computer

शार्क टॅंक या टीव्ही शोवर सगळ्यांचे मनं जिकणाऱ्या मालेगावच्या जुगाडू कमलेश बद्दल सगळी माहिती वाचून घ्या

देशात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. इंजिनिअरिंग, एमबीए सारख्या डिग्र्या घेऊन लोक दारोदार नोकऱ्या मिळतात का यासाठी फिरतात असे चित्र आहे. यावर उपाय म्हणून पाश्चात्य देशांसारखी स्टार्टअप संस्कृती भारतात वाढावी यासाठी खासगी आणि सरकारी स्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत.

भारतात खरं बघायला गेले तर मुलांमध्ये क्षमता नाही असे नाही. पण आयडिया आहे, तर पैसा नाही. पैसा जुळवला तर इतर संसाधने नाहीत यातच अनेक तरुणांचे टॅलेंट वाया जाताना दिसते. गेल्या काही वर्षांत अनेक सामान्य घरातील होतकरू तरुणांनी आगळ्यावेगळ्या आयडिया घेऊन स्वत:ला सिद्ध केले आहे. सोनी टिव्हीवर सध्या एक शो सुरू आहे. शार्क टॅंक इंडिया असे त्या शोचे नाव. त्यांची थीम अशी आहे की ज्यांच्या जवळ चांगल्या बिजनेस आयडिया असतील त्यांनी शोमध्ये बसलेल्या उद्योजकांना त्या सादर कराव्या, ज्यांना ही आयडिया आवडली ते या बिजनेसला निधी पुरवतील असे साधे सोपे सूत्र यामागे आहे. हा शो अमेरिकेत २००९पासून चालू आहे आणि यावर्षीपासून भारतात चालू झाला आहे.

परवाचा दिवस मात्र भन्नाट होता. या शोवर आलेल्या एका पठ्ठ्यामुळे हा शो ज्यांना माहीत नव्हता, त्यांनाही माहीत झाला आहे. जुगाडू कमलेश हे नाव कदाचित तुम्ही युट्यूबवर बघितले असेल. या जुगाडू कमलेशचे खरे नाव आहे, कमलेश नानासाहेब घुमरे!!! आपल्या मालेगावजवळील देवारपाडे या खेड्यात राहणारा हा अवलिया भविष्यातील बिग शार्क बनण्यासाठी तयार झाला आहे.

कमलेशने या शोवर सादर केलेले यंत्र देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते. तीन चाकी सायकलसारखे दिसणारे हे यंत्र पेरणी, फवारणीसारख्या प्रचंड मेहनतीचे काम सुसह्य करू शकते. सध्या मोठे शेतकरी फवारणीसाठी ड्रोन वापरायला लागले आहेत. पण सामान्य शेतकरी ड्रोन कुठून विकत घेणार?

कमलेश हा शेतकऱ्याचा मुलगा. १२ वी पास झाला तसे बीसीएला ऍडमिशन घेतले, पण तिथे काही त्याचे मन रमले नाही. पण काही मुलांच्या डोक्यात भन्नाट खूळ असते. कमलेश सांगतो, "आपण शेतकऱ्यांची मुले, नोकरी करून कुणाची गुलामी करणे आपल्याला पसंत नाही." दुसरीकडे वडिलांना शेती करताना येणारा त्रास त्याला दिसत होता. मोठा भाऊ आर्मीत असल्याने घरी कमलेश सर्व बघत होता. त्यांच्या घरात खऱ्या अर्थाने 'जय जवान जय किसान' ही म्हण खरी ठरत आहे. सात वर्षांपूर्वी त्याच्या डोक्यात असे यंत्र तयार करण्याचा विचार आला. जुगाडू व्यक्तिमत्व असल्याने त्याने यावर लवकरच जुगाड लावण्यासाठी हालचाल सुरू केली.

फवारणी करणे हे एकाच वेळी मोठ्या मेहनतीचे आणि धोकादायक काम असते. १५ ते २० लिटरचा टॅंक पाठीवर घेऊन दिवसभर फवारणी करणे, त्यातही त्या कीटकनाशकांमुळे आरोग्याचा प्रश्न कधीही निर्माण होतो. हा टॅंकही काही स्वस्त नसतो. खुद्द कमलेशच्या वडिलांना यामुळे त्रास झालेला होता. हे सर्व बघून हा शेतकऱ्याचा मुलगा जुगाड लावण्यात गुंतून गेला.

अनेकदा कसे असते, एखादा जर असे काही करायला लागला तर रिकामा उद्योग करतोय म्हणून त्याला दुर्लक्षित केले जाते. तसा कमलेश काही भरीव करून दाखवेल हे कुणाला पटले नाही. पण एक व्यक्ती पहिल्यादिवसापासून त्याच्या सोबत होता. तो म्हणजे त्याचा पुतण्या नरु!!! कमलेशने सातत्याने ७ वर्ष मेहनत घेत हे यंत्र तयार केले. भंगारातून सामान आणून त्यातून हळूहळू जुगार करून हे यंत्र तयार केले. याला सायकलसारखे हँडल आहे, तसेच जोडलेल्या स्प्रेमधून सहज फवारणी करता येते. २०१४ मध्ये त्याने हे यंत्र तयार केले. कमलेशला काही पेटंट घेण्याबद्दल माहिती नव्हती. त्याला अनेक उद्योगपतींनी ५-७ लाखांत या यंत्राचे हक्क देण्याची मागणी केली. एवढी मेहनत घेऊन तयार केलेले यंत्र सहज कुणाला विकणे त्याला पटले नाही. त्याने हे यंत्र वापरण्याचा व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. २०१७ साली पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आजवर तब्बल ८० लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

पण म्हणतात ना, क्वालिटी असलेला माणूस जास्त दिवस शांत राहत नाही. सोनी टीव्हीवरील शार्क टॅंक शोवर तो ३० लाखांचे फंडिंग आणि त्याबदल्यात १० टक्के इक्विटी अशी ऑफर घेऊन आला. त्याचे कौतुक तर अनेकांनी केले, पण या कामात त्याला साथ देण्याची तयारी दाखवली ती लेन्सकार्ट या कंपनीचे सहसंस्थापक पीयूष बन्सल यांनी. बन्सल यांनी कमलेशला साहजिक प्रश्न केला, "या कामासाठी तू कर्ज का घेतले नाहीस?" तर कमलेश उत्तरला, "मला कर्ज तरी कोण देणार?" यावर मात्र बन्सल यांनी त्याला थेट २० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली. सोबतच त्याला १० लाख रुपये फंडिंग आणि ४० टक्के प्रॉफिट शेयर अशी ऑफर दिली. आता कमलेश मात्र यावेळी आपला पुतण्या नरु ज्याने त्याला प्रत्येक ठिकाणी सोबत केली त्याला विसरला नाही. त्याला देखील तो शार्क टँकमध्ये सोबत घेऊन गेला होता. इतकेच नाही,तर त्याला देण्यात येणाऱ्या ६० टक्के पैकी १० टक्के नरुला देऊन ही डील फायनल केली.

या फंडिंगमधून हे यंत्र इलेक्ट्रिकमध्ये बदलून हा प्रयोग मोठया प्रमाणावर करण्याचा त्याचा मानस आहे. तसेच या यंत्रातून पेरणी करता येईल अशीही सोय तो करणार आहे. त्याच्या या प्रयोगातून अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळू शकणार आहे. कमलेश हा खऱ्या अर्थाने नव्या भारतातील कृतिशील तरुण आहे हे मान्य केले पाहिजे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required