बाल दिन विशेष : भुकेने व्याकुळलेल्या बाळाला एअरहोस्टेसने दिले स्तनपान !!

मंडळी, आज आहे बालदिन… आज या निमित्ताने आम्ही सांगणार आहोत अशा घटनेबाबत ज्यात एका एअर होस्टेसने प्रवाशाच्या रडणाऱ्या बाळाला स्वतःचे दूध पाजले. होय मंडळी! पॅट्रिशिया ओरगॅनो हे त्या एअरहोस्टेसचे नाव. पाहूया नेमकं काय घडलं…

स्रोत

गेल्या सहा नोव्हेंबरला पॅट्रिशियाची एका फ्लाईट मध्ये ड्युटी होती. विमानाने टेक ऑफ घेईपर्यंत सर्व सुरळीत चालू होते मात्र विमान आकाशात झेपावल्यावर पॅट्रिशियाला नवजात बाळाचे रडणे ऐकू आले. ती स्वतः नऊ महिन्यांच्या बाळाची आई असल्याने तिला बाळ भुकेमुळे रडतंय याची त्वरित कल्पना आली. बाळाचे रडणे भुकेमुळे आहे की इतर काही कारणांमुळे याचा अंदाज फक्त आईलाच येऊ शकतो. आणि त्यात एका एअरहोस्टेसची जबाबदारी असते की फ्लाईट मधील सर्व प्रवाशांची काळजी घेणे. पॅट्रिशिया वेळ न घालवता त्या बाळाच्या आईला म्हणाली, बाळाला भूक लागली असेल. तुम्ही बाळाला स्तनपान करा. पण बाळाच्या आईने डोळ्यात पाणी आणून उत्तर दिले की तिचे दूध संपले आहे.

लहान मूल एक वर्षांचं होईपर्यंत गाई-म्हशीचं दूध देऊ नये असं डॉक्टर सांगतात. अशावेळेस फॉर्म्युला दूध मुलांना दिलं जातं. या बाळाच्या आईकडचा दूध बनवण्याचा फॉर्म्युला संपला होता आणि बाळाला भूक लागली होती.

एव्हाना इतर सर्व प्रवाशांचा नजरा बाळाच्या रडण्यामुळे बाळाकडे आणि त्याच्या आईकडे लागल्या होत्या. हे दृश्य बघून पॅट्रिशिया कळवळली. शेवटी एका आईचे दुःख दुसरी आईच समजू शकते. त्याच क्षणी तिने एक निर्णय घेतला… त्या रडणाऱ्या बाळाला स्वतःच स्तनपान करण्याचा! पॅट्रिशिया तिच्या सोबत असणाऱ्या मदतनिसाच्या साहाय्याने आई आणि बाळ एका अशा ठिकाणी आले जिथे इतर कुणी प्रवासी नव्हते. त्या ठिकाणी पॅट्रिशियाने बाळाला स्तनपान करवले. बाळाचे जोपर्यंत पोट भरले नाही आणि बाळ शांत झोपले नाही तोपर्यंत ते पॅट्रिशियाच्या कुशीतच होते आणि अर्थातच बाळाचे रडणे थांबले होते. नंतर त्याला त्याच्या आईकडे सुपूर्द केले गेले. 

स्रोत

पॅट्रिशिया म्हणते, “मी त्या आईच्या डोळ्यात समाधान बघितले. तिने मला मनापासून धन्यवाद दिले.” 

ही घटना स्वतः पॅट्रिशियाने तिच्या फेसबुक प्रोफाईलवर पोस्ट केली आहे. सोबत बाळाचा कुशीत घेतलेला फोटोही आहे. मात्र, बाळाची प्रायव्हसी जपण्यासाठी त्याचा चेहरा दाखवला नाही. पोस्टला या क्षणापर्यंत 1 लाख 85 हजार लोकांनी लाईक केले असून 12 हजारापेक्षा जास्त कमेंट्स आलेल्या आहेत. तसेच 38 हजारांपेक्षा जास्त वेळा ही पोस्ट शेअर झाली आहे. 

काही जणांच्या कमेंट्स नुसार, आई व्यतिरिक्त दुसऱ्या महिलेने बाळाला दूध पाजले तर आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. या घटनेवर यु.एस. मेडिकल कौन्सिलने सुद्धा असे भाष्य केले आहे की, ‘अशा प्रकारे स्तनपान केल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते. इन्फेक्शन तसेच संसर्गजन्य रोग होण्याचा धोका बाळाला असतो.’ 

पण मंडळी, त्या क्षणी पॅट्रिशियाला जे योग्य वाटले ते तिने केले. आणि तिच्या या समयसुचकतेमुळे तसेच सहृदयतेमुळे आज जगभर तिचे कौतुक होत आहे.

आजच्या बालदिनानिमित्त बोभाटातर्फे त्या बाळाला खूप खूप शुभेच्छा आणि पॅट्रिशियाला सलाम!

सबस्क्राईब करा

* indicates required