computer

आमीर खानच्या गाण्याने तिला २० वर्षांनी आपल्या घराचा पत्ता कसा शोधून दिला ??

ही अगदी फिल्मी ‘सत्य घटना’ आहे. पण बऱ्याचदा खरं आयुष्य हे सिनेमापेक्षा जास्त ‘फिल्मी’ असतं. जुन्या फिल्म्समध्ये एक कथानक हमखास यायचं. मुलगा किंवा मुलगी लहानपणी हरवते आणि मोठं झाल्यावर त्याला/तिला सगळं आठवतं. या घटनेतही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

मारिया ही ५ वर्षांची असताना हरवली आणि ती केरळच्या इडुक्की येथे पोहोचली. तिथे एका रिक्षावाल्याने तिला बघितलं आणि तिला घेऊन तो पोलीस स्टेशनला गेला. त्यावेळी मरीयाला नीट ऐकू येत नव्हतं आणि तिला बोलण्यातही समस्या येत होती. पोलिसांनी चौकशी केल्यावर तिला आपल्या घराचा पत्ता सांगता आला नाही. तिने आपलं नाव मात्र एका कागदावर लिहून दिलं. तिचं खरं नाव होतं ‘अमिना’. तिने हेही सांगितलं की ते ५ भाऊ बहिण आहेत.

मारियाच्या हातावर ७८६ क्रमांक गोंदवलेला होता. या आधारावर आणि तिने सांगितलेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या घरच्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी तिला एका आश्रमाकडे सुपूर्द केलं आणि ती तिथेच लहानाची मोठी झाली.

यानंतर या कथेत फारसं काही घडत नाही. अमिनाचं नाव बदलून मारिया ठेवण्यात आलं. तिचं लग्नही झालं. तिला ६ मुलं झाली. एके दिवशी ती आणि तिचा नवरा टीव्ही पाहत होते. टीव्हीवर ‘अकेले हम अकेले तुम’ गाणं सुरु होतं. सुरुवातीच्याच एका सीनमध्ये आमीर खान सायकल चालवतोय असं दृश्य दिसतं. मारियाला या दृश्याच्या मागे असलेल्या जागेवरून आपलं घर आठवलं.तिने इशाऱ्यानेच नवऱ्याला सांगितलं की ही तीच जागा आहे जिथे ती लहानपणी खेळायची.

जागा तर समजली पण ती नक्की आहे कुठे हे मात्र समजत नव्हतं. याचा शोध घेत असताना तिचा नवरा रोडीमॉन याने थेट सिनेमाच्या दिग्दर्शकाला गाठलं. दिग्दर्शक मन्सूर खान यांना रोडीमॉन  उटी येथे भेटला. मन्सूर खान यांनी सांगितलं की ते दृश्य ‘मुंबईच्या फँटसी अॅम्युझमेंट पार्क’ येथे चित्रित करण्यात आलं होतं.

मारियाने सांगितल्याप्रमाणे तिचं घर या जागेपासून १ तासाच्या अंतरावर होतं. तिच्या कॉलनीच्या जवळ असलेल्या मैदानात तिरंगा फडकत असायचा. जवळच एक रेल्वे रूळ असल्याचही तिने सांगितलं.

सध्या मारिया आणि रोडीमॉन हे या माहितीच्या आधारे ती जागा शोधत आहेत. त्यांना फक्त मल्याळी भाषा येत असल्याने त्यांना अडचण येत आहे. त्यांनी म्हटलंय की आम्हाला मदतीची गरज आहे.

तर मंडळी, एका गाण्यावरून मारियाला तिच्या घरापर्यंत पोहोचण्याचा एक तर धागा सापडला आहे. ती आपलं घर शोधण्यात यशस्वी होईल का हे आता पाहण्यासारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required