computer

पुष्पा सिनेमात दाखवलेलं रक्तचंदन इतकं महाग आणि महत्त्वाचं का आहे? जाणून घ्या रक्तचंदनाबद्दलची ही सर्व माहिती!!

सध्या भारतात अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. यातील गाणी, डायलॉग्स प्रत्येक गोष्ट सुपरहिट झाली आहे. बॉक्सऑफिसवरील कमाईच्या बाबतीत हा सिनेमा सर्वात पुढे आहे. या सर्वांबरोबर अजून एक गोष्ट तितकीच सुपरहिट आहे ती म्हणजे ज्या गोष्टीवर आधारीत हा सिनेमा आहे ते रक्तचंदन!!!

स्मगलिंग आणि भारतीय सिनेमे यांचे नाते नवे नाही. कधी सोने कधी ड्रग्स स्मगलिंग आणि त्यातून जन्म घेणारी गुन्हेगारी हे बॉलिवूडचे फेव्हरिट विषय आहेत. पण पुष्पा सिनेमात ज्या रक्तचंदनची तस्करी दाखवली आहे. ही खरी तस्करी आहे. सोन्यापेक्षा कैक पट हे रक्तचंदन महत्वाचे समजले जाते. पैसे काय झाडावर उगतात का असा डायलॉग कुणीही फेकतो. पण हे झाड खरोखर पैसे उगवते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

रक्तचंदनला परीस म्हटले जाते. ज्याच्या हाती हे लागले त्याचे दिवस बदललेच म्हणून समजा. हे रक्तचंदन तसे तीन रंगामध्ये उपलब्ध असते. पांढरा, पिवळ्या आणि लाल. पण लाल रक्तचंदन हे इतर दोघांच्या मानाने अनेकपटीने महत्वाचे समजले जाते. म्हणूनच याला लाल सोने असेही म्हटले जाते. पिवळ्या चंदनाचा वापर वैष्णव करतात, तर लाल चंदन शैवपंथी वापरतात. या चंदनाचे वैज्ञानिक नाव Pterocarpus Santalinus असे आहे.

हिंदू धर्मात या चंदनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. अगरबत्तीचापासून तर टिळा लावण्यापर्यंत या लाकडाचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे यापासून महाग फर्निचरही बनवले जाते. याचा वापर केल्यास सुंदरता बहरते असेही म्हटले जात असल्याने याची मागणी मोठी आहे. तसेच दारू बनविण्यासाठीही पण याचा वापर होत असतो.

साहजिक ज्या वनस्पतीला इतके महत्व आहे त्या गोष्टीची मागणी मोठी असेल. कुठलीही गोष्ट जेव्हा सहजासहजी उपलब्ध होणे कठीण असते तेव्हा त्या गोष्टीची तस्करी सुरू होते. ही गोष्ट इथेही लागू पडते. चीन, सिंगापूर, जपान असे अनेक देश आहेत ज्यांना हे लाकूड हवे असते. त्यात चीनमध्ये तर याची खूपच मागणी आहे. या चंदनाच्या व्यापारासाठी लागणाऱ्या बोलीत यूएई, चीन, जपान तसेच अनेक पाश्चात्य देशांतील शेकडो व्यापारी बोली लावतात. चीनमध्ये याची लोकप्रियता आजकालची नाही. तिथे चौदाव्या शतकापासून राज्यकारभार करणाऱ्या मिंग वंशाच्या काळापासून याला महत्व आहे. जपानमध्येही लग्नावेळी वाजवले जाणारे शामीशेन वाद्य बनविण्यासाठी याचा वापर होतो. पण आजकाल या वाद्याचा वापर कमी होत असल्याने जपानपेक्षा चीनमध्येच चंदनाची अधिक मागणी आहे.

पुष्पा सिनेमात दाखवल्याप्रमाणे हे रक्तचंदन फक्त तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर फक्त चार जिल्ह्यांमधील जंगलात सापडते. नेल्लोर, चित्तूर, कडप्पा आणि कुरनूल येथील शेषाचलम डोंगरावर हे रक्तचंदन सापडते. साहजिक जर फक्त इतक्याच भागात ही अतिमहत्वाची वनस्पती सापडत असेल तर त्याची चोरी करून स्मगलिंग करण्याचे प्रयत्नही होतील. जवळपास पाच लाख वर्गहेक्टर इतक्या भागात पसरलेल्या या जंगलात सापडणाऱ्या या विशिष्ट झाडाची उंची ही ८ ते ११ मीटर सांगितली जाते. हे झाड हळूहळू वाढत असल्याने याची घनता खूप जास्त असते. म्हणूनच इतर लाकडांच्या मानाने हे लाकूड पाण्यात लवकर बुडते.

तर जसे सिनेमात दाखवले आहे त्याप्रमाणे या रक्तचंदनाची चोरी होऊन तस्करी नये म्हणून जिथे हे पिकते त्या भागात STF ची स्पेशल तुकडी तैनात करण्यात आली आहे. या चंदनाच्या तस्करीतून तुफान पैसा येऊ शकतो हे माहीत असल्याने अनेक सराईत गुन्हेगार मोठी जोखिम घेऊन तस्करी करण्याचा पर्यटन करतात. पण जर कोणी सापडले तर लवकर बाहेर येण्याचा विषयच नसतो. रक्तचंदनाच्या तस्करीत सापडणाऱ्या लोकांना थेट ११ वर्षापर्यंत कारावासाची कायद्यात तरतूद आहे. तरीही कधी जमिनीवरून, कधी पाण्यातून, तर कधी थेट आकाशातून या चंदनाची तस्करी करण्याचा प्रयत्न होतो. काही बहाद्दर तर याची पूड करून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करतात.

पुष्पा सिनेमातून ही महत्वाची गोष्ट समोर आली आहे. आपल्या देशात असलेली ही संपत्ती जगासाठी किती महत्वाची आहे हे तरी यानिमित्ताने अनेकांना समजले आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required