computer

राष्ट्रपती भवन, संसद भवनसारख्या अतिमहत्त्वाच्या इमारती बनतानाचे हे दुर्मिळ १० फोटो तुम्ही नक्कीच पाह्यले नसतील...

मंडळी, प्रत्येक देशात मोठमोठ्या हुद्द्यावरील व्यक्तींसाठी खास निवासस्थाने बनवलेली आहेत. जसे की अमरिकेचं प्रसिद्ध व्हाईट हाउस, ब्रिटनच्या राणीचा बकिंगहॅम पॅलेस, जपानच्या सम्राटाचा इम्प्रेरीयल पॅलेस. आपल्या देशात पण अशीच पद्धत आहे. नवी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक भागात महत्वाच्या सरकारी इमारती आहेत. तुम्हाला नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक म्हटलं की समजणार नाही. उदाहरणच देतो. राष्ट्रपती भवन, संसद भवन, सचिवालय या इमारती आणि सोबतच मंत्रिमंडळातील मान्यवरांचे निवासस्थान या भागात आहेत.

तर, स्वातंत्र्यपूर्वकाळापासून या भागात देशाच्या उच्च स्थानी असलेल्या व्यक्तींचा राबता राहिलेला आहे. आज नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. येणारे नवीन मंत्रीगण या जागेचा ताबा मिळवतील. त्यानिमित्ताने या इमारतींचा इतिहास जाणून घेऊया.

(राज भवन, कलकत्ता)

मंडळी, फार पूर्वीपासून देशाची राजधानी दिल्ली राहिली आहे, पण ब्रिटीश काळात राजधानीचा मान कलकत्त्याकडे होता. १९११ साली ब्रिटनच्या राजाने ठरवलं की राजधानी दिल्लीला हलवूया. तेव्हापासून आजतागायत दिल्ली राजधानी आहे.

राजधानी बदलण्याचं ठरल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९१२ साली नव्या इमारतीचं काम सुरु झालं. हे काम १९२७ साली संपलं. पुढे १९३१ साली सर्व नव्या इमारतींचं उद्घाटन झालं.

या गोष्टी त्याकाळातले फोटो बघताबघता समजून घेतल्या तर जास्त रंगत येईल.

मंडळी, हा नवी दिल्लीचा १९१३ सालचा नकाशा आहे. या नकाशात सरकारी इमारतींसाठी २ जागा निश्चित केल्या आहेत. याच भागात पुढे आजचं संसद भवन आणि राष्ट्रपती भवन सारख्या इमारती उभ्या राहिल्या.

मंडळी, यात तुम्ही नवीन इमारतींच डिझाईन बघू शकता. हे डिझाईन तयार केलं होतं ल्युटेंस आणि हर्बर्ट बेकर या दोन वास्तुविशारदांनी. राष्ट्रपती भवन, संसद भवन, आणि सचिवालयाच्या इमारती ह्या या दोघांच्याच कल्पनेतून तयार झाल्या आहेत.

ल्युटेंस यांनी षटकोनी आकारातील इमारतींची कल्पना मांडली होती. उजवीकडे आणि डावीकडे तुम्हाला वर्तुळाकार इमारती दिसतील. यापैकी डाव्या बाजूला जी इमारत आहे ती चर्च असणार होती तर उजव्या बाजूला संसद असणार होती. या दोन्ही इमारती अगदी समोरासमोर बांधण्याचा प्लॅन होता, पण काही कारणाने चर्च बांधण्यात आलं नाही. ससंद भवनची इमारत मात्र उभारली गेली. त्याकाळी संसद भवनला ‘कौन्सिल हाऊस’ म्हणायचे.

हा फोटो जेव्हा प्रत्यक्ष बांधकाम सुरु झालं त्यावेळचा आहे. इमारतींची दगडी बांधणी करण्यात आली होती. दगड फोडून त्यांना योग्य आकार देण्यासाठी तब्बल २५०० लोक कामावर ठेवण्यात आले होते. याखेरीज त्यावेळच्या चांगल्यात चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.

हा फोटो त्यावेळच्या गव्हर्मेंट हाऊस मधून घेतलेला आहे. गव्हर्मेंट हाऊस म्हणजे आजचं राष्ट्रपती भवन. समोर ज्या दोन इमारती दिसत आहेत त्यांनाच नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक म्हटलं जातं.

हा उद्घाटनप्रसंगी काढलेला फोटो आहे. फोटोत एक लाकडी मचाण दिसत आहे. मचाणावर उभ्या असलेल्या माणसांनीच या इमारती बनवण्यासाठी घाम गळला होता. ते ब्रिटनचा युनियन जॅक फडकवताना दिसत आहेत.

हा पॅनॉरमा फोटो आहे. नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक सहित उजवीकडच्या कोपऱ्यात संसद भवन तुम्ही बघू शकता. हा परिसर आज एवढा मोकळा राहिलेला नाही.

या फोटोमध्ये संसद भवन तयार होतानाचा क्षण टिपण्यात आला आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे या फोटोत नवी दिल्ली वासण्याची सुरुवात आपण बघू शकतो. ज्यावेळी राजधानी कलकत्त्यावरून हलवण्याचा निर्णय झाला त्यावेळी दिल्लीतच नवी दिल्ली वसवण्याचा निर्णय पण झाला होता. संसद भवनच्या मागच्या बाजूला जी वस्ती दिसत आहे ती ह्या नवी दिल्लीची सुरुवात होती.

हे आहे राष्ट्रपती भवनातलं प्रसिद्ध मुघल गार्डन. आजच्या आणि त्यावेळच्या राष्ट्रपती भवनात तसा फारसा फरक दिसून येणार नाही, पण तुम्ही जर नीट बघितलं तर या फोटोमध्ये राष्ट्रपती भवनावर युनियन जॅक दिसून येईल.

हा आहे संसद भवनातला सेन्ट्रल हॉल. त्यावेळी या हॉलचा वापर लायब्ररी म्हणून केला जायचा. सध्या तो महत्वाच्या सामाराभांसाठी वापरला जातो.

आजचा सेन्ट्रल हॉल काहीसा असा दिसतो.

तर मंडळी, कित्येक मंत्रीगण आले आणि गेले, पण या इमारती अजूनही तशाच उभ्या आहेत. आणि येणाऱ्या काळातही तशाच असतील. त्यांना विसरून चालणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required