computer

१७व्या शतकातल्या हिरे आणि पाचूजडित चष्म्यांचा लिलाव!! या देखण्या वस्तू पाह्यल्यात का?

पुरातकालीन राजेशाही वस्तूंचे जगभरात सगळ्यांनाच खूप अप्रूप असते. त्या काळात राजे-महाराजांनी बनवलेल्या काही वस्तू इतक्या नाजूक आणि मौल्यवान असतात की त्याचे आजचे मूल्य लाखो-करोडोंमध्ये आहे. भारतात अनेक राजघराण्यातील माणसांनी त्या काळात हिरेमाणके वापरून दागिने बनवलेले आपण ऐकलेच असेल. ते दुर्मिळ दागिने खास करून महाराण्या आपल्या अंगावर परिधान करत. राजासुद्धा आपल्या मुकुटात, कंठ्यात किंवा हातातल्या पोहोचीमध्ये अशी रत्ने जडवून आपले वैभव दाखवत असे. तुम्ही दागदागिने खूप ऐकले असतील,पण हिरेजडित चष्म्यांबद्दल कधी ऐकलंय का? होय! असे चष्मे आहेत आणि त्यांचा लिलाव पुढच्या महिन्यात होत आहे.

मुघल राजघराण्यातील हिरे आणि पाचूजडीत असलेल्या चष्म्यांच्या दोन जोड्या आहेत. हे चष्मे निरखून पाहिले तर त्यात इतकी मनमोहक कलाकुसर आहे की कोणीही थक्क होऊन जाईल. हे चष्मे १७ व्या शतकातील आहेत असे मानले जाते. त्या चष्म्यांच्या लेन्समध्ये ही दुर्मिळ सुंदर रत्ने वापरली गेली आहेत. ती आकाराने लेन्सच्या आकारापेक्षा कमी आहेत. एका चष्म्याच्या लेन्समध्ये भारतीय हिरे जडले गेले आहेत. ते "हॅलो ऑफ लाईट" लेन्स आहेत. हे हिरे २०० कॅरेटच्या हिऱ्यातून घेतले गेले होते. त्यावेळी हे हिरे गोवळकोंड्यामध्ये म्हणजे सध्याच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या प्रदेशात ते सापडले होते. त्याकाळी अशुभ गोष्टींपासून दूर राहण्यासाठी या अश्या वस्तू बनवल्या जात. या वस्तू शुभदायक ठरतात, तसेच हे परिधान करणाऱ्यांना ज्ञानप्राप्तीसाठी मदत करतात असे मानले जायचे.

दुसऱ्या जोडीसाठी वापरलेले लेन्स, ज्यांना "गेट ऑफ पॅराडाईज" असे संबोधले जाते, ते ३०० कॅरेटपेक्षा जास्त वजनाच्या कोलंबिया पाचूमधून कापले गेले होते.

या चष्म्यांचा ऑक्टोबरमध्ये लिलाव होणार आहे. लिलावाच्या आधी, ते न्यूयॉर्क, हाँगकाँग आणि लंडनमध्ये सार्वजनिक प्रदर्शनामध्ये ठेवले जातील. या चष्म्यांना तब्बल ३.५ दशलक्ष डॉलर्स, म्हणजे तब्बल २५ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या चष्म्यांमध्ये मुघल काळातील कारागिरी आहे. यासारखी दुर्मिळ वस्तू कुठेही मिळणार नाही त्यामुळे इतकी किंमत असल्याचे बोलले जात आहे.

इस्लामिक आणि भारतीय परंपरेत रत्नांना महत्त्व आहे. या चष्म्याच्या जोड्या सोथबीच्या लिलावात विकल्या जातील. त्या कोण घेतील आणि त्याची किंमत किती होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required