computer

किस्से डिजिटल उपकरणांमुळे लागलेल्या शोधाचे: 'ॲपल हेल्थ' ॲपच्या मदतीने खुनाचा छडा कसा लागला ??

किस्से डिजिटल उपकरणांमुळे लागलेल्या शोधाचे: अ‍ॅपलवॉचमुळे पडल्या सूनबाईंना बेड्या!!

लेखमालिकेच्या पहिल्या किश्शात मृत व्यक्तीच्या आयवॉचचा वापर करत पोलिसांनी तीच्या खुन्याचा माग कसा काढला हे आपण वाचलं होतं. आजचा किस्साही असाच काहीसा आहे. या प्रकरणातही एका आयफोनच्या मदतीनं पोलिसांनी संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा केला होता.

ही घटना आहे जर्मनीतल्या फ्रिबर्ग शहरात घडलेली. ऑक्टोबर २०१६ मध्ये मारिया लॅदेनबर्गर या १९ वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा बलात्कार करून खून करण्यात आला होता. पार्टीमधून घरी सायकलवरून परतत असताना तिच्यावर हल्ला झाला. तीचा मृतदेह नदीच्या पाण्यात बुडालेला आढळून आला होता.

घटनास्थळावर मिळालेले केस आणि स्कार्फवरील डिएनए नमुन्यांवरून पोलिसांनी हुसेन खवेरी नावाच्या व्यक्तीला पकडलं. त्याने केलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी त्याचा आयफोन अनब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. पण हुसेननं पोलिसांना आपल्या आयफोनचा पिन देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी म्युनिक शहरातल्या लॉक्ड फोन्सची सुरक्षा यंत्रणा भेदण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका सायबर-फॉरेन्सिक फर्मची मदत घेतली. काही महिन्यानंतर या संस्थेला हा आयफोन अनलॉक करण्यात यश आलं. आयफोन अनब्लॉक झाला तसा हुसेन विरूद्ध पोलिसांच्या हातात सबळ पुरावा पडला.

प्रत्येक आयफोनमध्ये 'ॲपल हेल्थ' हे आरोग्यविषयक ॲप प्रिइन्स्टॉल्ड असतं. हे ॲप वापरकर्त्याच्या विविध हालचाली, चाललेली पावलं, झोपेच्या पध्दती, ह्रदयाचे ठोके अशा गोष्टींची नोंद ठेवतं. हुसेनच्या आयफोनमधील या ॲपचा डेटा हालचालींची दोन शिखरं दाखवत होता. ही शिखरं हुसेननं एखादं अतिश्रमाचं काम केल्याचं दर्शवत होती. या ॲक्टीव्हीटीला या ॲपनं 'Climbing Stairs' (पायऱ्या चढणे) हे नाव दिलं होतं. या डेटावरून हुसेनने पिडीतेला ओढत पायऱ्या उतरून नदीच्या काठी ‌नेलं आणि परत तो पायऱ्या चढून वर आल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. हुसेनच्याच बांध्याच्या एका पोलिस अधिकाऱ्यानं घटनास्थळी जाऊन हूबेहूब तशीच कृती केली जशी आरोपीनं मृतदेहाची विल्हेवाट लावताना केल्याचा अंदाज पोलिसांना होता. इथे त्या अधिकाऱ्याच्या आयफोनमध्येही तंतोतंत हुसेनसारख्याच पायऱ्या चढण्याच्या आणि इतर हालचाली नोंदवल्या गेल्या. या प्रबळ पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी हुसेनला आरोपी म्हणून अटक केली.

यानंतर हुसेननंही आपला गुन्हा मान्य करत मारियाच्या कुटूंबियांची माफी मागितली. दारूच्या नशेत असलेल्या हुसेनला एका बारमधून बाहेर काढलं गेलं आणि तो घरी जाणाऱ्या मारियाच्या वाटेत आडवा आला. मारिया सायकलवरून पडल्यानं तीनं आरडाओरडा केला. यानंतर हुसनेनं तिच्यावर हल्ला करत बलात्कार केला आणि बेशुद्धावस्थेत असतानाच तीला नदीच्या पाण्यात बुडवलं. या गुन्ह्यासाठी हुसेनला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे हुसेन एक बोगस अफगाणी निर्वासित होता आणि मारिया ही एका निर्वासितांसाठी काम करणाऱ्या चॅरिटी संस्थेची स्वयंसेविका होती! याआधीही हुसेनला एका खुनाच्या आरोपात शिक्षा झाली होती.

ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आपल्याल वाटतं त्याहून आपली अधिक माहिती बाळगून असतात. ती कशी वाचायची हेच फक्त कळायला हवं!!

 

आणखी वाचा :

तुम्ही कुठं जाता याची सगळी माहिती गुगल मॅप्सकडे आहे. तुम्हीच पाहा गेल्या वर्षभरात तुम्ही कुठल्या ठिकाणांना भेट दिली ते..

सबस्क्राईब करा

* indicates required