computer

आज वाचा पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या'मी वनवासी'चा ब्लर्ब !

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची ओळख नव्याने बोभाटाच्या लेखातून आम्ही काय करून देणार ? 
त्यांचे 'मी वनवासी' या आत्मचरीत्रात्मक पुस्तक त्यांची ओळख करून देत.
आज वाचू 'मी वनवासीचे' ब्लर्ब!

(काल लिहिल्याप्रमाणे आमची बोभाटाची टीम म्हणजे वाचकांची टीम आहे. त्यांच्या सूचनेवरून  निवडक ब्लर्ब आम्ही इथे प्रकाशित करणार आहोत. काल मिलिंद बोकील यांच्या 'शाळा'कादंबरीचा 'ब्लर्ब' तुम्ही वाचला असेलच.)  

आता प्रहररात्र उलटली होती.मरायची तयारी झाली होती.

बस्स,थोडा अवधी होता.

गाव शांत झोपला होता

अधून-मधून टिटवी तेवढी टिर्र-टिर्र  करून शांततेचा भंग करीत होती.:

जणू ती मला सुचवित होती घाई कर, घाई कर, लवकर मर, खरंच लवकर मर.

आता नजर पैलतीरावर लागली होती.

डोंगराचा प्रचंड कडा माझी वाट पहात होता.

संपूर्ण मोह आवरून मीहि निघालेच होते;

जाता जाता मुलीच्या कोवळ्या गालावरती मी माझे ओठ टेकले;मात्र नकळत डोळ्यातील कढत पाणी तिच्या गालावर पडले........

अन्  माझ्या बाळीने 'दिलखुलास' हंबरडा फोडला.

कुण्या अबलेचे प्रेत निपचित होते ।

बिलगून तीला चिमुकले पीत होते ॥

असं दृष्य  आलं,आणि मी मरणं कॅन्सल केलं.

आता आभाळ गहिवरलं होतं.अंधार निवळला होता.

पूर्वेला तांबडं फुटलं होतं.घणगंभीर वारा वाहत होता. बाकीचे सर्व तारे मलूल झाले असले तरी एक तारा प्रखर तेजाने तळपत होता.

त्याच वेळी मी माझ्या बबडीचं नाव ठेवलं ममता ... ममता ... ममता

सौ. सिंधूताई सपकाळ