computer

पहिल्या महायुद्धात विद्रूप झालेल्या चेहऱ्यांना नवं आयुष्य देणारी ॲना लॅड!! जाणून घ्या ती नक्की काय आणि कसं करत असे.

आज वैद्यकशास्त्राने बरीच मजल मारलीय. अपघाताने विद्रूप झालेला त्वचेचा भाग प्लॅस्टिक सर्जरीने पूर्ववत, पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर करता येतो. काहीलोक फक्त सुंदर दिसावं म्हणून ही कॉस्मेटिक सर्जऱ्या करतात. पण प्लॅस्टिक सर्जरीचं हे क्षेत्र समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याआधीच्या काळात एका कलावतीने सैनिकांचे विद्रूप झालेले चेहरे दुरुस्त करण्याचं काम निष्ठेने, कळकळीने केलं. तिचं नाव होतं ऍना कोलमन लॅड.

तो काळ होता पहिल्या महायुद्धाचा. या युद्धाची भीषणता जबरदस्त होती, की त्यात तब्बल २१ दशलक्ष सैनिक जखमी झाले होते. युद्धात वापरलेल्या अतिसंहारक शस्त्रास्त्रांमुळे अनेक तरुण सैनिकांच्या चेहऱ्यात विद्रूप बदल झाले होते. हे व्रण त्यांना सबंध आयुष्यभर वागवावे लागणार होते. हा प्रश्न केवळ रूपाचा नव्हता. त्यातून निर्माण होणाऱ्या एकलकोंडेपणाचा, सामाजिक अस्वीकाराचाही होता. ऍनाने मात्र हे पाहून वेगळी भूमिका घेतली. त्यांचे चेहरे सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची. या कामी आलं तिचं कलेचं ज्ञान.

ऍना लॅडचा जन्म पेनसिल्व्हानिया येथे १८७८ मध्ये झाला. पॅरिस आणि रोम येथे शिल्पकलेचं शिक्षण पूर्ण करून तिने बॉस्टनमध्ये एक स्टुडिओ उभारला. पहिलं महायुद्ध सुरू होण्याआधी तिने अनेक कारंज्यांची आणि अर्धपुतळ्यांची शिल्पं तयार केली. त्याशिवाय हायरॉनीमस राईड्स आणि द कँडिड ऍडव्हेंचर या दोन कादंबऱ्याही लिहिल्या. महायुद्धाच्या काळात तिचे पती डॉक्टर मायनार्ड लॅड हे ताऊल येथील चिल्ड्रेन्स ब्युरो ऑफ अमेरिकन रेड क्रॉसचे अध्यक्ष झाल्याने हे दाम्पत्य फ्रान्समध्ये स्थलांतरित झालं.

या महायुद्धाची भीषणता आणि मानवी शरीराला विद्रूप करण्याची क्षमता बघून ऍना लॅड पुरती हादरली. पुरुषांना झालेल्या प्राणघातक जखमांपासून वाचवू शकेल इतपत वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झालं होतं. पण जखमांचे व्रण तसेच राहायचे. माणसं त्यामुळे कित्येकदा विद्रूप आणि भयावह दिसायची. त्यातून निर्माण होणारा न्यूनगंड हीही गंभीर समस्या होती. फाटलेले, बिघडलेले, कुरूप दिसणारे अवयव दुरुस्त करण्यासाठी आज कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय आहे. त्या काळात हे आव्हान होतं.

पूर्वीच्या युद्धांच्या तुलनेत पहिल्या महायुद्धात चेहऱ्यावरच्या जखमा जास्त प्रमाणात होत्या. युद्धावरून परत आल्यावर बिघडलेल्या चेहऱ्यांनिशी लोकांशी संबंध ठेवणं सैनिकांना कठीण होतं. काहींची नाकं मोडलेली, काहींचा जबडा फाटून लोंबकळत असलेला, काहींनी एकच डोळा गमावलेला अशी त्यांची अवस्था असे. रस्त्यात भेटणाऱ्या लोकांच्या भीतिदायक व आश्चर्यकारक नजरा अजूनच डाचत. आपण या लोकांना घाबरवत आहोत ही भावना त्यांना त्रास देत असे. ऍनाच्या मनात मात्र या लोकांसाठी ओतप्रोत करुणा भरली होती. त्यातूनच तिने त्यांचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं.

ऍनावर ब्रिटिश शिल्पकार फ्रान्सिस वूडचा प्रभाव होता. रॉयल आर्मी मेडिकल कॉर्प्स आणि लंडनमधील टीन नोजेस शॉप या दोन्ही ठिकाणी वूड एक कलाकार म्हणून काम करत होता. यातील टीन नोजेस शॉप हा विद्रूप चेहऱ्यांसाठी मास्क तयार करणारा विभाग होता. हे शॉप विकृत झालेल्या चेहऱ्यांसाठी साध्या मुखवट्यांचा पुरवठा करायचं. ऍनानेही हे काम करायचं ठरवलं. त्यासाठी आवश्यक कलाकौशल्यं तिच्याकडे होतीच. वूडला भेटल्यावर तिने पॅरिसमध्ये स्वतःचा पोर्ट्रेट मास्क स्टुडिओ उभारला. विद्रूप चेहर्‍याच्या व्यक्तींना ऍनाची सुविधा घेण्यासाठी रेड क्रॉसचं शिफारसपत्र आवश्यक होतं. स्टुडिओच्या पहिल्या दहा वर्षांत ऍना आणि तिच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम करून मोठ्या प्रमाणावर मास्क्स बनवले.

ऍना मास्क्स कसे बनवायची?

आलेल्या लोकांना ऍना आधी शक्य तितकी दिलासा देत असे. त्यासाठी तिचे कर्मचारी रुग्णाला एका खोलीत घेऊन जात. झालेल्या गोष्टींबद्दल, विद्रुपतेबद्दल ते त्याच्याशी काहीही बोलत नसत. नंतर ऍना रुग्णाच्या चेहऱ्याला प्लास्टर लावत असे. ते काही वेळाने कोरडे होऊन त्यापासून एक कठीण साचा तयार व्हायचा. या साच्याचा वापर करून 'गट्टापर्चा' नावाच्या रबरासारख्या पदार्थाच्या मदतीने तांब्यावर इलेक्ट्रोप्लेटिंग करून ऍना लॅड मास्क बनवत असे. हे करताना संबंधित रुग्णाचा फोटो संदर्भ म्हणून ती वापरायची. चेहऱ्यावरील विद्रूप झालेला भाग पूर्ववत करणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. हे मास्क्स रुग्णाचे अवयव आणि त्वचेचा वर्ण याच्याशी तंतोतंत जुळत असल्याची खात्री करण्याचं काम तिला करावं लागायचं. पापण्या, भुवया, गरज पडल्यास मिश्या यासाठी ती खर्‍याखुर्‍या मानवी केसांचा उपयोग करत असे. बनवलेले मास्क्स शक्य तितके नैसर्गिक वाटावेत हे तिचं उद्दिष्ट होतं. प्रत्यक्षात त्याचा परिणाम संमिश्र असायचा, कारण वापरलेली सामग्री कधीही पूर्णपणे माणसाच्या चेहऱ्याशी जुळत नसे. मुख्यत्वेकरून चार ते नऊ औंस वजन असणाऱ्या मास्कधारकांना आय ग्लासेसचा उपयोग करावा लागे. मास्क हा एक मुखवटा असल्याने त्यातून भावभावना व्यक्त होत नसत. तरीदेखील तिने दिलेल्या सेवेबद्दल असंख्य सैनिक तिच्याप्रती कृतज्ञ होते.

ऍना कोलमन लॅड हिने डिसेंबर १९१८ मध्ये पॅरिस सोडलं. स्टुडिओचे कामकाज इतरांच्या मार्गदर्शनाखाली पुढे सुरूच राहिलं. ३ जून १९३९ या दिवशी कॅलिफोर्नियामध्ये ऍनाचा मृत्यू झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या उद्रेकाच्या काही दिवस आधीच तिने जगाचा निरोप घेतला. ॲना कोलमन लॅडने या कामात आयुष्य वेचलं. १९३२मध्ये फ्रान्स सरकारने तिचा 'नाईट(सरदार)' हा लष्कर आणि नागरी जीवनातला सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तंत्र प्रगत नसताना समस्या ओळखून शेवटच्या श्वासापर्यंत तिचं निराकरण करत राहाणं हे फक्त असामान्यच करु शकतात.

रूप हा व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग मानला जातो. कदाचित त्यामुळेच रूपाचा संबंध थेट आत्मसन्मानाशी आहे. जेव्हा तेच नष्ट होतं तेव्हा ती व्यक्ती कोणत्या तणावांमधून जात असेल! समाजाच्या नाकारण्यातून तिच्या मनावर किती आघात होत असतील! हे ओळखून ऍना नुसतीच हळहळत न बसता थेट प्रश्नाला भिडली. तिचं वेगळेपण दिसतं ते इथेच.

आता या तंत्राला ॲनाप्लास्टालॉजी म्हणतात. नागरी जीवनात विद्रूप झालेल्या चेहऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी अजून वापरलं जातं आणि इराकमध्ये चाललेल्या यादवी युद्धाच्यावेळीही हे तंत्र बरंच वापरलं गेलं.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required