computer

५० वर्षे जळत असलेले नरकाचे प्रवेशद्वार तुर्कमेनिस्तान अखेरीस बंद करत आहे. जाणून घ्या याबद्दल सर्वकाही..

निसर्ग सौंदर्याने नटलेली प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद काही औरच असतो. अशा ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपल्याला प्रसन्न आणि उल्हासित वाटते. तर या जगात काही अशीही ठिकाणे आहेत जी पाहिल्यानंतर आपल्या मनावर उदासी दाटून येते. आज आपण जगातील अशा एका विस्तृत खड्ड्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला तिथले स्थानिक लोक नरकाचा रस्ता म्हणून ओळखतात. आता हा भला मोठा खड्डा कसा निर्माण झाला आणि त्याला हे नाव का पडले जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख नक्की वाचा.

हा नरकाचा रस्ता म्हणजेच 'गेट टू हेल' आहे तुर्कमेनिस्तान नावाच्या देशात. हा देश त्याच्या सुंदर-सुरेख गालिच्यांसाठी आणि उत्तमोत्तम घोड्यांसाठी ओळखला जातो. १९७१ साली जेव्हा आजचा तुर्कमेनिस्तान हा सोव्हिएत यूनियनचा एक भाग होता त्यावेळची ही गोष्ट आहे. सोव्हिएतने तुर्कमेनिस्तानच्या काराकुम वाळवंटात तेलसाठे शोधण्याची मोहीम चालवली होती. याच मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबाद पासून अवघ्या १५० मैल अंतरावर असणार्‍या देवरेझ या गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत खोदकाम सुरू केले. काही फूट खोदताच त्या ठिकाणची वाळू आपसूकच ढासळू लागली आणि तिथे इतका मोठा खड्डा तयार झाला की खोदकामाचे पूर्ण मशीनच त्या खड्ड्यात गायब झाले. शास्त्रज्ञांना जिथे तेलाचा साठा सापडण्याची शंका होती, प्रत्यक्षात तो नैसर्गिक वायूचा साठ निघाला. या साठ्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची गळती सुरू झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मिथेन वायूची गळती रोखणे आवश्यक होते. कारण मिथेन वायू हवेत पसरू लागला की हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमीकमी होऊ लागते. हवेतील ऑक्सिजन जितका मानवासाठी गरजेचा आहे तितकाच तो जंगली प्राण्यांसाठीसुद्धा गरजेचा आहे.

मिथेनच्या गळतीमुळे प्राण्यांचा श्वास घेणे कठीण जाऊ लागले. बऱ्याचदा जेव्हा असा नैसर्गिक वायूच्या साठ्यात मिथेन सापडतो तेव्हा त्या साठ्याला आग लावली जाते. जेणेकरून अतिरिक्त मिथेन जळून जाईल आणि उरलेला वायू वापरता येईल. देवरेझच्या या साठ्यातील मिथेनही अशाच प्रकारे जाळून टाकण्याचे ठरवण्यात आले. काही आठवड्यांतच हा मिथेन संपून जाईल आणि पुढचे काम सुरू करता येईल अशा आशेने त्या साठ्याला आग लावण्यात आली. पण दुर्दैवाने अजूनही ती आग विझलेली नाही. १९७१ पासून ते आजतागायत देवरेझच्या परिसरातील २३० फूट रुंद आणि ६५ फूट खोलीचा हा खड्डा तसाच जळतो आहे. या खड्ड्याच्या आकारमानावरूनच यातून उठणारे आगीचे लोळ किती मोठे असतील याची कल्पना येईल. या आगीने आजवर अनेक जंगली प्राण्यांना आणि कीटकांना आपले भक्ष्य बनवले आहे.

गेल्या पन्नास वर्षांत हा जळता खड्डा पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. जगातल्या सर्वाधिक फोटो घेतल्या गेलेल्या काही ठिकाणांमध्ये या 'नरकाच्या प्रवेशद्वाराची' गणती होते. काही अंतरावरून ज्वालांचा हा नाच नयनरम्य वाटत असला तरी स्थानिक लोकांना मात्र याचा प्रचंड त्रास होतो आहे. साहजिक आहे, यामुळे जंगली जीवांना धोका निर्माण झाला आहे, शिवाय चोवीस तास सुरू असलेल्या या आगीतून किती मोठ्या प्रमाणातून कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन होत असेल याचीही गणती होऊ शकत नाही. या खड्ड्यामुळे परिसरातील जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. सोव्हिएतने इथे खड्डा खोदून तो तसाच सोडून दिला असला तरी आता मात्र तुर्कमेनी लोकांना या आगीवर काही तरी ठोस उत्तर हवे आहे.

म्हणून अलीकडेच तुर्कमेनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गुर्बांगुली बेर्दिमुहम्मेदोव यांनी देशातील संशोधकांना ही आग कायमची विझवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत विचार विमर्श करून उपाय सुचवण्याचे आवाहन केले आहे. बेर्दिमुहम्मेदोव यांच्या मते हा खड्डा परिसरातील वन्य जीवांसाठी आणि नागरिकांसाठी अतिशय धोक्याचा ठरला आहे. आजपर्यंत या जळणाऱ्या खड्ड्यामुळे आम्ही खूप नुकसान सोसले आहे. बेर्दिमुहम्मेदोव यांनी २०१३ सालीच काराकुम वाळवंटाचा हा परिसर संरक्षित पट्टा म्हणून जाहीर केला होता. कारण या परिसरातून मोठ्या प्रमाणात वन्य जीवांची तस्करी होत होती. ती या धोरणामुळे काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. आता त्यांना या खड्ड्यामुळे आजूबाजूच्या परिसरात जे प्रदूषण पसरत आहे, त्यावर रोख लावण्याची इच्छा आहे.

मिथेन वायूच्या या गळतीमुळे ओझोनच्या थराचीही हानी होते म्हणूनच त्यांना हा खड्डा आता बुजवून टाकायचा आहे. पण यावर नेमके कोणते उपाय योजता येतील याबाबत अजून तरी स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. तुर्कमेनिस्तान मध्ये नैसर्गिक वायू साठ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणूनच हा देश सर्वाधिक मिथेन उत्सर्जन करणारा देश म्हणूनही ओळखला जातो. मिथेन वायू हा कार्बनडाय ऑक्साईडच्या तुलनेत पाचपट अधिक घातक आहे. तुर्कमेनिस्तानमधील प्रदुषणाचा प्रश्न यामुळेच अतिशय गंभीर बनला आहे. शिवाय यामुळे हवेतील ओझोनच्या थराला हानी पोहोचते आणि पृथ्वीच्या तापमानात आणखी भर पडते आहे ते वेगळेच. मिथेन जाळण्यासाठी देशातले नैसर्गिक वायूचे साठे वापरले जात आहेत आणि ही महत्त्वाची साधनसंपत्ती वाया जात आहे हे कारणही तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षांनी दिले आहे.

तर या भल्या मोठ्या खड्ड्याला इथले लोक नरकाचे प्रवेशद्वार का म्हणतात हे तुम्हाला कळले असेलच.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required