computer

जगातून हरवलेले १० अनमोल खजिने !!

एखादी मौल्यवान वस्तू हरवली किंवा नष्ट झाली तर आपल्याला त्याचे वाईट वाटते. आयुष्यभर खंत वाटत राहते. पण मानवजातीच्या इतिहासात आणि काळाच्या ओघात असे अनेक खजिने हरवले किंवा नष्ट झाले आहेत ज्यांचे मूल्य सुद्धा करता येणार नाही. हे अमूल्य खजिने एक वैभवशाली ठेवा होते जे आता आपल्याला परत मिळणार नाहीत अथवा त्यांच्या सापडण्याची शक्यता अगदी थोडी आहे. हे खजिने कोणते माहीत आहे? चला तर मग जाणून घेऊया…

1. द अंबर रूम

अठराव्या शतकात सेंट पिटर्सबर्ग या शहराजवळ कॅथरीन पॅलेस या राजवाड्यात अंबर रूम बांधली गेली होती. या खोली अत्यंत मौल्यवान अश्या अंबर नावाच्या स्फटिकाने बांधली होती आणि पूर्ण खोलीत तब्बल 450 किलो अंबर वापरला गेला होता. एवढेच नाही तर दारे, खिडक्या आणि छताच्या सजावटीसाठी शुद्ध सोन्याचा वापर केला गेला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1941 मध्ये जर्मनीने यावर कब्जा मिळवला आणि हा सगळा खजिना जर्मनीला नेण्यासाठी सुटा केला. त्यानंतर आजपर्यंत हा खजिना कुठेही दिसला नाही, आणि तो कुठे आहे याचीही कुणालाच माहिती नाही. 

2. सार्कोफॅगस ऑफ मेनोकोर

4500 वर्षांपूर्वी इजिप्तच्या गिझा या ठिकाणी पिरॅमिड्स बांधले गेले होते. तिथल्या तीन पिरॅमिड्स पैकी एक पिरॅमिड होता फारोह मेनोकोर या राजाचा. या राजाची ममी बनवून त्यासोबत किमती दागिने आणि इतर वस्तू ठेवून त्यांना पेटीमध्ये बंदिस्त करून पिरॅमिडमध्ये जतन केले होते. 1830 मध्ये ब्रिटिश मिल्ट्रीमन एडवर्ड याने या पिरॅमिड मध्ये शोधकाम सुरू केले. त्याच्या शोधकार्यात त्याला मेनोकोरची शवपेटी सापडली. त्या पेटीच्या आतमध्ये काय आहे हे बघण्यासाठी आणि ममी तपासण्यासाठी पेटी इंग्लंडला 1938 मध्ये एका व्यापारी जहाजात पाठवली गेली. असं म्हणतात की, मेनोकोरच्या शापामुळे हे जहाज मध्यसमुद्रात प्रवास करताना बुडाले आणि त्यानंतर अजूनपर्यंत जहाजाचा व मेनोकोरच्या सार्कोफॅगसचा अद्याप पत्ता लागू शकला नाही.

3. होन्जो मोसाम्युन स्वोर्ड

जपानची अस्मिता असलेली ही तलवार! या तलवारीचे बाराव्या शतकात निर्माण झाले होते. तेव्हापासून सहाशे वर्षे ही तलवार जपानच्या राजघराण्याकडे सुरक्षित होती. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर आक्रमण केले तेव्हा अमेरिकन अधिकाऱ्यांची नजर या मूल्यवान तलवारीवर पडली. त्यांनी ती जप्त केली आणि त्यानंतर तलवारीचे काय झाले हे अद्याप कुणालाच समजले नाही. एक तर ती नष्ट केली असावी अथवा अमेरिकेत अज्ञात स्थळी लपवली गेली असावी असा अंदाज आहे.

4. क्राऊन ज्वेल्स् ऑफ आयर्लंड

हा दागिना अत्यंत मौल्यवान होता. या दागिन्यामध्ये राणी शारलोटच्या खजिन्यातील खूपच महाग असणारे 394 खडे वापरले होते. सोबतच मुघलांकडून आलेली सोन्याची नाणी आणि टर्कीच्या सुल्तानाकडून आलेले जडजवाहीर सुद्धा याचा हिस्सा होते. हा दागिना डब्लिन कॅसल येथून 1907 साली चोरीला गेला. हा कुणी चोरला असावा याबद्दल अनेक अंदाज बांधले गेले, अनेक मोठमोठ्या व्यक्तींवर संशय घेतला गेला परंतु शेवटपर्यंत याचा शोध लागू शकला नाही. बहुधा यातले मणी सुटे करून अनेकांना विकले असावेत असेही असू शकते किंवा हा दागिना एकसंधपणे कुणाच्यातरी तिजोरीत बंद असू शकतो. पण तो कुठे आहे हे मात्र अजूनही गूढ आहे.

5. डेड बिशप्स ट्रेजर

इसवी सन 1357 मध्ये सेंट व्हिन्सेंट हा बिशप लिस्बन या देशातून फ्रांसकडे समुद्रमार्गे निघाला होता. त्याच्यासोबत लिस्बन मधून जमा केलेला भलामोठा खजिना होता ज्यात, सोने नाणे, चांदी, जडजवाहीर वगैरे अत्यंत मूल्यवान सामान खच्चून भरले होते. या बिशपचे जहाज स्पेन मधील कार्टजेना या शहराजवळून जात असताना अचानक समुद्री चाच्यांनी (पायरेट्स) जहाजावर हल्ला केला. त्या हल्ल्यात बिशप मारला गेला आणि त्याचा खजिना चाच्यांच्या हाती लागला. त्यानंतर मात्र या खजिन्याची कशी विल्हेवाट लागली याचा कुणालाही काहीही अंदाज नाही.

6. द फ्लोरेंटाईन डायमंड

133 कॅरटचा हा शानदार हिरा होता. याचा रंग गुलाबी असून हा जगातला सर्वात मोठा गुलाबी ‘एकमेवाद्वितीय’ असा हिरा होता. नोव्हेंबर 1918 पर्यंत याची मालकी ऑस्ट्रिया-हंगरी या देशाच्या हब्सबर्ग या राजघराण्याकडे होती. प्रथम विश्वयुद्धात जेव्हा पराभव समोर दिसू लागला तेव्हा त्यांनी हा हिरा स्विझरलँड बँकेच्या तिजोरीत ठेवण्यासाठी आपल्या एका विश्वासू माणसाच्या स्वाधीन केला होता. मात्र त्यानंतर हा हिरा कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. हा नेमका कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही. हा अद्याप अखंड स्वरूपात आहे की याचे तुकडे करून अनेक छोटे हिरे बनवले आहेत याबद्दलही काही सांगता येत नाही.

7. इसबेला म्युझिअम स्टोलन आर्ट

18 मार्च 1990 मध्ये दोन व्यक्तींनी पोलिसांच्या वेशात ‘इसाबेला स्टीवर्ड गार्डनर म्युझिअम’ मध्ये प्रवेश केला आणि अत्यंत मूल्यवान आणि जगप्रसिद्ध अश्या 13 वस्तूंची चोरी केली. त्या वस्तूंचे एकत्रित मूल्य पाचशे मिलियन डॉलर्स इतके आहे. हे दोन चोर कोण होते याची अजूनही ओळख पटलेली नाही. या चोरीबद्दल अनेक अंदाज बांधले जातात. चोरीला गेलेल्या वस्तू इतक्या प्रसिद्ध आहेत की त्यांची विक्री करणे कठीण काम आहे. समजा त्या वस्तू विकत घेतल्या तरी घेणारी व्यक्ती तुरुंगात जाऊ शकते. या शक्यतांसोबत अशीही एक शक्यता आहे की या दोन चोरांचा मृत्यू झाला असून त्या वस्तू कुठेतरी धूळ खात पडल्या असाव्यात. 

8. पेकिंग मॅन

इसवी सन 1923 मध्ये होमिनाईड मानवाचा सापळा चीनमध्ये उत्खननात सापडला होता. हा सापळा झोकुडीन नावाच्या गावाजवळच्या गुहेत आढळून आला. हे झोकुडीन गाव पेकिंग जवळ होते म्हणून या सापळ्याला ‘पेकिंग मॅन’ असे नाव ठेवले गेले. सध्या पेकिंगचे नामकरण बीजिंग असे केले आहे. 1941 मध्ये जपान आणि चीनच्या युद्धात हा सापळा गायब झाला. सध्या हा कुठे आहे याची माहिती कुणालाच नाही. काहीजणांच्या मतानुसार हा सापळा अमेरिकेला नेताना समुद्रात बुडाला तर काहीजण असे ठामपणे सांगतात की बीजिंगच्या एका इमारतीच्या पार्किंग लॉट खाली हा सापळा दबला गेला आहे.

9. नाझी गोल्ड इन लेक टॉलिपझ

दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी फौजेने प्रचंड प्रमाणात सोने लुटले होते. हे सोने आक्रमकांपासून वाचवण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रियामधील टॉलीपझ तळ्यात टाकले असे म्हणतात. हे तळे बरेच मोठे असून सोने नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे याचा अजूनही शोध लागला नाही. सोने शोधण्याचे बरेच प्रयत्न झाले, अनेकांना त्यासाठी जीवही गमवावा लागला पण अजूनही याचा शोध घेतला जातो. तळ्यामध्ये दृश्यमानता अतिशय कमी आहे यामुळे शोधण्यात असंख्य अडचणी येतात. काही जणांच्या मतानुसार ही सोने तळ्यात टाकण्याची फक्त अफवा असून यात अजिबात सत्यता नाही.

10. जॉर्ज मॅलोरीज लॉस्ट कॅमेरा

एडमंड हिलरीच्या फार पूर्वी ब्रिटिश गिर्यारोहक जॉर्ज मॅलोरी आणि अँड्र्यू आयर्विन यांनी माउंट एव्हरेस्ट वर चढाई केली होती. त्यांची ही मोहीम सन 1924 मध्ये आखली गेली होती. दुर्दैवाने या मोहिमेत वादळात सापडून त्यांचा मृत्यू झाला. नोंदीनुसार या चढाईवर जाण्यापूर्वी जॉर्जने सोबत कॅमेरा सुद्धा नेला होता. जगाच्या दृष्टीने एव्हरेस्ट काबीज करणारा पहिला वीर एडमंड हिलरी असला तरी जॉर्जचा कॅमेरा सापडला तर कदाचित हिलरीचा क्रमांक दुसरा ठरू शकतो. कॅमेरामध्ये एव्हरेस्टच्या शिखरावरून घेतलेले फोटो मिळू शकतात. 1999 मध्ये जॉर्जचे मृत शरीर सापडले पण त्याचा कॅमेरा सापडला नाही. कदाचित कॅमेरा आयर्विनसोबत असू शकतो पण आयर्विनचा मृतदेह अद्याप सापडला नाही. एव्हरेस्ट काबीज करणारा पहिला वीर कोण याचे गूढ अद्यापही कायम आहे आणि त्या एका कॅमेराच्या माध्यमातून ते समजू शकते म्हणून तो कॅमेरा आता अत्यंत मूल्यवान ठरला आहे.

 

तर वाचकहो, कश्या वाटल्या या हरवलेल्या खजिन्यांच्या कथा? कमेंट्स मध्ये जरूर कळवा…

सबस्क्राईब करा

* indicates required