तिने २८ वर्षांपूर्वी चोरलेले पैसे चक्क व्याजासह परत का केले ? काय आहे कारण ?

अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यातल्या टुसॉनमध्ये एक एल चॅरो नावाचा कॅफे आहे. कार्लोटा फ्लोरेस त्याची मालकीण. या २७ जुलैला या बाईंना एक हाताने लिहिलेलं पत्र आणि सोबत चक्क १००० डॉलर्स आले.

काय लिहिलं होतं पत्रात ?

स्रोत

पत्र लिहिलं होतं एका बाईनं. अर्थात तिनं तिचं नांव नाही उघड केलंय. तिनं लिहिलं होतं की १९९० मध्ये ॲरिझोना युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना तिनं काही काळ या बाईंच्या कॅफेमध्ये काम केलं होतं. त्यावेळी तिची एक मैत्रिणही तिथं काम करायची. मैत्रिणीच्या सल्ल्यावरुन तिनं विकलेल्या काही पेयांची नोंद केली नाही आणि ते पैसे आपल्या खिशात घातले होते. तिनं त्यापूर्वी किंवा त्यानंतरही कधी चोरी केली  नव्हती आणि तेव्हाही ही कशी काय दुर्बुद्धी झाली हे तिला कळलं नाही, असं तिचं म्हणणं आहे. तर, इतकी सारी वर्षं तिला ही गोष्ट डाचत होती. आणि म्हणून तिनं आता इतक्या वर्षांनी ते चोरलेले पैसे व्याजासाह कॅफेच्या मालकिणीला पाठवून दिले. 

ती असंही लिहिते की ती काही चांगली वेट्रेस नव्हती म्हणून तिला लवकरच कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. पण त्यामुळं ती फक्त काहीशे डॉलर्सच चोरु शकली होती आणि मोठा हात मारला गेला नव्हता ही एक चांगली गोष्ट झाली होती. 

या पत्राबद्दल कार्लोटा फ्लोरेस काय म्हणतात ?

स्रोत

हे पत्र येण्याआधी दोनच दिवस कार्लोटा फ्लोरेस मॉलमध्ये काही किराणासामान खरेदी करायला गेल्या होत्या. तिथं एकानं त्यांना धक्का देऊन पर्स पळवली होती. त्यामुळं जगात आता माणुसकी तितकीशी राहिली नाही असं त्यांना वाटत होतं. पण हे पत्र वाचून जगात कुठे ना कुठे माणुसकी अजून शिल्लक आहे असं त्यांना वाटत आहे. हे पत्र वाचताना त्यांच्या कॅफेमधल्या स्टाफच्या डोळ्यात पाणी आलं.  त्या म्हणतात, या पत्रानं फक्त मलाच नाही, तर माझं कुटुंब आणि माझ्या उद्योगावरही त्याचा प्रभाव पडला आहे. ती वेट्रेस कुठेही असो, तिला हे कळायला हवं असंही त्यांना वाटतं. त्यांच्या मनात तिच्याबद्दल जरही कटुता नाहीय.

इतके दिवस ती चोरी करणारी स्त्री अपराधी मनाने जगत होती, आता तिला  नक्कीच मन:शांती लाभली असेल. अगदीच  चोरी नाही, पण आपणही नकळत असं काहीतरी पूर्वायुष्यात चुकीचं केलं असेल.. तुम्हांला ती चूक सुधारावीशी वाटतेय का? आणि कशी? आम्हांला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required