मला मधुमेह किंवा डायबिटीस होईल का? पाहा बरं या ११ पैकी कोणती लक्षणं तुम्हाला स्वत:मध्ये जाणवतात..

आपल्या जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांचं पर्यावसान लाईफस्टाईल डिसिजेस् यांच्यामध्ये होतं. आज मधुमेह म्हणजे डायबिटीसचं जगभरात आणि त्यातही भारतात वाढत चाललेलं प्रमाण हे धोकादायक आहे. असं म्हणतात की भारतातील मधुमेहींची संख्या इतर कोणत्याही देशापेक्षा झपाट्याने वाढत आहे.
या मधुमेहाच्या वाढीमागे जीवनशैलीतील बदल कारणीभूत मानण्यात येतो. सध्या भारतीयांमध्ये अतिरिक्त ताण-तणाव, वेळी-अवेळी जेवण, बदलत्या उद्योगांमुळे बदलत्या कार्यपद्धती, अतिरिक्त (एअर कंडीशनिंग) थंड वातावरण, बैठी कामं, व्यायामाचा अभाव अशा सगळ्यांची परिणिती लाईफस्टाईल डिसिजेस् मध्ये आणि त्यातही मधुमेहात होताना दिसून येत आहे.
आयुर्वेदामध्ये मधुमेहाची पूर्वरूपे सांगितली आहेत. ही पूर्वरूपे दिसू लागताच आपली वाटचाल मधुमेहाच्या दिशेने होऊ लागली आहे, असं म्हणता येतं. ही पूर्वरूपे आपण मधुमेहाला बळी पडू नये यासाठी प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं झालं आहे. ही लक्षणं दिसू लागताच त्यावरील उपाय हाती घेणं अत्यंत आवश्यक आहे.
मधुमेहाची म्हणजे डायबिटीसची पूर्वरूपे पुढील प्रमाणे सांगता येतात -
१. अतिरिक्त घाम येणे.
२. अंगास दुर्गंधी येणे.
३. अंग शिथिल, सैल पडणे.
४. बसून राहावे, पडून राहावे किंवा झोपावेसे वाटणे.
५. छातीत, डोळ्यात, जीभेवर आणि कानात चिकटा बसल्यासारखे (उपलेप) वाटणे.
६. अंग जड होणे.
७. केस आणि नखे भरभर वाढणे.
८. थंड पदार्थ आणि थंड वातावरणाची अतिरिक्त आवड निर्माण होणे.
९. घसा आणि टाळू सतत कोरडे पडल्यासारखे वाटणे.
१०. तोंड गुळचट (गोड) पडणे.
११. हातापायाची आग होणे.
सध्याच्या काळात जीवनशैलीतला बदल ही टाळता न येण्यासारखी बाब आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर तर करायलाच पाहिजे पण त्याबरोबरच त्याच्यामुळे आपल्या जीवनशैलीत होणा-या बदलाशी जुळवून घेणंही आपल्यासाठी तितकंच आवश्यक आहे आणि यासाठीच उपरोल्लेखित पूर्वरूप आपल्याला माहित असणं गरजेचं झालं आहे. आता याचा वापर करून मधुमेहाशी लढा देण्यास सज्ज होणं आपल्या हातात आहे.