computer

मिरचीबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

जगात गोडघाश्या लोकांची कमतरता नाही, तशीच झणझणीत तिखट खाण्याची आवड असलेलेही कमी नाहीत. अनेक पदार्थांचा स्वाद मिरची घातल्याने खुलतो. बटाटेवडा, ढोकळा अशा पदार्थांबरोबर ती तळलेल्या अवतारात समोर येते, तर तोंडीलावणे म्हणून लसूण, शेंगदाणे यांच्यासह खर्ड्यात वाटली जाते. भारतीय स्वयंपाकाचा अविभाज्य घटक असलेल्या या मिरचीची ओळख करून घेऊया.
 

१. भारताव्यतिरिक्त थाई, मेक्सिकन खाद्यसंस्कृतीचा मिरची हा महत्त्वाचा भाग आहे.

२.  मिरचीची तिखट चव ही खरी चव नाही. प्रत्यक्षात तो आपल्या जिभेवरील पेशींनी दिलेला प्रतिसाद आहे.मिरचीतील कॅपसेसिन या घटकामुळे जिभेच्या वेदनाग्राहक पेशी उत्तेजित होतात, त्यामुळे तिखटपणा व जळजळ जाणवते.

३. मिरचीतील तिखटपणा मोजण्यासाठी स्कोविल हे परिमाण वापरतात. याचे स्केल १ ते १० असते. ब्याडगी, संकेश्वरी या मिरच्यांचा तिखटपणा १० स्कोविलच्या जवळपास आहे.

४. मिरचीचा तिखटपणा मोजण्याची एक पद्धत म्हणजे त्या मिरचीपासून तयार होणाऱ्या एक कप पदार्थामध्ये किती कप साखरेचे पाणी घातल्यावर तिखटपणा अजिबात जाणवणार नाही हे पाहणे. जेवढे कप पाणी लागेल त्यावरून हे प्रमाण ठरवले जाते.

५. मिरचीच्या आत असलेल्या पांढऱ्या-मांसल भागात कॅपसेसिन सर्वात जास्त असते, तर बियांमध्ये कमी असते.

६. कोवळ्या मिरच्यांपेक्षा जून झालेल्या मिरच्यांमध्ये कॅपसेसिन जास्त असते, त्यामुळे त्या जास्त तिखट असतात.

७. भारतात मिरची सर्वप्रथम पोर्तुगीजांनी आणली. मिरचीची लागवड आधी गोव्यात आणि मग उर्वरित देशात करण्यात आली. त्यामुळे काही जुन्या ग्रंथात तिचा उल्लेख 'गोवई मिरची' असा केलेला दिसतो.

मात्र ईशान्य भारतात आढळणारी जंगली मिरचीची एक जात, भारतात मिरची पोर्तुगीजांनी आणली या समाजाला छेद देते. वनस्पतिशास्त्रज्ञांच्या मते ही मिरची पोर्तुगीज भारतात आले त्याच्या आधीपासून ईशान्य भारतातील जंगलात अस्तित्वात होती. या मिरचीचे नाव आहे राजा मिरची. ही मिरची जगातील पाच सर्वाधिक तिखट मिरच्यांमधील एक आहे. भारतातील ही सर्वात तिखट मिरची समजली जाते. ही मिरची खाल्ल्यावर व्यक्ती अक्षरशः अंगात भूत आल्यासारखे करते. ही मिरची इतकी तिखट असते की तिची चव घेताच व्यक्ती गडाबडा लोळते. अशा समजुतीने हिला घोस्ट पेपर किंवा भूत जोलोकिया असेही म्हटले जाते.

८. आंध्रप्रदेशात गुंटूर येथे मिरची संशोधन केंद्र आहे.

९. आपल्याकडे 'कानामागून आली अन् तिखट झाली' अशी म्हण आहे. ती मिरचीवरूनच आली आहे. याचे कारण भारतात मिरचीच्या आगमनापूर्वी तिखटपणासाठी मोहरी, मिरे यांचा वापर केला जाई. मात्र मिरची इथे आल्यावर इतकी रुजली, की पदार्थाला तिखटपणा प्राप्त होण्यासाठी तिचाच सर्रास वापर केला जाऊ लागला.

१०. भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ईजिप्त, स्पेन, चीन, जपान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, मलेशिया, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. मात्र मिरचीच्या उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर भारत आहे.

११. भारतीय मिरचीचा वापर करण्यातही सढळ हाताचे आहेत. एका सर्वेक्षणानुसार २०१८ मध्ये वर्षभरात प्रत्येक व्यक्तीने जवळपास पाच किलो मिरची खाल्ली.

तर अशी आहे मिरचीची रंजक कथा. मूळची इथल्या खाद्यसंस्कृतीचा भाग नसलेली तरी स्वयंपाकघरात अलगद सामावून गेलेली मिरची आता इतकी आपली झाली आहे, की तिच्याशिवाय पान हलत नाही. तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर ती जरूर शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required