विमानतळावरचा कर्मचारी चक्क अस्वलाच्या वेशात माकडाच्या मागे का पळत होता?

पाखरांनी पिकाची नासाडी करू नये म्हणून शेतात बुजगावणं उभं केलं जातं. कालांतराने पाखरांना हे बुजगावणं खोटं असल्याचं समजतं आणि ते त्याच्या अंगाखांद्यावर कोणत्याही भितीशिवाय जाऊन बसतात. म्हणूनच की काय आता खरोखरच माणूस नेमावा लागत आहे.
तर त्याचं झालं असं, की गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल अंतराष्ट्रीय विमानतळावर एक कर्मचारी चक्क अस्वलाच्या वेशात माकडाच्या मागे पळत होता. कारण काय तर हल्ली विमानतळावर मोठ्याप्रमाणात माकडं येत आहेत. त्यांच्यामुळे विमानतळाच्या कामात अडचण येते. या समस्येवरचा जालीम उपाय म्हणून विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याला खास माकडांना पळवण्याची जबाबदारी दिली आहे. हा पाहा व्हिडीओ.
#WATCH Gujarat: An airport official at Sardar Vallabhai Patel International Airport in Ahmedabad dressed in 'bear' costume to scare away langoors on the premises. (Source-Airport Authority of India) pic.twitter.com/Qa6iIPFoLq
— ANI (@ANI) February 7, 2020
व्हिडीओत दिसणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आहे जलदीप कापडी. ज्या ज्या वेळी माकडं धावपट्टीवर येतात त्या त्या वेळी तो अस्वलाचे कपडे घालून माकडांच्या मागे पळतो. माकडं त्याला चांगलीच टरकून आहेत.
विमानतळाचे डायरेक्टर मनोज गांगल म्हणतात की ‘माकडं अस्वलांना घाबरतात म्हणून अस्वलाचे कपडे तयार करण्यात आलेत. हा प्रयोग यशस्वी पण झालाय. अस्वलाचे कपडे घातल्यावर माकडं घाबरतात आणि पळून जातात. गेल्या आठवडाभरापासून हा प्रयोग केला जातोय.’
तर मंडळी, थोड्या दिवसात जेव्हा माकडांना समजेल की आपण ज्याला घाबरतोय तो खरोखरचा अस्वल नाही तेव्हा काय कोणती शक्कल लढवणार?