computer

३५० वोल्टचा झटका देणारं ब्रेसलेट...वाईट सवय सोडवण्यासाठी या कंपनीने लढवलीय अतरंगी शक्कल !!

मंडळी, आपल्या प्रत्येकालाच वाईट सवयी असतात. आता वाईट सवयीत दारू, सिगारेटसारखी व्यसनं तर येतातच, पण पैसे उधळणे, पोट सुटेपर्यंत खात बसणे, नखं खाणे, आळस करणे अशा सवयी पण येतात. या सवयी वाईट आहेत हे माहित असूनही आपण त्यांना चिकटून असतो. प्रेमातच बुडालेलो म्हणा ना. नखं खाणारी मुलगी तर प्रत्येकाच्याच ओळखीत असते.

तर, अमेरिकेच्या बिहेवियरल टेक्नोलॉजी या कंपनीने तुमच्या वाईट सवयी घालवण्यासाठी तुम्हाला मदत करायचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी एक असं ब्रेसलेट तयार केलं आहे जे तुम्हाला वेळोवेळी शॉक देत राहील. असा तसा नाही तर चांगला ३५० वोल्टचा शॉक राव.

मंडळी, या ब्रेसलेटचं नाव आहे 'Pavlok bracelet'. या ब्रेसलेटबद्दल शुद्ध मर्हाटीत सांगायचं झालं तर याला “वर्तणूक प्रशिक्षण यंत्र” म्हणता येईल. हे ब्रेसलेट आपल्या शरीरातील नकारात्मक कृतींच्या उत्तेजनेला पकडण्याचं काम करतं. म्हणजे पाहा, आपण प्रमाणाबाहेर खात असू तर ते ब्रेसलेटच्या लगेच लक्षात येतं आणि मग ब्रेसलेटमधून विजेचा झटका दिला जातो. एकावेळी चार्ज केल्यानंतर ब्रेसलेट १५० वेळा शॉक देऊ शकतं.

विचार करा, तुम्ही चेन स्मोकर आहात आणि तुम्ही हे ब्रेसलेट घातलं!! फक्त विचारच करा म्हटलं. असो.

मंडळी, आपण कितीही म्हणालो तरी आपण स्वतःच स्वतःला शिक्षा देऊ शकत नाही. त्यासाठी पण या ब्रेसलेटमध्ये खास सुविधा आहे. त्याचं असं आहे मंडळी, ज्यांना स्वतःवर विश्वास नाही ते आपल्या मित्रांच्या हातात या ब्रेसलेटची सूत्रं देऊ शकतात. त्यांच्या मित्रांना फक्त Pavlok app डाउनलोड करावा लागेल आणि बसल्या जागेवरून त्या व्यक्तीला शॉक देता येईल. आहे की नाही अतरंगी ?

तर, बातमी अशी फिरत आहे की हे ब्रेसलेट प्रमाणाबाहेर खाणाऱ्यांसाठी आणि जास्त पैसे खर्च करणाऱ्यांसाठी आहे.  पण बिहेवियरल टेक्नोलॉजीने म्हटलंय की तुमच्या सगळ्या वाईट सवयी घालवण्यासाठी हे ब्रेसलेट उपयोगी पडेल.

सध्या अमेरिकेत अमेझॉनवर तब्बल १९९ डॉलर्सना म्हणजे तब्बल १३,८९० रुपयांना हे ब्रेसलेट मिळत आहे. अर्थातच जगात अशी माणसं आहेत ज्यांना अशा गोष्टी घ्यायला दुसरा विचार करावा लागत नाही. ग्राहकांच्या उड्या तर पडल्याच. पण हे ब्रेसलेट इंटरनेटवर भलतंच व्हायरल झालंय राव.

मंडळी, काहीही म्हणा पण हे यंत्र कितीही चांगलं असलं तरी दुसऱ्या क्रमांकावरच राहणार, पहिल्या क्रमांकावर अजूनही आईची चप्पल आणि लाटणंच विराजमान आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required