computer

आमीर खानचा मराठी शिकण्याचा प्रवास सांगत आहेत त्याचे शिक्षक सुहास लिमये !!

अमीर खान ज्यांच्याकडून मराठी शिकला ते 'सुहास लिमये' आमीरच्या मराठी शिकण्याचा प्रवास उलगडून सांगत आहेत. दीपलक्ष्मी २०१३ च्या अंकातील लेखाचा काही भाग आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी देत आहोत.

(आमिर खान आणि सुहास लिमये)

आमिर खानला मराठी शिकवायला मी कधी प्रारंभ केला ते मला स्मरत नाही. मात्र मराठी शिकायला सुरुवात करण्याच्या वर्ष-दोन वर्षं आधीच आमिरने दूरचित्रवाणीवरील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत मांडलं होतं की 'प्रत्येकाला राष्ट्रभाषा, राज्यभाषा  व  मातृभाषा या आल्याच पाहिजेत. आमिरचं हे मत केवळ दूरचित्रवाणीवर मिरवण्यापुरतं नव्हतं. अवसर मिळताच त्याने आपला सन्मित्र आणि ख्यातनाम अभिनेता अतुल कुलकर्णीवर शिक्षक शोधण्याची कामगिरी सोपवली. अतुलकडून माझा दूरध्वनीसंपर्क क्रमांक आमिरकडे पोहोचला. त्याने आमिरने यथावकाश माझ्याशी संपर्क साधला आणि मला एक अतिशय सुसंस्कृत आणि जिज्ञासू विद्यार्थी लाभला.

पहिल्याच दिवशी आमिरच्या खारमधील घरी गेलो तो पत्ता शोधण्याचे दिव्या करीतच! परिणाम होऊ नये तोच झाला आणि आमिरच्या घरी मी सुमारे एक तास उशिरा पोहोचलो. एक तास उशिरा का होईना, पोहोचलो एकदाचा! आमिर वाट पाहतच होता. आम्ही छानपैकी बैठक मारून दिवाणखान्यातल्या जाजमावर बसलो. औपचारिकता नावालाही नव्हती!

आमिरने कोणत्याच भाषेचं रीतसर शिक्षण घेतलं नव्हतं ही गोष्ट माझ्या दृष्टीने सोयीचीही होती आणि गैरसोयीचीही. गैरसोयीची यामुळे, की एखादी भाषा रीतसर शिकतात म्हणजे काय करतात ह्याची त्याला किंचिन्मात्र कल्पना नव्हती. आमिरला उर्दू, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषा येतात, पण त्यातली एकही भाषा तो रीतसर शिकलेला नाही.

दुसऱ्या वेळी आमिरकडे गेलो तेव्हा तो तयारीतच होता. पहिल्याच दिवशी न घाबरता शाळेत जाणाऱ्या बालकाच्या चेहऱ्यावर जसा उदंड आनंद दिसतो तसा आमिरच्या चेहऱ्यावर दिसत होता. बहुतेक शाळकरी विद्यार्थ्यांचा शाळेबाबतचा तो उत्साह पुढच्या दहा वर्षांत पार लयाला जातो. मराठी शिकण्याबाबतचा आमिरचा उत्साह मात्र गेल्या सुमारे दोन वर्षांत तिळाइतकाही ओसरलेला नाही.

त्याला शिकवताना मला विविध नाटुकली करावी लागली. हि नाटुकली प्रत्येकी दोन-तीन मिनिटं चालत असत. एका नाटुकल्यात आमिर चक्क भाजीवाला झाला होता तर मी भाजी विकत घेणारा ग्राहक. ते नाटुकलं संपल्यावर भूमिकांची आलटापालट केली गेली. आमिर मोठा अभिनेता, पण या नाटुकल्यात त्याला भूमिकाही करावी लागत होती आणि भूमिकेची संहिताही तयार करावी लागत होती. एकाच नाटुकलं तीन-तीन, चार-चार प्रकारांनी सादर केला जायचं. नाटुकल्यात कधी भाजीवाला असायचा तर कधी भाजीवाली. ग्राहक कधी पुरुष असायचा कधी स्त्री. जे या क्षेत्रातील जाणकार नसतील त्यांच्या माहितीसाठी हे सांगणं आवश्यक आहे की सर्वनामांचीं आणि क्रियापदांची पुल्लिंगी आणि स्रीलिंगी रूपं परिचित व्हावी, ती वापरण्याचा सराव व्हावा हा या वैविध्यामागील हेतू होता.

आमिर मोठ्या जिद्दीचा विद्यार्थी आहे. एखादी गोष्ट जमत नाही, कठीण आहे असा दिसला कि तो त्या गोष्टीवर तुटून पडलाच म्हणून समजा. 'येत नाही म्हणजे काय? आलंच पाहिजे,' ही जिद्द त्याच्यापाशी आहे. ही जिद्द असल्यामुळेच एकदा भर दुपारी त्याने दूरध्वनी संपर्क साधला. गृहपाठात काहीतरी अडलं होतं. नक्की काय अडलं होतं ते आता आठवत नाही. त्याची अडचण मी सोडवली आणि त्याला सांगितलं, हे सर्व शिकवून झालं आहे. तुझ्या अभ्यासाच्या वहीत हे सर्व आहे. आमिरचं उत्तर, 'हो, पण ती वही घरी आहे. मी फक्त गृहपाठाच्या वह्या घेऊन आलो'. मी विचारलं, 'म्हणजे? तू आत्ता कुठे आहेस?' आमिरचं उत्तर ऐकून मी उडालोच. तो म्हणाला, 'मी अथेन्समध्ये आहे, सर. कामामध्ये जरासा वेळ मोकळा मिळाला तरी मी 'मराठी'चा अभ्यास करतो'. याला म्हणावी जिद्द! 

एवढ्या जिद्दीच्या विद्यार्थ्याला दोन गोष्टींवर अद्यापि प्रभुत्व मिळवता आलेले नाही. त्यात 'ळ'चा उच्चार आहे. ती पहिली अडचण झाली. त्याला हे स्पष्ट करून झालं की  'ट'चा उच्चार करताना ज्याप्रमाणे जीभ टाळ्याला स्पर्श करते (टाळूला नव्हे) त्याप्रमाणेच जिभेने टाळ्याला स्पर्श करून 'ळ' उच्चारण्याचा प्रयत्न करावा म्हणजे 'ळ' उच्चारला जातो. 'ळ' उच्चारताना त्याला चक्क दोन हातांच्या बोटांनी जीभ कशी टाळ्याला स्पर्शून पुढे सरकते तेही दाखवून झालं. पण मराठीतला 'ळ' त्याला दाद देत नाही. आमिर 'ळ' ऐवजी चक्क 'ड' म्हणतो!

मुंबई पोलिसांच्या एका कार्यक्रमाला आमिर उपस्थित राहिला आणि चक्क मराठीत बोलला. तो कार्यक्रम मला वाटतं सोमवारी होता. कोणत्या सोमवारी ते आठवत नाही. त्या सोमवारच्या आधीच्या शुक्रवारी मी त्याच्या घरी गेलो होतो. रात्री नऊ/साडेनऊ वाजेपर्यंत मराठीचा अभ्यास झाला. त्यानंतर त्याने सोमवारच्या कार्यक्रमाचा विषय काढला. आपल्याला भाषण करावं लागणार आहे आणि आपण ते मराठीत करणार आहोत असा त्याने ठामपणे सांगितलं. त्याने मराठी शिकायला सुरुवात केली त्याला त्यावेळी सुमारे तीन महिने झाले होते. आठवड्याला दोन याप्रमाणे मी त्याच्याकडे वीसवेळा गेलो होतो. क्वचित एखाद्या वेळी तो चित्रीकरणात किंवा अन्य कामात गुंतलेला असला तर अभ्यास होत नसे. केवळ तीन एक महिन्याच्या अध्ययनाच्या बळावर हा मुंबई पोलिसांच्या समारंभात मराठीत बोलणार? ही हिम्मत? पण त्याचा निश्चय होता.

भाषणाचा आराखडा इंग्रजीत तयार होता. त्याचा मराठीकरण करायचं होतं. मी साधारणतः दहा वाजता कामाला लागलो. दीड-दोन वाजेपर्यंत मराठीकरण झालं. नंतर मी ते त्याला वाचून दाखवलं. त्याच्याकडून वाचून घेतलं. मी विचारलं, 'आमिर, शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवसांत हे पाठ होणार काय?' तो म्हणाला, 'मी हे पाठ करणार नाही. मी पाठ करून भाषण करीत नाही. समोर कागदही धरणार नाही. पहिल्यांदाच मराठीत बोलायचं आहे, त्यामुळे थोडी तयारी तरी करावी लागतेय.' मी दोन-अडीचनंतर तिथून बाहेर पडलो. शनिवारी संध्याकाळी त्याने संपर्क साधून मला कळवलं की संपूर्ण दिवसात त्या भाषणाकडे बघायलाही मिळालं नव्हतं. रविवारी परत त्याने दूरध्वनीसंपर्क साधला. त्याचा संपूर्ण दिवस चित्रीकरणात गेला होता. त्यात पुन्हा सणसणीत ताप होता. बिचारा, क्रोसीन घेऊन चित्रीकरणाला उभा राहिला होता. तरीही दोन तीन वेळा त्याने भाषण कसंबसं वाचून काढलं होतं. सोमवारी परिस्थिती फारशी सुधारलेली नव्हती. संध्याकाळी सहा वाजता त्याने पुनः भ्रमणध्वनीसंपर्क साधला.

'मी काय करू?'    

मी सांगितलं, पहिली दोन वाक्यं आणि अखेरची दोन वाक्यं मराठीत बोल. मधलं सर्व भाषण हिंदीत आणि इंग्रजीत कर. आपण मराठी शिकायला नुकतीच सुरुवात केली आहे, त्यामुळे संपूर्ण भाषण मराठीत करता येत नाही, हे प्रामाणिकपणे सांगून क्षमा माग.  समोरचा बहुतांश श्रोतृवृन्द मराठी असेल. चार वाक्यं मराठीत बोललास आणि आपण मराठी शिकायला प्रारंभ केला आहे हे सांगितलंस तरी तुला ते डोक्यावर घेतील.

पण आमिरने तसं काहीही केलं नाही. त्याने सगळं भाषण मराठीत केलं. एखाद्या ठिकाणी अडखळला, पण तरून गेला.

एकदा मला म्हणाला, 'मी काय करू? मला मराठीचा खूप अभ्यास करायचा आहे, पण वेळच नाही. दिवसात बारा तास चित्रीकरण चालतं. आठ तास झोप घ्यावीच लागते. नाहीतर चित्रीकरणाच्या वेळी झोप यायची. वीस तास इथेच गेले. चित्रीकरणाच्या ठिकाणी जाणं-येणं  याला मुंबईच्या वर्दळीच्या दीड दोन तास लागतात. बावीस तासांचा हा हिशोब. उरलेल्या दोन तासांतील एक तास व्यायाम आणि एक तास स्नान, जेवण यात जातो. मी मराठीच्या अभ्यासाला वेळ कुठून आणू?'

त्याने पुढे विचारलं, आमचं चित्रीकरण चालतं तिथे याल का?' मी 'हो' म्हटलं. त्याने जागा सांगितली... कुलाब्यातील ‘लिओपोल्ड’ उपाहारगृह. सुमारे पंधरा-वीस मिनिटं चित्रीकरण झालं कि अर्धा-पाऊण तास दृश्य बदलण्याच्या धामधुमीत जातो. त्या काळात अभिनेत्यांना काहीही काम नसतं. तेवढ्या वेळात आपण मराठीचा अभ्यास करू अशी त्याची सूचना होती. रात्री सुमारे साडेअकरा ते अडीच एवढ्या काळात आम्हाला सुमारे दीड तासाचा अवधी मिळाला. तो मराठी अध्ययनाच्या कमी उपयोगात आणला. चित्रीकरणाच्या वेळी मी फक्त लिओपोल्ड मधेच गेलो आहे असं नाही. शीवमध्ये एक बहुपटीय चित्रपटगृह आहे तिथेही गेलो होतो. भायखळ्याला ‘रिचर्डसन क्रुडास’चा कारखाना आहे तिथे, ‘मेट्रो’ चित्रपटगृहाच्या समोरच्या बाजूला, माटुंग्याच्या पंचोद्यानाच्या परिसरात... अशा बऱ्याच ठिकाणी आमिरला मराठी शिकवण्यासाठी मी गेलो आहे.

मराठी शिकण्याची एवढी प्रचंड तळमळ असलेल्या या माझ्या विद्यार्थ्याला ही  भाषा शिकण्यासाठी पुरेसा मोकळा वेळ मिळावा, त्याला मराठीवर प्रभुत्व मिळावं आणि त्याने मराठीसाठी आणि मराठीत काही भरीव कामगिरी करावी ही इच्छा. इत्यलम्!

 

लेखक : सुहास लिमये

 

(हा लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल दीपलक्ष्मीचे संपादक 'हेमंत रायकर' यांचे आम्ही आभारी आहोत.)

सबस्क्राईब करा

* indicates required