computer

रणरागिणींच्या कथा: पुरुषी वर्चस्वाला पुरुष होऊन भिडणारी, मुत्सद्दी राजकारणी, अतिपराक्रमी आणि तितकीच क्रूर राणी नेझिंगा!!

राजघराण्याचा वारस चालवण्यासाठी तरी मुलगा हवाच, या समजाला धक्का देत १७ व्या शतकात राणी ॲना नेझींगाने वडिलांनंतर सत्ता आपल्या हातात घेतली. फक्त सत्ता घेऊन ती स्वस्थ बसली नाही, तर आफ्रिकन लोकांचा व्यापार करणाऱ्या पोर्तुगीजांना तिने कायम आपल्या धाकात राहण्यास भाग पाडले. आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून विकण्यास तिचा सख्त विरोध होता. कधी चर्चेच्या मार्गाने तर कधी युद्धाने तिने पोर्तुगीजांना ‘हम किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.

अगदी आजही वंशाचा दिवा किंवा वारसदार म्हणून मुलाकडेच पाहिले जाते. पण सतराव्या शतकात राणी ॲना नेझींगाने राजगादीवर आपला हक्क सांगून मोठी आपत्तीच ओढवून घेतली होती. यासाठी काही काळ तिला राज्यापासून दूर व्हावे लागले. सगळ्या आपत्ती झेलूनही राणी ॲना राजसत्ता मिळवण्यात यशस्वी ठरली. यासाठी साम, दाम, दंड, भेद असे सगळे पर्याय तिने वापरले, पण आपला हक्क सोडला नाही. पराक्रमासोबतच राजकर्त्यांकडे कुटिलता आणि चातुर्यही असावे लागते, तेही राणी नेझींगामध्ये अगदी कुटूनकुटून भरले होते. राणी नेझींगाची ही कथा तुम्हाला जितकी प्रभावी तितकीच किळसवाणीही वाटेल. का ते पुढे वाचा.

नेझींगाचा जन्म १५८३च्या सुमारास झाला. निगोला किलौंजी सांबा आणि मबुंदू राणीचा शाही वारसा मिळालेली ही राजकन्या तशी लहानपणापासूनच चाणाक्ष होती. तिच्या इतर बहिणी आणि भावापासून तिला वेगळे ठरवणारे काही गुण उपजतच मिळाले होते. शिवाय, वडिलांचे अतोनात प्रेम होतेच ज्यामुळे ती लहानवयातच राज्यकारभार जवळून पाहू शकली. वडिलांचे नडोंगो आणि आईचे मतांबा राज्य अशी दोन राज्ये मिळून अँगलो या नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली होती.

ती जन्मजातच हुशार होती. तिच्या लहानपणीच तिने अनेक युद्धे पहिली होती. राजकारण म्हणजे काय आणि सैन्यदलासंबधीचे अनेक धडे तिने याच वयात गिरवले होते. राजा निगोलाने तिला युद्ध कौशल्यही शिकवले होते. त्याकाळी मुलींना युद्धशास्त्राचे धडे दिले जात नसत. तरीही राजाने आपल्या या मुलीला प्रत्यक्ष युद्धातही निपुण बनवले होते.

राजा निगोलाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा मबांडेकडे राजसत्ता आली. अर्थात नितीनियामानुसार राजाचा मुलगा हाच राजाचा उत्तराधिकारी असतो, त्यामुळे हे होणारच होते. पण त्याच्याकडे प्रभावीपणे राज्यशकट हाकण्याची क्षमता नव्हती. पोर्तुगीजांशी शांततेच तह करताना त्याने सामूहिक बाप्तिस्मा घेण्याची अट मान्य केली तेव्हा तिने त्याच्या विरोधात उघड उघड प्रचार करण्यास सुरुवात केली. त्यानेही आपल्या बहिणीला आव्हान देत सत्ता हवी असेल तर ती माझ्या मृत्यूनंतरच म्हणत तिला डिवचले. राणी नेझींगा एखाद्या पुरुषाप्रमाणे स्वतंत्र राहत होती. तिला अनेक प्रियकर होते आणि पुरुष रखेलही होते. अशाच एका रखेलापासून तिला एक मुलगा झाला होता. पण तिचा भाऊ राजा मबांडेने या मुलाला जन्मत: क्षणीच मारून टाकले. शिवाय आपल्या तिघी बहिणींना कधीही मूल होऊ नये म्हणून त्याने त्यांच्या पोटावर उकळते रसायन ओतले होते. नेझींगाला शेवटपर्यंत मुल झालेच नाही. आपल्याला एखादे मूल व्हावे ही तिची खूप तीव्र इच्छा होती, पण ती शेवटपर्यंत अपुरीच राहिली. तिच्या शेवटच्या दिवसात तर या इच्छेने इतकी उसळी घेतली की राणी मुलाच्या आशेने धर्मपरिवर्तन करण्यासही तयार झाली होती.

१६२४ मध्ये राजा मबांडेचा मृत्यू झाल्यानंतर तिने अधिकृतपणे राज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. सत्तेवर येताच तिने राजा मबांडेच्या एकुलत्या एक मुलाला मारण्याचे आदेश दिले. आपल्या मुलाला मारल्याचा सूड तिने याप्रकारे उगवला.

एक स्त्री शासक आपल्यावर राज्य करणार ही कल्पनाच तिच्या जनतेला पटली नाही. दुसरीकडे पोर्तुगिजांचा विरोधही वाढला होता, अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत तिने राज्यापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला. याकाळात तिच्या बहिणी तिला राज्यातील हालहवाल कळवीत असत. दोन वर्षांनी ती पुन्हा आपल्या राज्यात परत आली. पोर्तुगीजांनी तिच्या बहिणींना बंदी बनवून नेले, पण राणी नेझींगा पोर्तुगीजांना चकवा देण्यात यशस्वी ठरली.

पोर्तुगीजांविरुद्ध लढण्यासाठी तिने शेजारच्या इम्बागाला कासा राजाकडून मदत मागितली. त्याने मदत देण्यास तयारी दाखवली, पण त्याबदल्यात नेझींगासमोर लग्नाची अट ठेवली. नेझींगाने त्याची हे अट मान्य केली. राजा कासासोबत लग्न झाल्यानंतर नेझींगाला एक शूर योद्धा बनण्यासाठी विचित्र रूढी पार कराव्या लागल्या. एका रूढीनुसार तिला माणसाचे रक्त प्यावे लागले, तर आणखी एका रूढीमध्ये आपल्याच मुलाचा बळी देऊन त्याच्या शरीरापासून तेल काढून त्याने संपूर्ण शरीराला मालिश करावी लागली. आता राणी नेझींगाला तर स्वतःचा मुलगा नव्हता. पण ही रूढी पार पाडण्यासाठी तिने आपल्याच एका दासीच्या मुलाचा बळी दिला. शस्त्र धुरंधर आणि शूर योद्धा अशी बिरुदावली बहाल करण्यात आली. यानंतर हळूहळू तिने स्वतःचे सैन्य जमवायला सुरुवात केली. सर्वात आधी तिने मतांबा राज्याच्या मुआंगो राणीला आणि तिच्या मुलीला बंदी बनवले. नंतर काही काळाने त्यांना सोडून देण्यात आले.

मतांबा राज्यावर सत्ता स्थापन केल्याने तिला आता तिच्या राज्यातही मान्यता मिळू लागली. आपल्याला पुरुष समजले जावे, एखाद्या पुरुषाला जे मानसन्मान मिळतात ते तिला दिले जावेत असे तिने नियम बनवले. तिने निगोला नुतोम्बो नावाच्या आणखी एका पुरुषाशी विवाह केला. आपल्या सगळ्या प्रियकर, रखेल आणि दोन्ही नवऱ्यांना ती स्त्रियांसारखी वेशभूषा करण्याची सक्ती करत असे. वयाच्या साठीनंतरही तिचे वर्तन असेच राहिले. पुरुषांचा भर सभेत अपमान करणे, त्यांना घालून पडून बोलणे हा तर तिचा छंदच होता. कर्मकांडासाठी पुरुषांचा बळी चढवण्यातही ती मागेपुढे पाहत नसे.

पोर्तुगीजांना शह देण्यासाठी तिने डचांशी हातमिळवणी केली. तरीही तिला पोर्तुगिजांचा संपूर्ण पाडाव करणे किंवा त्यांना पूर्णतः आपल्या राज्यातून हाकलून लावले जमले नव्हते. त्यांचा जो गुलामांचा व्यापार चाले, त्यावर मात्र तिचा वचक होता. त्यांनी व्यापार करण्यापूर्वी तिच्याशी व्यवहार करणे, बंधनकारक होते.

एकदा ती एका पोर्तुगीज गव्हर्नरशी चर्चा करण्यासाठी गेली असता पोर्तुगीज गव्हर्नरने तिला बसण्यासाठी खुर्ची दिली नाही. त्यावेळी तिने आपल्या एका सेवकाला ओणवे बसवून त्याची खुर्ची करून त्यावर बसली. तिने पोर्तुगीजांना दाखवून दिले की तिला त्यांच्या बरोबरीचा आदर मिळाला पाहिजे. पोर्तुगीज जर बऱ्या बोलाने ऐकत नसतील तर ती शास्त्रांच्या भाषेत समज द्यायलाही मागेपुढे पाहत नसे.

वयाची साठी उलटल्यानंतरही तिला आपल्याला एक मूल हवे ही इच्छा फार प्रबळ होती. तिची ही कमजोरी ओळखून मिशनऱ्यांनी तिच्यापुढे ख्रिस्ती पद्धतीने विवाह केल्यास तिला मूल होईल असे आमिष दाखवले. तिला मूल हवे असेल तर तिच्या सर्व पुरुष रखेलांचा त्याग करून तिने आम्ही म्हणू त्या मुलाशी लग्न करावे लागेल अशी अट तिच्यासमोर ठेवण्यात आली. मुलाच्या आमिषाने तिने ही अट मान्य केली. सेबस्तिओ नावाच्या मुलाशी तिचे १६५७ साली रीतसर लग्न लावून देण्यात आले. तिच्या संपूर्ण जमातीला ख्रिस्त धर्मात परावर्तीत करण्यात आली. इथून पुढे तिच्या राज्यात नरबळी दिले जाणार नाहीत अशीही तरतूद करण्यात आली.

१६६२ पासून नेझींगा सतत आजारी पडू लागली. त्याच्या पुढच्या वर्षी तर ती अंथरुणालाच खिळून राहिली. आपल्या राज्याला वारस नाही, ही गोष्ट तिला आतून पोखरत होती. तिला वारंवार ताप येऊ लागला. शेवटी तिची फुफ्फुसे निकामी झाली आणि त्यातच तिचे निधन झाले.

१७ डिसेंबर १६६३ रोजी झोपेत असतानाच तिचा मृत्यू झाला. आश्चर्य म्हणजे जी स्त्री स्वतः एखाद्या पुरुषाप्रमाणे जीवन जगली, तिला शेवटच्या काळात आपल्याला एक तरी मुलगा हवा होता या विचाराने पोखरून काढले.

पुरुषी वर्चस्वाला पुरुष होऊन भिडण्याचा तिने प्रयत्न केला असला तरी स्वतःतीलच न्यूनगंडाला ती जिंकू शकली नाही, हेच खरे.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required