computer

अमेझॉनच्या जंगलातली प्रचंड आग- जाणून घ्या तिची तीव्रता, भयानकता आणि कारणं!!

सध्या जगातल्या दोन महत्वाच्या ठिकाणी आगीचं तांडव सुरु आहे. सायबेरिया आणि अमेझॉनचं जंगल ही ती दोन ठिकाणे. यापैकी सायबेरियातील आग ही वणव्याच्या स्वरूपातील आहे. या आगीने तब्बल ५४००० स्क्वेअर किलोमीटरचा भाग व्यापलाय.

सर्वात भयावह परिस्थिती मात्र अमेझॉनच्या जंगलात आहे. गेल्या ३ आठवड्यापासून हे जंगल जळतंय. ही आग एवढ्या मोठ्याप्रमाणात आहे की ती अवकाशातूनही दिसते. जवळच्याच ‘साओ पाउलो’ शहरावर धुराचे काळे ढग जमा झालेत. दुपारच्या ३ वाजता तिथे अंधार दाटून आला होता. काल पडलेल्या पावसाचं हे पाणी पाहा.

कोरड्या ऋतूत अमेझॉनच्या जंगलात अशी आग अधूनमधून लागत असते, पण यावर्षी आगीने उच्चांक गाठला आहे. यावर्षी तब्बल ७२,८४३ वेळा वणवा लागल्याचं ब्राझील अवकाश संशोधन केंद्राने नमूद केलंय. गेल्यावर्षी हा आकडा ४०,००० च्या घरात होता.

अमेझॉनच्या आगीचा मुद्दा एवढा साधा नाहीय. या जंगलाच्या जीवावर अनेकजण उठलेत. स्थानिक शेतकरी, लाकूडतोडे, बिल्डर्स आणि यात भर म्हणजे स्थानिक राजकारण.

बेकायदेशीररीत्या लाकूड तोडणारे आपलं काम लपण्यासाठी आग लावतात. स्थानिक शेतकरी आधी झाड तोडतात आणि मग तिथे आग लावतात. आगीमुळे जमिनीचा कस वाढतो आणि तिथे जनावरांसाठी कुरण उगवतं. साफ झालेल्या अधिकाधिक जमिनीवर इमारती बांधणे हा प्रकार पण तिथे चालतो. याखेरीज दुसरी बाजू ही राजकारणाची आहे.

सध्याच्या वणव्यावर ब्राझीलचे अध्यक्ष जैल सोल्सोनारो यांनी म्हटलं, की हा त्यांच्या सरकारला बदनाम करण्यासाठी केलेला प्रकार आहे. याविरीद्ध काही सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत, की जैल सोल्सोनारो यांच्या पर्यावरणविरोधी मतांमुळे जंगलतोडीला प्रोत्साहन मिळत आहे.

कारण काही असलं तरी सत्य हे आहे की अमेझॉनचं १५ टक्के क्षेत्र वृक्षतोड आणि आगीमुळे साफ करण्यात आलंय. यावर्षी एका महिन्यातच ७४० स्क्वेअर किलोमीटर एवढ्या जागेतील वृक्ष कायमस्वरूपी नष्ट झालेत. हिशोब लावायचाच झाला तर प्रत्येक मिनिटाला एका फुटबॉल मैदानाएवढ्या जागेतील वृक्ष नाहीसे केले जात आहेत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेझॉनच्या जंगलातील आगीबद्द्ल आम्ही एवढं का सांगत आहोत. याचं कारण समजून घेण्यासाठी आपण अमेझॉनचं महत्व समजून घेऊया.

१. अमेझॉनचं क्षेत्रफळ

अमेझॉनचं जंगल हे दक्षिण अमेरिकेत ५५ लाख स्केवर किलोमीटर जागेत वसलंय. या एवढ्या जागेत भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश सहज सामावू शकतात. एवढे देश सामावूनही थोडी जागा नक्कीच शिल्लक राहील.

२. अमेझॉनमधले जलमार्ग

अमेझॉनच्या जंगलातून नद्यांचे असंख्य स्त्रोत वाहतात. या जलमार्गाने तब्बल ६८४० किलोमीटर एवढी जागा व्यापली आहे. अमेझॉनला नाव देणारी अमेझॉन नदी ही जगातली दुसरी सर्वात लांब नदी आहे. एकट्या अमेझॉन नदीतून जवळजवळ २० कोटी लिटर पाणी अटलांटिक समुद्रात जाऊन मिळतं. अशारितीने जगात एकूण नदीतून मिळणाऱ्या पाण्याचा २० टक्के वाटा एकट्या अमेझॉनच्या मालकीचा आहे.

३. जगाची फुफ्फुसं

अमेझॉनचं जंगल हे उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट आहे. तिथल्या असंख्य झाडांमुळे मोठ्याप्रमाणात ऑक्सिजन तयार होतो. हे प्रमाण जगातील एकूण ऑक्सिजनच्या २० ते २५ टक्के एवढं आहे. या कारणाने अमेझॉनला जगाची फुफ्फुसं म्हटलं जातं.

४. जैवविविधता

अमेझॉनच्या वन्यभागात आढळणारी जैवविविधता क्वचितच जगात इतर कोणत्या ठिकाणी आढळते. संशोधनानुसार अमेझॉनमध्ये ४३० वेगवेगळ्या प्रकारचे सस्तन प्राणी, वनस्पतींच्या ४०,००० प्रजाती, पक्षांच्या १३०० प्रजाती, ३००० प्रकारचे मासे आणि तब्बल २५ लाख प्रकारचे कीटक आढळतात. हे आकडे केवळ त्या प्रजातींचे आहेत ज्यांच्याबद्दल आज माहिती मिळाली आहे. आजही अशा असंख्य प्रजाती आहेत ज्यांचा शोध लागलेला नाही.

(अमेझॉनमधील वृक्षतोड)

मंडळी, ३ आठवडे जळत असलेला अमेझॉन जगात चर्चेचा विषय बनला आहे. उशिरा का होईना लोकांना अमेझॉनबद्दल  समजतंय. तरी तिथली आग आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. याचं कारण सांगताना ब्राझीलच्या अध्यक्षांनी म्हटलं की “अमेझॉनची आग आटोक्यात आणण्यासाठी ब्राझीलकडे पुरेसे संसाधन नाहीत.”

आपण भारतात राहून अमेझॉनची आग आटोक्यात आणू शकत नाही, पण आपल्या शेजारी असणाऱ्या झाडांची निगा नक्कीच राखू शकतो. झाडे लावा, झाडे जगवा या वाक्याला आता गंभीरपणे घेण्याची वेळ आली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required