्षात आहे’. पुरस्कारापेक्षा तिला हे दोन शब्द जास्त मोलाचे वाटले असतील हे नक्की.

आयरीन आता मोठे झालेल्या त्या लहान मुलांसोबत !! (स्रोत)

सबस्क्राईब करा

* indicates required